Home > Max Political > खडसेंना कोणी फोडले ?

खडसेंना कोणी फोडले ?

काल एकनाथ खडसेंनी ४० वर्षाच्या भारतीय जनता पार्टीसोबतच्या निष्ठेचा त्याग करुन राष्ट्रवादी प्रवेशाचा निर्णय जाहीर केला. भाजपाचा मोठा मासा गळाला लावण्याचे फत्ते कामगिरी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी बेमालुमपणे पार पाडल्याने काल दिवसभर भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे नेते घायाळ झाले होते.

खडसेंना कोणी फोडले ?
X

आमदार रोहीत पवार यांनी वर्षभरापूर्वीच्या आठवणींना उजाळा देत भाजपनेते भरतीच्या वल्गना करत होते. भरतीनंतर ओहटी येते हा निसर्गनियम आहे. खडसेंच्या रुपाने भरती प्रक्रीया सुरु झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. वर्षभरापूर्वा राजकीय परीस्थिती आघाडीसाठी बिकट होती. एक्झीट पोलमधून शतप्रतिशत भाजपचे निष्कर्ष निघत होते. आघाडीच्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते भाजपमधे प्रवेश करत असताना प्रदेशाध्यक्ष या नात्यानं जयंत पाटील यांनी एकहाथी धुरा सांभाळून राष्ट्रवादीला यश मिळवून दिले. विधानसभेतील दोन-तीन वर्षातील भाषणांचे संदर्भ घेतले तरी जयंत पाटील यांनी कशा पध्दतीने `मिशन- खडसे` पूर्ण केलं याची जाणीव होईल.

खान्देशात ज्यांनी भाजप रुजवला आणि वाढवला असे एकनाथ खडसे आता राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. त्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. खडसेंच्या या पक्षबदलाने कसं बदलेल खान्देशातलं राजकारण, याचीच जोरदार चर्चा आता सुरु झाली आहे. खान्देशात आता भाजपला उतरती कळा लागेल आणि राष्ट्रवादीला चांगले दिवस येतील, अशीच चर्चा आहे. खान्देशातले एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीचे नवे कोरे तडाखेबाज नेतृत्व असणार आहे. खडसेंच्या नेतृत्वात धुळे, जळगाव आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यात राष्ट्रवादी आता पाळंमुळे आणखी घट्ट करेल. त्यातच भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत आलेले अनिल गोटे आणि खडसे यांची जुनी मैत्री आहे. त्यामुळे हे दोघे एकत्र येत भाजपविरोधात राळ उठवतील, अशीच चर्चा आहे. जळगाव महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे. मात्र अनेक नगरसेवक खडसेंच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या काळात महापालिकेत सत्तांतर होऊ शकते. ग्रामीण भागात सावदा, यावल, भुसावळ नगरपालिकांमध्येही सत्ताबदल होऊ शकतो.दूध फेडरेशन, बाजारसमित्या आणि जिल्हा बँकांमध्ये राष्ट्रवादीची पकड घट्ट होऊ शकते. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला फक्त एक जागा कमी आहे, त्यामुळे येत्या काळात अविश्वास प्रस्ताव आणून जिल्हा परिषदेतही सत्ता बदल होऊ शकतो. लेवा पाटील समाजाचं मोठे पाठबळ राष्ट्रवादीला मिळेल, अशी चर्चा आहे. भाजपवासी झालेले १४ आमदार राष्ट्रवादीच्या मार्गावर असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. खडसेंच्या रुपानं मोठा मोहरा महाविकास आघाडीच्या हातात लागल्यानं आता भाजप आणि फडणवीस विरोधातील लढाई जोमाने सुरु होणार हे नक्की.

कोण आहेत जयंत पाटील ?

जयंतरावांचा जन्म १६ फेब्रुवारी१९६२ रोजी इस्लामपूर येथील साख्रा या गावी झाला. वडील राजारामबापू आणि आई कुसूम यांच्या पोटी जन्माला आलेले जयंतराव घरातील लाडकं शेंडेफळ. लहानपणापासून अभ्यासात हुशार असलेले जयंतराव राजकारणात तेवढे सक्रिय नव्हते. व्हीजेटीआय मुंबई येथून सिव्हिल इंजिनिअरिंग ची पदवी घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेला रवाना झाले.सगळे काही व्यवस्थित सुरू असताना १९८४ साली त्यांचे वडील व तत्कालीन नेते राजारामबापू पाटील यांचे आकस्मिक निधन झाले. आणि जयंतरावांना पुन्हा मायदेशी परतावे लागले. राजारामबापूंच्या निधनानंतर संपूर्ण भार जयंतरावांवर येऊन पडला. अनेकांनी विधानसभा निवडणूक लढविण्याच्या त्यांना सूचना देखील केल्या. परंतु अभ्यासू वृत्तीच्या जयंतरावांनी लगेचच निवडणूक लढण्यास स्पष्ट नकार दिला. आणि आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात साखर कारखान्याच्या संचालकपदापासून सुरू केली. सलग सहा वर्षे त्यांनी आपल्या जिल्ह्यासाठी काम केलं. मतदारसंघातील अडचणी समजून घेतल्या.

