हनुमान चालिसा वाचायची असेल तर आपल्या घरी वाचावी- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
X
राज्यात सध्या हायव्होलटेज ड्रामा सुरू आहे.हनुमान चालिसा पठन करण्यासाठी राणा दाम्पत्य मुंबईत आले असून शिवसैनिकांकडून प्रखर विरोध होताना दिसतोय. त्यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकारपरिषदेत बोलताना भाष्य केलं.विरोधकांकडून जाणीवपूर्वक राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोप केला आहे.
गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, मुंबई आणि राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ही अतिशय उत्तम आहे.मात्र काही लोक यासंदर्भात कायदा आणि सुव्यस्था बिघडली आहे किंवा राहिली नाही,असं भासवण्यासाठी विविध घटनांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत.राणा दाम्पत्याच्या कुठल्याही प्रश्नांवर मला उत्तर द्यायचं नाही.परंतु मी एवढेच सांगतो की, मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री आम्ही कुणीही याबाबतीत वेगळ्या सुचना देत नाही. यासंदर्भातील सर्व निर्णय हे पोलिस आयुक्तांनी घेऊन कारवाई करायची असते आणि त्या दृष्टीने मुंबईचे पोलिस आयुक्त कारवाई करतात.
त्याचबरोबर,भोंग्यासारखा विषय काढून दोन समजात अस्वस्थता निर्माण करायची. हनुमान चालीसा कोणाला वाचायची असेल तर ज्याने त्याने आपल्या घरी वाचावी, अमरावतीच्या घरी वाचावी किंवा मुंबईतील किंवा दिल्लीतील घरी वाचावी. तो हट्टा कशासाठी की याच ठिकाणी जाऊन वाचायची.या आणि यासारख्या अनेक मग करोना काळात देखील मंदिर बंद आहेत, मंदिरं सुरू करा त्यावरून आरत्या, महाआरत्या कराच्या. असे वेगवेगळे प्रकार करून विरोधी पक्षाच्यावतीने आज राज्यात एक असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय, की या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक राहिली नाही म्हणून राष्ट्रपती राजवट लावा. पण ते इतकं सोपं नाही. या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे अबाधित आहे. असंही यावेळी गृहमंत्री वळसे पाटील यांनी बोलून दाखवलं.
गृहमंत्री पुढे असं म्हणाले, आमदार आणि खासदार यांनी कायद्याच्या चौकटीत राहून काम करायला पाहिजे आणि संविधानाच्या चौकटीत राहून काम करत असताना, आपल्यामुळे कुठल्याही प्रकारची अशांतता निर्माण होणार नाही, कुठल्याही प्रकारचा क्षोभ वाढणार नाही, तेढ वाढणार नाही. अशाप्रकारची त्यांची वर्तवणूक असायला पाहिजे परंतु, अशाप्रकारे न ठेवता आज विनाकारण अशाप्रकारे पब्लिसिटी करणे हे एक पुढे केलेलं प्यादं आहे.
.राणा दांपत्याने ठाकरे कुटुंबीयांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर येऊन हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिल्यापासून शिवसैनिक आक्रमक झाले. राणा दांपत्याने शनिवारी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर नऊ वाजताच राणा यांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर असलेले बॅरिकेट्स तोडून शिवसैनिक इमारतीत घुसले आहेत. शिवसैनिकांना रोखण्याचा प्रयत्न यावेळी पोलिसांकडून करण्यात आला. मात्र नवनीत राणा आणि रवि राणा मातोश्री बाहेर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.