अर्नब गोस्वामीच्या अटकेनंतर महाविकास आघाडीचं #JusticeForAnvayNaik
X
'रिपब्लिक टीव्ही'चे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केलं आहे. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेतलं आहे. वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब यांना अटक केल्यानंतर यावरुन आता विरोधी पक्ष असणाऱ्या भाजापाने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपाच्या अनेक नेत्यांनी यावरुन राज्यातील महाविकास आघाडीवर टीका केली आहे. मात्र दुसरीकडे काँग्रेसने या अटकेनंतर महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहेत. #JusticeForAnvayNaik असं ट्विट करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अटकेचं स्वागत केलं आहे.
कॉग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी अर्णब यांना अटक झाल्यानंतर धन्यवाद महाविकास आघाडी सरकार असं म्हटलं आहे. त्याचबरोबरच त्यांनी #JusticeForAnvayNaik हा हॅशटॅगही वापरला आहे. "अन्वय नाईकला न्याय मिळवून दिल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारला धन्यवाद," असं सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
बईतील ५२ वर्षीय इंटिरियर डिझायनर (अंतर्गत वास्तुरचनाकार) अन्वय नाईक यांनी ५ मे २०१८ रोजी अलिबागजवळील कावीर येथे आत्महत्या केली. या आत्महत्येप्रकरणी 'रिपब्लिक टीव्ही'चे अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरुद्ध अलिबाग पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला. अर्णब व अन्य दोघांनी नाईक यांचे पैसे थकवल्याने ते निराश झाले होते. धक्कादायक बाब म्हणजे याचवेळी नाईक यांच्या ७३ वर्षांच्या आई कुमुद यांचाही मृतदेह घरात सापडला होता.
मुळचे कावीर येथे राहणारे अन्वय नाईक हे मुंबईत व्यवसायानिमित्त राहत होते. अन्वय हे मुंबईत 'कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड' या नावाने अंतर्गत वास्तूरचना आणि सजावटीचा व्यवसाय करायचे. आत्महत्येच्या एक दिवस आधी म्हणजेच शुक्रवारी ४ मे रोजी अन्वय कावीर येथील आपल्या घरी आले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी तेथील नोकरांना त्यांचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत सापडला. तर त्यांच्या आईचाही मृतदेह तिथेच होता. पोलिसांना त्याठिकाणी आत्महत्येपूर्वी लिहिलेली जी चिठ्ठी मिळाली. या चिठ्ठीमध्ये अर्णब गोस्वामीसह, आयकास्ट स्लॉशस्काय मिडियाचे फिरोज शेख, मगरपट्टा येथील 'स्मार्ट वर्क्स 'चे नितेश सारडा या तिघांनी केलेल्या कामाचे पैसे थकवल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे नाईक यांनी म्हटले आहे.
या आत्महत्येनंतर नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. नाईक यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सारडा या तिघांची नावे लिहिली होती. तसेच नाईक यांच्या पत्नीनेही दिलेल्या तक्रारीवरून या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती तत्कालीन पोलीस अधीक्षक अनिल परस्कार यांनी दिली होती. विधीमंडळात मागणी केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा गुन्हा गुन्हेशाखेकडे वर्ग करण्यात आला होता. आज अर्नब गोस्वामी यांना अटकेनंतर पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.