ममता बॅनर्जींचा पोटनिवडणुकीत मोठा विजय : मुख्यमंत्रीपदी कायम
X
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून भारतीय जनता पार्टीला पराभूत करणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या विजय रथाची घौडदौड कायम राखत आज भवानी विधानसभा पोटनिवडणुकीत ५८ हजारापेक्षा अधिक मताची आघाडी घेत भाजपाच्या प्रियंका टिबरेवाल यांचा पराभव केला. या विजयामुळे ममता बॅनर्जी याचं मुख्यमंत्रीपद आता कायम राहणार आहे.
अलिकडेच पार पडलेल्या पश्चिम बंगाल निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल कॉंग्रेसनं भाजपाला धोबिपछाड देत २१३ जागांवर दणदणीत विजय मिळाला होता. गड आला पण सिंह गेला या उक्तीनुसार तृणमुलनं स्पष्ट बहुमत मिळवलं असलं तरी नंदीग्राम मतदार संघात झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.
पश्चिम बंगालमधे विधानपरीषद नसल्यानं मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या ममता बॅनर्जी यांना सहा महीन्यात निवडणुक येणं आवश्यक होता.
भारतीय निवडणुक आयोगानं घोषीत केलेल्या भवानीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी ३० सप्टेंबर रोजी मतदान पार पडले होते.
भाजपनं प्रियंका टिबरेवाल यांच्या रुपानं ममतांपुढे आव्हान निर्माण केलं होता. आज सकाळी आठ वाजेपासून सुरू असलेल्या मतमोजणीचे आता अंतिम निकाल आले असून ममता बॅनर्जी यांनी या पोटनिवडणुकीत भाजपाच्या प्रियंका टिबरेवाल यांचा ५८ हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला.
भवानीपूर हा ममता बॅनर्जींचा पारंपरीक मतदारसंघ आहे. मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी तृणमुलला हा विजय आवश्यक होता.
विजयावर प्रतिक्रीया देताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, मी भवानीपूर मतदारसंघातील प्रत्येक वार्ड जिंकला आहे. तर या मतदारसंघात सुमारे 46 टक्के लोक बंगाली आहेत आणि या सर्वांनी मला मत दिली. पश्चिम बंगालच्या निवडणुका सुरू झाल्यापासून आमच्या पक्षाविरोधात बरेच षडयंत्र रचले गेले. केंद्र सरकारने आम्हाला हटवण्याचे षडयंत्र रचले होते, पण लोकांनी आम्हाला जिंकून दिले आणि यासाठी मी त्यांची आभारी असल्याचं सुद्धा त्या म्हणाल्या. तसेच मी निवडणूक आयोगाचा आभारी आहे की त्यांनी पोटनिवडणुका वेळेवर जाहीर केल्या,असेही ममता बॅनर्जी यावेळी म्हणाल्या.