किरण सामंतांची व्हायरल पोस्ट डिलीट, उदय सामंतांचा लोकसभेच्या जागेवर दावा कायम
X
रत्नागिरी - सिंधुदूर्ग लोकसभा महायुतीच्या उमेदवारीवरून चांगलीच चर्चा तापली आहे. कोकण विभागात भाजपला एकही जागा नसल्याने रत्नागिरी - सिंधुदूर्ग लोकसभेच्या जागेवर भाजपने दावा केला आहे. विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे या जागेवरून निवडणूक लढवण्यास इच्छूक होते, तर विद्यमान खासदार शिवसेनेचे असल्याने शिवसेनेच्या शिंदे गटाने या जागेवर दावा केल्याने किरण सामंत या जागेसाठी इच्छूक आहेत. तशी तयारीही त्यांनी या मतदारसंघात सुरू केली होती, लोकांच्या गाठी-भेटी गाव-दौरे सुरू केले होते. दरम्यान रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा जागेवरुन महायुतीत तिढा निर्माण झाला होता. या संदर्भात किरण सामंत यांनी आपल्या सोशल मिडीयावरून पोस्ट केली आणि काही वेळातच हि पोस्ट वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाली. त्यानंतर काही तासानंतर ही पोस्ट डिलीट सुद्धा करण्यात आली.
या पोस्ट मध्ये काय लिहीलं होतं पाहूयात...!
या पोस्ट मध्ये किरण सामंत यांनी लिहिलं होतं की "मा. नरेंद्र मोदीजी पुन्हा पंतप्रधान व 'अब कि ४०० पार' होण्याकरिता रत्नागिरी - सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघातून किरण सामंत याची माघार" घेत असल्याची पोस्ट किरण सामंत यांनी केली. परंतू गेल्या काही वर्षांपासून किरण सामंत या रत्नागिरी - सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघात जोरदार तयारी करत होते.
दरम्यान, यावर किरण सामंत यांचे बंधू उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेतून उदय सामंत म्हणाले की "रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा, यावर आपण आज ही ठाम", असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे. तर याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जो होईल, तो मान्य असेल, असेही उदय सामंत यांनी सांगितले.
तर किरण सामंत यांच्या पोस्टसंदर्भात बोलताना उदय सामंत म्हणाले की, "किरण सामंत हे भावनिक आहेत, संवेदनशील आहेत. त्यामुळे त्यांनी ही काल रात्री नऊ वाजता पोस्ट केली होती, परंतु त्यांना समजावून सांगितल्यावर त्यांनी ती पोस्ट डिलीट केली.
सिंधुदुर्ग-रत्नागिरी या जागेवर केंद्रीय मंत्री, भाजपचे नेते नारायण राणे हे इच्छूक असल्याचं त्यांनी सातत्यांने सांगितले आहे. तसेच भाजपने या मतदारसंघावर दावाही केला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघातून भाजपचा उमेदवार असेल आणि पक्षाने तसे करण्यास सांगितले तर, आपण या जागेवरून निवडणूक लढवू, असे मंगळवारी सांगितले. सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघ भाजपकडेच राहणार आहे. उमेदवार ठरवण्याचे काम भाजप नेत्यांचे आहे. त्यांनी मला निवडणूक लढवण्यास सांगितले तर मी लढेन, असे राणे यांनी सांगितले आहे.
सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघातून कोण पडणार कोणावर भारी ?
सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघातील जनतेचा कौल कुणाच्या बाजूने असू शकतो, यासंदर्भात काही लोकांशी चर्चा केली. दरम्यान, राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार सतिश कदम म्हणाले की "सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघातील निवडणूकीची लढत ही तुल्यबल होणार आहे. महायुतीतून किरण सामंत यांना उमेदारी मिळाली तर, ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांच्यात टफ फाईट होईल तर भाजपचे नेते नारायण राणे यांना उमदवारी मिळाली तर, भाजपला ही सीट जिंकणं अवघड होणार आहे. त्यामुळे कोकणातील मुस्लिम मतदारांची मतं ही निर्णायक ठरु शकतील. या मतदानाचा फायदा उध्दव ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांना होण्याची शक्यता आहे."
याच संदर्भात सामाजिक कार्यकर्ते प्रसाद सावंत यांच्याशी फोनवरून संवाद साधला असता ते म्हणाले की "सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधु किरण सामंत यांनी जिल्ह्यात अनेक विकास कामे केली आहेत. त्यामुळे किरण सामंत यांना उमेदवारी मिळाली तर शिवसेनेचा बालेकिल्ला कायम राहील."
सिंधुदुर्ग-रत्नागिरी जागेवरुन महायुतीत संभ्रम आहे. किरण सामंत यांनी माघार घेत असल्याची पोस्ट जरी व्हायरलं केली असली तरी, उदय सामंत हे आजही शिवसेनाला ही जागा मिळेल याच्या अपेक्षेत आहेत. दरम्यान, या जागेरून महायुतीचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेणार ? ही जागा महायुतीतून कोणाला मिळणार ? महायुतीचे उमेदारी हे भाजप नेते नारायण राणे कि शिवसेना शिंदे गटाचे नेते किरण सामंत यांना मिळणार? हे पाहणं अत्यंत महत्वाची ठरणार आहे