Home > Max Political > कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी सरकार निवडणुकांची वाट पाहतेय का? वडेट्टीवार यांचा सवाल

कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी सरकार निवडणुकांची वाट पाहतेय का? वडेट्टीवार यांचा सवाल

कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी सरकार निवडणुकांची वाट पाहतेय का? वडेट्टीवार यांचा सवाल
X

मुंबई : कांदा निर्यातीवरील बंदी केंद्र सरकारने पूर्वीच्या घोषणेप्रमाणे ३१ मार्चपर्यंत कायम ठेवली आहे. ८ डिसेंबर २०२३ रोजी सरकारने ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यातीवर बंदी घातली होती. त्यात कोणताही बदल केंद्र सरकारने केला नाही. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार असून केंद्र सरकार शेतकरी विरोधी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याची खरमरीत टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. त्याचबरोबर निर्यातबंदी उठविण्यासाठी सरकार निवडणुकांची वाट पाहतेय काय? असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.

श्री. वडेट्टीवार म्हणाले की, स्वतःच्या सरकारने लादलेली कांदा निर्यात बंदी हटवण्यात आल्याचा जल्लोष करून स्वतः श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न राज्यातील भाजपचे मंत्री आणि नेत्यांनी केल्याचे आता उघड झाले आहे. गाजावाजा करत जल्लोष करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भ्रमित करण्याचा भाजपचा हा प्रयत्न होता का? असा सवाल श्री. वडेट्टीवार यांनी केला आहे.

निर्यात बंदी उठवण्यात आलेली नाही. सद्य:स्थितीत केंद्र सरकारच्या निर्णयात कोणताही बदल होणार नाही.असे केंद्राकडून सांगण्यात आले आहे. स्वतःच्या पक्षाने चुकीचे निर्णय घ्यावे आणि नंतर तो निर्णय बदलून शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी निर्णय घेतल्याचा आव आणणे आता भाजपने बंद करावे. निवडणूक आणि श्रेयवादाचं राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या आणि राज्यातील जनतेच्या हिताचे सरकारने निर्णय घ्यावेत. अन्यथा जनता माफ करणार नाही, असेही श्री. वडेट्टीवार यांनी सुनावले आहे.

Updated : 21 Feb 2024 1:32 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top