सरकारला राज ठाकरेंची भीती वाटते, काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा
X
राज ठाकरेंनी प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भुमिकेमुळे राज ठाकरे सध्या चर्चेत आहेत. त्यातच राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टीमेटमनंतर राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र राज ठाकरे यांना अजूनही अटक करण्यात आली नाही. त्यावरून काँग्रेसच्या नेत्याने राज ठाकरेंना सरकार घाबरत असल्याचा दावा केला आहे.
मशिदीवरील भोंगे उतरवले नाही तर मशिदींसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा पठन करण्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. त्यावरून राज्यात राजकारण तापले आहे. तर राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टीमेटमनंतर राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. मात्र राज ठाकरे यांना अटक करण्यात आली नाही. त्यामुळे राज ठाकरे यांना सरकार झुकतं माप दिले असल्याचे बोलले जात आहे. त्यातच काँग्रेस नेत्याने खळबळजनक दावा केला आहे.
राणा दांपत्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर जाऊन हनुमान चालीसा पठन करण्याचा इशारा दिला होता. त्याअंतर्गत राणा दांपत्यावर पोलिसांनी राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. मग राणा दांपत्याला एक न्याय आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे भाऊ असल्याने दुसरा न्याय दिला जात आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी सरकार राज ठाकरे यांना घाबरत असल्याचे म्हटले आहे.
संजय निरुपम द प्रिंटच्या बातमीचा हवाला देत म्हणाले की, औरंगाबादच्या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन केले नव्हते. त्यामुळे मुंबई पोलिसांनी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करायला हवा होता. मात्र पोलिसांनी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे राज्य सरकार राज ठाकरे यांना भीत असल्याचे दिसून येत असल्याची टीका संजय निरुपम यांनी केली.
संजय निरुपम म्हणाले, महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे. त्यामुळे कायद्यानुसार राज ठाकरे यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी. तसेच राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांबद्दल वेळोवेळी केलेल्या वक्तव्यामुळे राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अशी मागणी संजय निरुपम यांनी केली.