Home > Max Political > सुषमा अंधारे यांना दोन चापटी लावल्या, ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाचं वक्तव्य, सुषमा अंधारे यांनी फेटाळला दावा

सुषमा अंधारे यांना दोन चापटी लावल्या, ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाचं वक्तव्य, सुषमा अंधारे यांनी फेटाळला दावा

राज्यामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटामध्ये विविध ठिकाणी मिळावे आणि बैठका होत आहेत. त्यातच उद्धव ठाकरे यांची 20 मे रोजी बीडमध्ये सभा होत आहे. त्यापार्श्वभूमीवर ठाकरे गटातील वाद उफाळून आला आहे. त्यातच आपण सुषमा अंधारे यांच्या कानशिलात मारल्याचा दावा ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाने केला आहे. मात्र सुषमा अंधारे यांनी हा दावा फेटाळून लावला आहे.

सुषमा अंधारे यांना दोन चापटी लावल्या, ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाचं वक्तव्य, सुषमा अंधारे यांनी फेटाळला दावा
X

ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव आणि उपजिल्हा प्रमुख गणेश वरेकर यांच्यातील मारहाणीवर शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी आपली भुमिका मांडली आहे. ते म्हणाले ‘शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या जो पैसे देईल त्यांना पद वाटत सुटल्या होत्या. माझं पद देखील त्या विकायला निघाल्या आहेत. आम्ही इथे जिल्हाप्रमुख आहोत. त्यामुळे आम्हाला विचारात घेऊन पद द्या, असे मी त्यांना सांगत होतो. त्यावेळी गणेश वरेकर आणि माझ्यात बाचाबाची झाली. यात मी सुषमा अंधारे यांना देखील दोन चापटा मारल्याचा दावा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी व्हिडीओच्या माध्यमातून केला.

ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून सुषमा अंधारे येथील कार्यकर्त्यांना ब्लॅकमेल करून विविध वस्तु मागत आहेत. त्यांच्या परळीतील कार्यालयासाठी अनेक कार्यकर्त्यांनी लेकरा बाळाच्या तोंडातला घास काढून त्यांना विविध वस्तु दिल्या. आम्ही काही देण्यास नकार दिला, की आमचं निगेटीव्ह वार्तांकन उध्दव साहेबांकडे करीत होत्या.

या संदर्भात मी स्वतः उध्दव साहेबांना थेट बोललो. त्यांच्या अशा वागणुकीच्या तक्रारी देखील केल्या. मात्र तरीही अंधारे यांचा हा प्रकार सुरूच होता. आज सभा स्टेजची पाहणी करण्यासाठी आम्ही जेव्हा गेलो. त्यावेळी अंधारे यांना मी बाजूला घेऊन या प्रकाराबद्दल जाब विचारला. त्यांना मी म्हणालो तुम्ही असे पैसे घेऊन किंमत नसलेल्या कार्यकर्त्यांना का पदे वाट आहात? त्यावरून त्यांची आणि माझी बाचाबाची झाली. त्यामुळे रागाच्या भरात मी त्यांच्या कानाखाली ठेऊन दिली. मी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख आहे. त्यामुळे स्वाभीमानानेच मी पक्षासाठी काम करणार. मला अशा प्रकारचा अन्याय सहन होत नाही. त्यांचा सगळा प्रकार अति झालेला असल्यानेच माझा नाईलाज झाल्याचे अप्पासाहेब जाधव म्हणाले.

या प्रकारानंतर आप्पासाहेब जाधव आणि गणेश वरेकर यांच्यात बाचाबाची झाली. त्यात वरेकर यांनी आप्पासाहेब जाधव यांची स्कॉर्पिओ गाडी फोडली असल्याची माहिती मिळत आहे

सुषमा अंधारे यांनी फेटाळला दावा

दरम्यान शिंदे गटाकडून काही तरी प्लॅन झालेला दिसत आहे. असा काहीही प्रकार झालेला नाही. मला मारहाण काही झाली असती तर ते जिवंत परत गेले असते का? मी आता महाप्रबोधन यात्रेवर फोकस करत आहे. अप्पासाहेब यांनी कोणाला तरी काही काम सांगितले. त्यानंतर त्यावरून दोघांचं काहीतरी टोकाचं भांडण झालं. त्या भांडणात मला मारहाण झाली वैगेरे ही माहिती चुकीची आहे. मला मारहाण झाली असती तर त्यांच्यावर मी केस केली असती. पण ते जे सांगत आहेत ती माहिती खोटी आहे, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी जिल्हाप्रमुखाने कानशिलात मारल्याचा दावा फेटाळून लावला.

मात्र यानंतर ठाकरे गटाने अप्पासाहेब जाधव यांची जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी केल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळाली आहे.

Updated : 19 May 2023 11:17 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top