Home > Max Political > सर्वे येथे आयकर विभागाची धाड; झरीना दारुवाला यांच्या बंगल्याची घेतली झडती

सर्वे येथे आयकर विभागाची धाड; झरीना दारुवाला यांच्या बंगल्याची घेतली झडती

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अजित पवार अडचणीत येतील अशी भविष्यवाणी केली असताना रायगड जिल्ह्यातील सर्वे येथे आयकर विभागाची धाड पडली असून झरीना दारुवाला यांच्या बंगल्याची घेतली झडती आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांनी दारुवाला बंगल्याला दिली होती भेट दिल्याचे सांगितले जात आहे.

सर्वे येथे आयकर विभागाची धाड; झरीना दारुवाला यांच्या बंगल्याची घेतली झडती
X






रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील काशिद परिसरातील सर्वे येथील एका बंगल्यावर आयकर विभागाने धाड घातल्याचे वृत्त आहे. झरीना एसडी दारुवाला यांच्या मालकीच्या असलेल्या या बंगल्याची 24 तास झडती घेण्यात आली. सदर झाडाझडतीनंतर आयकर विभागाची टीम आल्या पावली परत फिरली. दरम्यान, दारुवाला यांच्या याच बंगल्यावर वर्षभरापूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार येऊन गेल्याची माहिती गावातून मिळाली असल्याने या धाडीशी अजित पवार यांच्यावर सुरु असलेल्या धाडसत्राचा संबंध असल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरु आहे.

काशिद या नयनरम्य पर्यटनस्थळापासून अवघ्या एक-दोन किलोमीटर अंतरावरील सुंदर अशा वळणावर झरीना एसडी दारुवाला यांचा बंगला आहे. या झरीना नाव असलेला बंगला आहे. चिरेबंदी असलेल्या, अतिशय देखण्या असलेल्या या बंगल्यावर सोमवारी रात्री आलेल्या आयकर खात्याच्या अधिकार्‍यांनी तिथे असलेल्या रखवालदारांना ताब्यात घेऊन झाडाझडती सुरु केली. अचानक आलेल्या या धाडीमुळे बंगल्यावर असलेली माणसे भांबावून गेली होती. सर्वांचे मोबाईल ताब्यात घेऊन पोलीस बंदोबस्तात कागदपत्र, तसेच फाईल्सची पाहणी सुरु करण्यात आली. सोमवारी रात्री सुरु असलेली झाडाझडती मंगळवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरु होती. यादरम्यान बंगल्यावरील नोकरांना मालकांसोबत संपर्क साधू दिला नाही. त्याचवेळी आपल्या नोकरांना कामानिमित्त संपर्क साधण्याचा प्रयत्न करणारे मालक दारुवाला संपर्क होत नसल्याने अस्वस्थ झाले होते. आपले काम पूर्ण केल्यानंतर आयकर विभागाची टीम परतली.

याबाबत झरीना दारुवाला यांच्या कन्या झेनुबिया फराड उनवाला-दारुवाला यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आयकर विभागाच्या धाडीबाबत आपल्याला कोणतीच पूर्वकल्पना नव्हती. त्यांची तपासणी करुन झाल्यानंतर आपल्या माणसांकरवी हा प्रकार समजला. चुकीच्या माहितीच्या आधारे ही धाड टाकण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्यांना काही आक्षेपार्ह आढळले नसून, सर्व फाईल्स त्यांनी पाहिल्या, त्यानंतर सोबत काहीही नेण्यात आले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तर, कशाच्या आधारे ही धाड टाकण्यात आली आहे, याची आम्ही माहिती घेणार असल्याचेही झेनुबिया दारुवाला यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्र्यांची भेट

दरम्यान, याच बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्यावर्षी येऊन गेले असल्याची माहिती ग्रामस्थांकडून मिळाली. त्यामुळे सध्या अजित पवार यांच्या निकटवर्तींच्या सुरु असलेल्या धाडसत्राशी याचा संबंध असावा, असा कयास बांधला जात आहे.

Updated : 10 Dec 2021 12:29 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top