खारघर दुर्घटनेवरुन जयंत पाटील vs सुधीर मुनगंटीवार यांच्यात जुंपली
X
आज पावसाळी अधिवेशनातील चौथा दिवस सुरु आहे. आजही विरोधक आक्रमक असलेले पहायला मिळत आहे. खारघर दुर्घटनेवरुन राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलच धारेवर धरलं आहे.
दरम्यान जयंत पाटील म्हणाले की, चौकशी समिती स्थापन होऊन ३ महिने झाले आहेत. तरीही सरकार ने अजुन एक महिना वाढवला आहे. असला कसला गहन प्रश्न आहे ? मृत्यु झाले आहेत. याच आयोजन कुणी केलं ? आयोजक कोण आहे ? भर उन्हात ६५० एकरमध्ये २० लाख लोकांना बोलावणं आणि त्यांची सोय न करता त्यांना प्रचंड मोठ्या त्रासाला तोंड द्यावं लागणं कोण शहाणा आहे ? ज्याने या कार्यक्रमाचे आयोजन केलं याची चौकशी झाली पाहिजे. ज्याने हा कार्यक्रम घेतला त्याला कारणीभूत ठरवलं पाहिजे. जी चौकशी समिती आहे तिला मुदत वाढ न देता ताबडतोब १५ दिवसात समितीचा अहवाल सभागृहासमोर आला पाहिजे, अशी मागणीच जयंत पाटील यांनी केली.
जयंत पाटील पुढे म्हणाले की, यांना त्याचं उत्तर देता येणार नाही. गृहमंत्र्यांनी यावर उत्तर दिलं पाहिजे म्हणून प्रश्न राखुन ठेवावा, असं जयंत पाटील म्हणाले. यावर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या मुद्यावर आक्रमक होत प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले की, " यांची नियत खराब आहे यांना प्रेताच्या टाळु वरचे लोणी खायचं आहे, असं म्हणत त्यांनी समिती प्रमुखांनी मुदतवाढ मागितली नैसर्गीक न्याय्य तत्वानुसार अहवाल वस्तुनिष्ठ यावा सर्व बाजु तपासता याव्या यासाठी समितीला मुदतवाढ दिली असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितले.