लोकसभेतील जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीचा मोठा निर्णय
राष्ट्रीय पातळीवर INDIA आघाडीने जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी 13 सदस्यीय समन्वय समितीची स्थापना केली आहे. मात्र राज्यातील जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी आता महाविकास आघाडीने पुढाकार घेत समितीची स्थापना केली आहे.
X
राज्यात लोकसभेसाठी महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातच लोकसभेच्या जागा वाटप करण्यासाठी महाविकास आघाडीने समितीची स्थापना केली आहे. त्यामध्ये ठाकरे गटाने तीन, शरद पवार गटाने तीन आणि काँग्रेसने तीन सदस्य असणार आहेत.
यामध्ये काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान आणि बसवराज पाटील तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संजय राऊत, विनायक राऊत आणि अनिल देसाई तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. ही समिती लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात समन्वयाने तोडगा काढणार आहेत.
INDIA आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीनंतर प्रत्येक राज्यनिहाय एक समिती गठीत करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्रातील जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी महाविकास आघाडीने समितीची स्थापना केली आहे. या समितीत सध्यातरी एक वाक्यता दिसून येत आहे. मात्र हिच एकवाक्यता आगामी काळात राहील का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.