#LataMangeshkar :भारतरत्न #लता_मंगेशकर यांच्या निधनाने देशात दोन दिवसांचा राष्टीय दुखवटा जाहीर
X
लतादीदींच्या निधनामुळे देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रीय ध्वजदेखील दोन दिवस अर्ध्यावर उतरवण्यात येणार आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्या आहेत.
लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी 6.30 वाजता शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यामुळे शिवाजी पार्क परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच आता ब्रीच कँडीतून लतादीदींचे पार्थिव त्यांच्या पेडररोडवरील घरी काही काळ ठेवलं जाणार आहे.
दोन दिवसाच्या राष्ट्रीय दुखवट्यात सर्व शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यानंतर त्यांचे पार्थिव शिवाजी पार्क येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही लतादीदींच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत. लता मंगेशकर यांच्या निधनावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लता मंगेशकर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. एका युगाचा अस्त झाल्याची भावना सर्वच मान्यवरांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रीय दुखवटा म्हणजे काय?
जगभरात प्रत्येक देशात राष्ट्रीय दुखवटा स्वतःच्या पद्धतीने पाळला जातो. तो पाळण्याचे कारण आणि प्रक्रिया कमी-अधिक प्रमाणात सारखीच आहे.भारतातील 'राष्ट्रीय दुखवटा' हा संपूर्ण राष्ट्राचे दु:ख व्यक्त करण्याचा प्रतीकात्मक मार्ग आहे. हा 'राष्ट्रीय दुखवटा' एखाद्या 'व्यक्तीच्या' निधीनंतर किंवा पुण्यतिथीला पाळला जातो. भारताच्या ध्वज संहितेनुसार, राष्ट्रीय दुखवट्याच्या वेळी, संपूर्ण भारतात आणि परदेशातील भारतीय संस्थांमध्ये (जसे की दूतावास इ.) राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जातो. या काळात कोणतेही औपचारिक आणि अधिकृत काम केले जात नाही आणि कोणतेही अधिकृत काम केले जात नाही. मेळावे आणि अधिकृत मनोरंजनावर देखील बंदी असते. निधन झालेल्या व्यक्तीवर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार केले जातात.राष्ट्रीय दुखवटा जाहीर करताना त्या व्यक्तीचे सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्व आणि योगदान लक्षात घेऊनच सरकार याविषयी निर्णय घेते. यासंदर्भात कठोर आणि ठोस असा कोणताही नियम नाही. राजकारण, साहित्य, कायदा, विज्ञान, मनोरंजन क्षेत्रामध्ये उल्लेखनिय, अतुलनीय योगदान देत देशाचे नाव मोठं करणाऱ्या व्यक्तींना राजकीय सन्मान देण्यासाठी राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात येतो.