धनगर आरक्षणावरून जयंत पाटीलांचा भाजपावर निशाणा
धनगर समाजाला टाटा इन्स्टिट्यूटकडून तयार करण्यात आलेल्या अहवालानुसार आरक्षण मिळणार नसल्याचं स्पष्ट आहे. हा वेळ काढूपणा आहे, हा डाव आता हाणून पाडावा लागणार आहे, असे म्हणत धनगर समाजासाठी असणाऱ्या सवलतीमध्ये सुधारणा करू यासाठी अजित दादा यांच्यासोबत बसू आणि धनगर समाजाचे सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दिला आहे.
X
महाराष्ट्र राज्य धनगर महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी राजेंद्र उर्फ चिमण डांगे यांची निवड झाली. त्यानिमित्ताने चिमण डांगे यांचा इस्लामपूरमध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्री जयंत पाटील बोलत होते, गेली कित्येक वर्षे धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा भिजते घोंगडे आहे. धनगर समाजाला आरक्षण मागच्या सरकारच्या निष्कर्षाने मिळत नाही. मागच्या सरकारने जे निष्कर्ष काढले त्याने धनगर बांधवांना आरक्षण मिळणार नाही. मला कोणत्या पक्षावर टिका करायची नाही, पण आपल्याला या समाजाला न्याय मिळावा यासाठी वेगळा मार्ग काढावा लागेल, असे जंयत पाटील यांनी सांगितले.
धनगर समाजातील तरुण अतिशय कर्तबगार आहेत. या तरुणांना पाठबळ देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करावे लागतील. सरळ मार्गाने प्रश्न सोडवण्यात चिमण डांगे यांचा हातखंडा आहे. मात्र, प्रश्न न सुटल्यास संघर्ष करणे अशी त्यांची कार्यप्रणाली आहे. गेली दोन ते तीन दशके धनगर समाजाला जागृत करण्याचे काम त्यांनी केले आहे.