त्या सोडविल्या. हे सगळे करत असताना मतदारसंघ बांधला आणि १९९० साली ते पहिल्यांदा आमदार झाले. १९९९ मध्ये राज्य आर्थिक संकटात सापडले असताना पवारांनी जयंत पाटलांना त्यांच्या वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी राज्याच्या अर्थ खात्याची जबाबदारी दिली. पवारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत जयंतरावांनी राज्याला आर्थिक शिस्त लावली. १९९९ ते २००८ या काळात जयंतराव राज्याचे अर्थमंत्री होते.याच दरम्यान त्यांचा बंगलोर येथे मोठा अपघात झाला. अपघातात गंभीर दुखापत झाल्याने त्यांना दवाखान्यात खिळून राहावं लागलं. महाराष्ट्रातील सामान्य माणूस त्यांच्यावर किती प्रेम करतो हे दवाखान्यात त्यावेळी त्यांना भेटायला येणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांनी दाखवून दिले. कामप्रती अपार निष्ठा बाळगणा-या जयंतरावांनी दवाखान्यातच राज्याचा अर्थसंकल्प तयार केला. आणि सभागृहात व्हीलचेअर वर बसून तो अर्थसंकल्प जाहीर केला. पुढे २००८ रोजी झालेल्या मुंबई हल्ल्यामुळे आर.आर.पाटील यांना आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

त्यावेळी राज्याच्या गृहमंत्री पदाची जबाबदारी जयंतरावांनी यशस्वीपणे सांभाळली. महाराष्ट्र पोलीस दलाचे आधुनिकीकरण करत जयंत पाटलांनी मुंबई हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होत असताना दहशतवादाला आळा घालण्यासाठी 'फोर्स 1' डे विशेष दाहशतवादविरोधी पथक सुरु केले. पपुन्हा आघाडीची सत्ता आली आणि जयंतरावांना'ग्रामविकास' हे खाते मिळाले. या खात्यात काम करताना जयंतरावांनी आबांना सोबत घेऊन 'संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता योजना' राज्यभर राबविली. आणि आपल्या कर्तृत्वाची चुणूक दाखवत देशात ग्रामविकास मध्ये १४ व्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र त्यांनी सलग ३ वर्षे पहिल्या क्रमांकावर आणला.

मल्टी टास्कींग हा जयंतरावांचा गुण आहे. सलग सहा वेळा आमदार राहिलेले जयंतराव सभागृहात जेव्हा बोलायला उभे राहतात तेव्हा सभागृहातील नेत्यांसह अवघा महाराष्ट्र त्यांना ऐकण्यास आसुसलेला असतो. विरोधकांविषयी बोलताना हसत हसत चिमटे काढण्याची त्यांची स्टाईल आजवर कुणालाच जमली नाही आणि कधी जमणारही नाही. बोलताना अतिशय बॅलन्स राहून जे बोलायचे तेच जयंतराव बोलतात. जयंतराव राष्ट्रवादी काँग्रेसचे 'व्हाईट कॉलर पर्सनॅलिटी' आहेत. राष्ट्रवादीच्या वाईट काळात ते पवार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी घेऊन त्यांनी राज्यात पक्ष बळकट केला. विधानसभेत तरुणांना संधी द्यावी हा त्यांचा आग्रह पवारांनीही उचलून धरला. आणि राष्ट्रवादीने २०१९ च्या निवडणुकीत अनेक तरुणांना मैदानात उतरवले. राष्ट्रवादीच्या वाईट काळात अनेक नेत्यांनी पवारांची साथ सोडली. जी जबाबदारी मिळाली त्याचं सोनं करून दाखवणाऱ्या जयंतरावांकडे सध्या राज्याच्या जलसंपदा खात्याची जबाबदारी आहे.

खडसेंच्या रुपाने भाजपला मोठा धक्का दिल्यानंतर आगामी काळात आमदारांचे इनकमिंग करुन ते भाजपला आणखी धक्क देणार आहेत. खरा सामना आगामी विधीमंडळाच्या आधिवेशनात दिसून येईल. जेव्हा विरोधी बाकांवर फडणवीस

असतील आणि सत्ताधारी बाकांवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, एकनाथ शिंदे आणि एकनाथ खडसेंची फौज असणार आहे. हा `सामना` पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.

Updated : 28 Oct 2020 1:43 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top