शरद पवार यांनी प्रियंका गांधींचा उल्लेख टाळला, संजय राऊत राहुल गांधींच्या भेटीला
शरद पवार यांनी प्रियंका गांधींचा उल्लेख टाळला, संजय राऊत राहुल गांधींच्या भेटीला
X
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी घटनेवर शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रियंका गांधी यांना झालेल्या अटकेबाबत थेट उल्लेख टाळला. तर दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत राहुल गांधी यांच्या भेटीसाठी गेले आहेत. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
या भेटी दरम्यान लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचाराबाबत रणनिती ठरणार असल्याचं बोललं जात आहे. विरोधक राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत.
दरम्यान लखीमपूर येथे मृत शेतकऱ्यांच्या नातेवाईकांच्या भेटीसाठी निघालेल्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळं या भेटीला मोठं महत्त्व प्राप्त झालं असून सरकार विरोधात विरोधक अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
दरम्यान या भेटी अगोदर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या घटनेची जालियनवाला बाग हत्याकांडाशी तुलना केली आहे.
काय आहे प्रकरण?
रविवार, 3 ऑक्टोबर ला लखीमपूर-खेरी येथे, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य लखीमपूर-खेरी येथील काही प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार होते. त्यानंतर त्यांना केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचे मूळ गाव बनबीरपूरला जायचे होते. उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाची माहिती मिळताच शेतकरी नेते काळे झेंडे दाखवण्यासाठी अजयकुमार मिश्रा यांच्या गावात पोहोचले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी उपस्थित असलेल्या भाजप नेत्यांनी शेतकऱ्यांवर गाडी घातली. या अपघातात अनेक शेतकरी जखमी झाले. तर काहींचा मृत्यू झाला आहे. या घटनेने देशभरात संतापाची लाट आहे.