Home > Max Political > महिला पोलिस कशा पडल्या? संदीप देशपांडे यांचे स्पष्टीकरण

महिला पोलिस कशा पडल्या? संदीप देशपांडे यांचे स्पष्टीकरण

राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर राज्यात भोंग्यांवरून वाद पेटला आहे. त्यातच मनसे नेते संदीप देशपांडे यांना अटक करताना महिला पोलिस पडल्याचा व्हिडीओ समोर आल्याने संदीप देशपांडे अडचणीत आले आहेत. त्यामुळे अखेर संदीप देशपांडे यांनी एक व्हिडीओ ट्वीट करत महिला पोलिस पडण्यामागे काय कारण आहे याचे स्पष्टीकरण दिले आहे.

महिला पोलिस कशा पडल्या? संदीप देशपांडे यांचे स्पष्टीकरण
X

4 मे पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवले नाही तर आम्ही त्यापुढे हनुमान चालीसा पठन करू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनी राज्यातील मनसे कार्यकर्त्यांना आता नाही तर कधीच नाही, असेही आवाहन केले होते. त्यामुळे पोलिसांनी मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना नोटीसा पाठवल्या. त्यानुसार मनसे नेते संदीप देशपांडे यांनाही नोटीस पाठवण्यात आली होती. तर या भोंगा प्रकरणात संदीप देशपांडे यांना ताब्यात घेत असताना महिला पोलिस अधिकारी पडल्याचे दृष्य मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्यामुळे संदीप देशपांडे यांच्यासमोरील अडचणी वाढल्या होत्या. मात्र या व्हिडीओबाबत संदीप देशपांडे यांनी व्हिडीओ ट्वीट करून स्पष्टीकरण दिले आहे.

मनसेने भोंग्याबाबत घेतलेल्या भुमिकेमुळे राज्यात धार्मिक तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना नोटीसा पाठवल्या आहेत. त्यातच मनसे नेते संदीप देशपांडे यांना राज ठाकरे यांच्या शिवतिर्थ या निवासस्थानाबाहेर पोलिस ताब्यात घेण्यासाठी आले असता संदीप देशपांडे तेथून पळाल्याचा दावा माध्यमांद्वारे केला जात आहे. तर संदीप देशपांडे पळून जातांना त्यांना पकडण्यासाठी गेलेल्या महिला पोलिस अधिकारी खाली पडल्या. त्यामुळे संदीप देशपांडे यांचा पाय आणखी खोलात गेला होता. त्यावर संदीप देशपांडे यांनी व्हिडीओच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले आहे.

संदीप देशपांडे म्हणाले की, मी राज ठाकरे यांच्या शिवतिर्थ या निवासस्थानाबाहेर निघालो असता त्या ठिकाणी माध्यम प्रतिनिधी आणि मनसे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. मात्र यावेळी पोलिसांनी मला घेराव घातला. त्यामुळे तुम्ही मला ताब्यात घेत आहात का? असा प्रश्न विचारला. मात्र तुम्हाला गर्दीमुळे बाजूला घेत आहोत, असे पोलिसांनी सांगितल्याचा दावा संदीप देशपांडे यांनी केला आहे. तर त्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोललो. त्यावेळीही पोलिसांनी तुम्हाला बाजूला घेत असल्याचे सांगितले. मात्र या सगळ्य प्रकारानंतर मी आणि संतोष धुरी गाडीतून निघालो. याबाबत माध्यमांच्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डिंग उपलब्ध आहेत. तसेच शिवतिर्थ या राज ठाकरे यांच्या सीसीटीव्हीमध्येही रेकॉर्डिंग आहे. त्यामुळे माझ्या गाडीचा किंवा मला पकडत असताना महिला पोलिस पडल्या नसल्याचा दावा संदीप देशपांडे यांनी केला आहे.

संदीप देशपांडे म्हणाले की, त्या ठिकाणी शिवाजी पार्क पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक असताना महिला पोलिस मला पकडण्याचे कारण काय? असा सवाल केला. त्याबरोबरच महिला पोलिस मला पकडताना नाही तर आमची गाडी तेथून निघाल्यानंतर पोलिस मागे धावताना पोलिसांचा धक्का लागून पडल्याचे सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे, असा दावा संदीप देशपांडे यांनी केला आहे.

तसेच आम्ही सरकार विरोधात बोलतो म्हणून सरकार पोलिसांवर दबाव टाकून अशा प्रकारे अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप संदीप देशपांडे यांनी केला. त्यामुळे या प्रकरणात नेमकं सत्य काय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Updated : 5 May 2022 7:48 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top