महाराष्ट्राने फुले-आंबेडकरी चळवळीतला एक विश्वकोश आज गमावला- सुषमा अंधारे
X
मी महाविद्यालयीन काळात वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धेला स्पर्धक म्हणून जायची. तेव्हा कुठे कुठे हरी नरके सर हे स्पर्धेचे परीक्षक म्हणून असायचे. मग परीक्षक म्हणून त्यांनी एखाद भाषण केलं की अरेच्चा हा संदर्भ आपल्याला का सुचला नाही. आपल्याला असं म्हणता आलं असतं तर असं वाटून जायचं. वक्तृत्वात नुसता आवेश असून उपयोग नाही तर काही सत्य संदर्भ असणे गरजेचे, त्याशिवाय ते प्रभावशाली वाटत नाही हे भिनत गेलं आणि आपल्या वक्तृत्वाला अधिक प्रभावी करायचं असेल तर अभ्यास करावा लागेल हा संस्कारही रुजत गेला.
2006 साली मी आणि नरके सर पहिल्यांदा एका मंचावर आलो ते यवतमाळच्या समता पर्व मध्ये आणि अर्थातच हा योग आला होता आमच्या दोघांमध्ये समान दुवा असणारे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे यांच्यामुळे. पहिल्यांदाच त्यांच्यासोबत एका मंचावर बोलायला उत्सुक होते. पण मी बोलायच्या आधीच ते म्हणाले, "जोरात सुरू आहे तुमचं. सगळीकडे गाजत आहे." मी अगदीच अभावितपणे बोलून गेले," नाही ओ सर, फार लहान आहे मी अजून. "अन् नरके सर म्हणाले, चांगलंय.. चांगलंय.. अशाच राहा..! जोपर्यंत लहान आहे म्हणत रहाल; तोपर्यंत वाढ व्हायला खूप वाव आहे. ज्या क्षणी मोठी झाले म्हणाल त्या क्षणी लोकं छाटायला सुरुवात करतील..!!"
मी हा कानमंत्र आजन्म लक्षात ठेवतेय. पुढे सातत्याने सहकारी म्हणून बोलत राहिलो भेटत राहिलो. मी दैनिक लोकनायक च्या पुणे आवृत्तीचे संपादक पद स्वीकारले. तेव्हा त्या कार्यक्रमातही महिला संपादक म्हणून भरभरून कौतुक करायला विलास वाघ सरांसह नरके सर कार्यक्रमाला उपस्थित होते. पण नरके सर आणि माझ्यात नेहमीच गुडी गुडी असे काही संबंध राहिले नाही. कधी टोकाचे तीव्र मतभेद तर कधी तितकेच सामंजस्याने समष्टीची सम्यक चर्चा. प्राच्यविद्या भांडारकर वर त्यांचं असणं हे मला न पटणारं होतं..!!
भटक्या विमुक्तांचे जीवनमान उंचावण्यासाठी तत्कालीन लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार नायर यांच्या सूचनेनुसार श्री बाळकृष्ण रेणके यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला. तेव्हा आयोगाच्या लक्ष्मण मानेंनी विरोधात भूमिका घेतली. आणि मी आणि हरिभाऊंनी बाजूने भूमिका घेतली. पुढे आमच्या भूमिकेतला फोलपणा आमच्या लक्षात आला. कारण या आयोगाला कोणतेही घटनात्मक अधिष्ठान नव्हते. त्यामुळे आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्याचे कुठलेही बंधन सरकारवर नव्हते. आम्ही दोघांनीही आमची चूक तात्काळ मान्य केली.
लक्ष्मण माने यांच्यावर षडयंत्र रचत जेव्हा बलात्काराचे आरोप केले गेले तेव्हा मी मानेंच्या बाजूने उभे होते तर नरके सर विरोधात उभे होते. पण अगदी पाच-सहा महिन्यांपूर्वी जेव्हा माझं आणि त्यांचं या संदर्भाने फार विस्तृत बोलणं झालं. तेव्हा मात्र त्यांनी पुन्हा एकदा अगदी मोठ्या मनाने हे मान्य केलं की काही गोष्टी निश्चितपणे चुकत गेल्या होत्या. आपण एखादी गोष्ट जर चुकली असेल तर ती चुकली आहे हे जाहीरपणे सांगण्याची दानत आणि चूक दुरुस्त करण्याची तयारी नरके सरांची होते.
नरके सर म्हणजे अगदीच जगतमित्र वगैरे असा काही प्रकार नव्हता. अनेकांशी त्यांचे टोकाचे वैचारिक वाद मतभेद होते आणि त्यावर ते स्पष्टपणे आपली भूमिका ही मांडायचे परंतु ती भूमिका मांडताना शब्दांची निवड फार नेमकी आणि शेलकी असायची. शिवराळ भाषेत त्यांनी कुणाबद्दलही लिहिल्या बोलण्याचं मला निश्चितच आठवत नाही.
वरिष्ठ आयएएस अधिकारी हर्षदीप कांबळे यांच्याशी त्यांचा विशेष स्नेह. अनेकदा अनेक पुस्तकांचे वाचन मंथन करण्यासाठी किंवा नवीन काही लेखन करण्यासाठी म्हणून ते यवतमाळला असायचे. मराठा आरक्षणावर त्यांनी घेतलेली भूमिका ही सरळ सरळ महाराष्ट्रातल्या बहुसंख्यांकांना अंगावर घेणारी होती. पण ते जनावयाने अजिबात डळमळीत झाले नाही आणि आपल्या भूमिकेपासून तसुभरही हलले नाही.
पुणे विद्यापीठातील फुले अध्यासनाच्या माध्यमातून जे काही चळवळीच्या दृष्टिकोनातून भरीव काम झाले याचे श्रेय मात्र निश्चितपणे नरके सरांना द्यायला हवे एवढेच नाही तर फुले-आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीतील त्यांचे योगदान महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.
अब्राह्मणी चळवळीचे वैचारिक अधिष्ठान त्यांनी मागच्या तीन दशकात फार उत्तमपणे जोपासले. असंख्य आठवणी आहेत. आठवणींशिवाय असेही काय हातात आहे पण आपलं भेटायचं राहूनच गेल सर.. तुमचं असं जाणं हे एका कुटुंबाच नाही तर महाराष्ट्राचा नुकसान आहे. महाराष्ट्राने फुले-आंबेडकरी चळवळीतला एक चालता बोलता विश्वकोश आज गमावलाय..!!!