जागा वाटपात मला विश्वासात घेतलं नाही; वर्षा गायकवाडांची वरिष्ठांवर टीका
X
राज्यात लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू असताना महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या प्रक्रियेमध्ये काँग्रेस नाराज आहे. विशेष म्हणजे प्रदेश काँग्रेस विरूध्द मुंबई काँग्रेस अशा नव्या वादाला आता सुरूवात झाली आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटप होत असाताना मुंबई अध्यक्षांना विचारात न घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी पसरल्याचे पहायला मिळत आहे. याविषयी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी दिल्लीत तक्रार केली आहे. मुंबईच्या जागावाटपासंदर्भात मला विश्वासात घेण्यात आलं नाही, अशी खंत वर्षा गायकवाड यांनी आज व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्या मुंबईतून माध्यमांशी बोलत होत्या.
दरम्यान, वर्षा गायकवाड बोलताना म्हणाल्या की, आम्ही मागील काळात मुंबईतून पाच जागांवर लढायचो आणि राष्ट्रवादी एका जागेवर लढायची. पण सध्या महाविकास आघाडीमध्ये आमचापण समान वाटा आहे. जागावाटपावर मी काही प्रमाणात नाराज आहे. याविषयी मी पक्षश्रेष्टी आणि राज्यातील वरीष्ठ नेत्यांना सांगितलं आहे. निदान दोन जागा तरी आम्हाला मिळाव्यात. आमचा काहीही निर्णय असेल तो पक्ष श्रेष्ठींना कळवू. पक्षातील काही कार्यकर्त्यांच्या काही अपेक्षा असतात. पक्षाकडून काही निर्णय घेतल्यानंतर त्या स्विकाराव्या लागतात.
मुंबई काँग्रेस आणि प्रदेश काँग्रेस या दोन वेगळ्या भूमिका आहेत. मुंबईचे अस्तित्व वेगळे आहे. माझ्या वरिष्ठ नेत्यांना ही आम्ही सांगितलं आहे. चर्चा करताना संघटना म्हणून आम्हाला अपेक्षा होती की, महाराष्ट्र प्रदेशने कठोर भूमिका मांडायला हवी होती. पक्षश्रेष्ठींकडे आम्ही आमची नाराजी मांडली आहे. त्यामुळे आमच्या नेत्यांनी विचार करायला पाहिजे होतं मुंबईच्या काही जागेवर आणखी काही चांगला परिणाम घडवू आणता येऊ शकतो. दक्षिण मध्य मुंबई हा मतदारसंघ मिळावा अशी आमची भूमिका आहे, असं वर्षा गायकवाड यावेळी बोलताना म्हणाल्या.