Home > Max Political > भाजपाच्या उत्तर भारत प्रेमाचा शिवसेनेला मुंबईत फायदा ?

भाजपाच्या उत्तर भारत प्रेमाचा शिवसेनेला मुंबईत फायदा ?

महाविकास आघाडी स्थापन झाल्यामुळं सत्तेपासून वंचित राहीलेल्या १०५ आमदारांची भारतीय जनता पार्टीनं आता सर्व लक्ष आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांवर केंद्रीत केलं आहे. शिवसेनेनेही भाजपचं आव्हानं स्विकारलं असून मनपावर आमचाच झेंडा राहील अशी गर्जना केली आहे. परंतू भाजपाच्या अलिकडच्या काळातील धोरणांमुळे मराठी टक्का दुखावला असून त्याचा अप्रत्यक्ष फायदा शिवसेनेला मराठी अस्मितेच्या नावावर मिळणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

भाजपाच्या उत्तर भारत प्रेमाचा शिवसेनेला मुंबईत फायदा ?
X

गतवर्षी विधानसभा निवडणुकीनंतर मोठ्या राजकीय घडामोडी होऊन राज्यात नव्यानं महाविकास आघाडी उदयाला आली.

परंपरागत विरोधी असलेली शिवसेना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत मुख्यमंत्रीपद घेऊन सत्तेत सहभागी झाली. १०५ आमदार निवडून आलेल्या भाजपला याचा मोठा धक्का बसला. त्यामुळं वर्षभर भाजप नेते सरकार पडेल अशा वल्गना करत होते. परंतू सर्वप्रयत्न आता अपयशी ठरल्यानं जखमी भाजपनं संपूर्ण लक्ष आगामी मुंबई महानगरपालिकेकडं वळवलं आहे.भारतीय जनता पक्षाने मुंबई महापालिका निवडणुकीसाठीचं 'भाजप येणार, मुंबई घडवणार' हे घोषवाक्य जाहीर केलं आहे. आगामीनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा मुंबई सेवा सेतूचं उद्घाटन देखील केलं आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. मध्यंतरीच्या काळात राज्यातील इतर निवडणुकांमध्ये शिवसेनेची घसरण झाली असली तरी आजवर सेनेचा मुंबई महानगरपालिकेचा किल्ला अभेद्य राहिला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नाकावर टिच्चून महानगरपालिकेची आगामी निवडणूक जिंकायचीच, असा चंग यंदा भाजपने बांधला आहे.

याबाबत मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना राजकीय विश्लेषक प्रकाश अकोलकर म्हणाले, मुंबई महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीत आक्रमक रणनीतीमुळे भाजपला चांगले यश मिळाले होते. शिवसेना आणि भाजपच्या संख्याबळात फारसे अंतर नव्हते. मात्र, त्यावेळी भाजपने आम्ही पहारेकऱ्याच्या भूमिकेत राहू असे सांगत महापौरपदाच्या शर्यतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता शिवसेनेशी युती तुटल्यामुळे भाजप यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत अत्यंत आक्रमक प्रचार करेल.

बिहार विधानसभा निवडणुकांसाठी प्रभारी म्हणुन देवेंद्र फडणवीस यांची नेमणुक झाली. त्याआधी कोरोना संकटात अर्णब गोस्वामी आणि कंगना राणौत मुंबई- महाराष्ट्राची बदनामी करत असताना भाजप मात्र त्यांचे समर्थन करत राहीला.

आज उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत येऊन बॉलिवुड उत्तरप्रदेशात नेऊ अशा वल्गना करत होती.

या सगळ्याचा परीमाण मराठी अस्मिता आणि मराठी मताचा टक्का शिवसेनेचा पदरात पडणार असल्याचं दिसत आहे.

बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या विजयामुळे महाराष्ट्रातही भाजप नेत्यांना बळ मिळाल्याचं पाहायला मिळतं आहे. भाजपने मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला सुरूवात केल्याची माहिती भाजप नेते आशिष शेलार यांनी मागील आठवड्यात दिली होती.

मुंबई महानगरपालिका हा शिवसेनेचा प्राण आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मनपातील सत्ता टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न करतील. हैदराबाद मनपा निवडणुक प्रतिष्ठेची करणारी भाजपा मुंबई मनपा निवडणुक प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांना उतरवतील, असे प्रकाश अकोलकरांना वाटते.

ज्यांनी मुंबई महानगरपालिकेत आमच्यासोबत २५ वर्षे बोरं चाखली तोच पक्ष शड्डू ठोकत असेल तर आम्ही आव्हान स्वीकारले, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. राजाचा जीव पोपटात आहे तर मग तुमचा जीव नक्की कशात अडकलाय असा सवाल त्यांनी भाजपला केला. काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वबळावर भाजपचा झेंडा फडकविण्याची घोषणा केली. त्याला शिवसेनेने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

महापालिका निवडणुकीत आम्ही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सरकारने केलेलं काम घेऊन जनतेपर्यंत जाणार आहोत. मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार असून देवेंद्र फडणवीस हे पालिका निवडणुकांवर लक्ष ठेवून असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे. शेलार म्हणाले की, शिवसेनेचा मतदार हा शिवसेनेला महापालिका निवडणुकीत सोडल्याशिवाय राहणार नाही.

यापूर्वीच्या राजकारणात कॉंग्रेसनं नेहमीच मुंबई शिवसेना आंदन देऊन महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केलं होतं. महाविकास आघाडीतलं कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेला मनपाचा झेंडा टिकवण्यासाठी कशी मदत करतात यावरही राजकीय गणितं अवलंबून राहणार आहेत. राज्यातील महाविकास सरकार पाडणं आता अशक्य असल्याची जाणीव भाजपाला झाली आहे, त्यामुळं सर्व लक्ष मुंबई मनपावर केंद्रीत कडून शिवसेनेचा प्राण (मुंबई मनपा) कोणत्याही परीस्थितीत हिसकावून घ्यायची. त्यासाठी साम-दाम-दंड- भेद आणि हवं तर हैदराबाद पॅटर्न वापरायचा अशा निश्चय भाजपं केला आहे.

Updated : 2 Dec 2020 7:15 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top