Home > Max Political > Lathi charge on Maratha Protestors : मराठा मोर्चा लाठीचार्ज – चूक सरकारचीच – राज ठाकरे

Lathi charge on Maratha Protestors : मराठा मोर्चा लाठीचार्ज – चूक सरकारचीच – राज ठाकरे

Lathi charge on Maratha Protestors : मराठा मोर्चा लाठीचार्ज – चूक सरकारचीच – राज ठाकरे
X

जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील अंतरवली सराटी या गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेचे आता राजकीय पडसाद उमटायला लागले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही याप्रकरणी सरकारच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहेत.

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीमार झाला आणि गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार पण झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे, अशा शब्दात राज ठाकरे यांनी या घटनेचा निषेध नोंदविलाय.

मुळात मराठा समाजानं आरक्षणासाठी जी आंदोलनं केली, त्या आंदोलनांचा इतिहास बघितला, तर मी माझ्या अनेक सभांमध्ये म्हणलं तसं की, ती आंदोलनं, मोर्चे ह्याचा आदर्श जगाने घ्यावा इतकी शांततेत आणि समंजसपणे झाली होती. अशी पार्श्वभूमी असताना जालन्यात काल काय असं घडणार होतं की, प्रशासनाने असं टोकाचं पाऊल उचललं ? पोलिसांच्या अहवालात माहिती येईलच, पण मी खात्रीने सांगतो की, पूर्व-इतिहास बघता आंदोलकांनी कोणतंच चुकीचं पाऊल नसतं टाकलं. त्यामुळे इथे सरकारचं चुकलं हे निश्चित, असं ट्विट करत राज ठाकरे यांनी सरकारच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्हं उपस्थित केलंय.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी राज ठाकरेंनी राजकीय नेत्यांना जबाबदार धरलंय. मराठा समाजाला आरक्षण देणं खरंच शक्य आहे का ? ते न्यायालयात टिकेल का ? बरं आरक्षण देऊन मराठा समाजातील मुलामुलींना देण्यासाठी किती सरकारी नोकऱ्या आहेत ? त्या जोडीला समाजातील तरुण तरुणींना स्पर्धात्मक जगात घौडदौड करण्यासाठी कसं तयार करता येईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न होत आहेत का? (इथे घोषणा केलेल्या योजनांबद्दल बोलायचं नाहीये तर प्रयत्नांबद्दल बोलायला हवं), असे प्रश्नही राज ठाकरे यांनी उपस्थित केले.

मुळात हा प्रश्न फक्त मराठा समाजाच्या आरक्षणापुरता नाहीये, तर एकूणच मराठी तरुण-तरुणींच्या रोजगाराशी संबंधित आहे. साध्या तलाठी भरतीसाठी जर लाखभर अर्ज येत असतील आणि भरती अवघ्या शेकड्यात होणार असेल, तर मराठी मुलांच्या मनात काय धुमसतंय ह्याचा विचार करावा लागेल. शिकलीसवरलेली मुलं नोकरीच्या शोधात वणवण फिरत आहेत, हे चित्रं चांगलं नाही. त्यामुळे उगाच भूलथापा देणं किंवा एकमेकांवर आरोप करून स्वतःची मान काढून घेणं ह्या दोन्ही गोष्टी आधीच्यांनी आणि आत्ताच्यानी करू नयेत, असंही राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.

काल जे घडलं त्यात प्रशासनाची चूकच आहे पण ते ज्या कारणांनी घडलं, त्याला गेल्या २० वर्षांत महाराष्ट्राचं विस्कटलेलं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण जबाबदार आहे. ह्यावर दीर्घकालीन उपायांची गरज आहे. चकवा देऊन सरकार बनवणं आणि ते पाडून दुसरं सरकार आणणं, यातून जे काही शौर्य दाखवायची खुमखुमी होती, ती खुमखुमी आता मिटली असेल असं आम्ही मानतो. त्यामुळे आता दोषारोप नकोत तर कृती अपेक्षित आहे, असल्याचंही राज ठाकरे म्हणाले.

या घटनेचे पडसाद उमटू न देण्याचं आवाहनही राज ठाकरेंनी केलंय. तुम्ही आंदोलनं आणि मोर्च्यांचा आदर्श घालून दिला आहेत, तो खरंच वाखाणण्यासारखा आहे. तुमचा राग समजू शकतो पण तुम्ही कोणाच्या राजकारणाला आणि भूलथापांना बळी पडणार नाही ह्याबद्दल मला आणि माझ्या पक्षाला खात्री आहे. मराठी माणसाच्या आक्रोशातून उभ्या राहणाऱ्या कुठल्याही आंदोलनाच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजपर्यंत उभी राहिली आहे आणि ह्यापुढे पण राहील, असं आश्वासनही राज ठाकरे यांनी यावेळी दिलं.

Updated : 2 Sept 2023 6:53 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top