"सत्ताधारी, सोरेन आणि विरोधकांचे मरण.."
X
विवेक ठाकरे, मुंबई
विरोधकांचा विरोध संपवण्यासाठी सत्ताधारी टोकाला पोहोचले आहेत. "इंडिया आघाडीची" घडी बसत असतानाच लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया अधिक गतिमान झाली आहे. आधी महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पाडून उद्धव ठाकरेंचा पक्ष संपवला. राष्ट्रवादीला फोडून अजित दादा आरोपित गट व्यापक राष्ट्रहितासाठी कडव्या राष्ट्रहितवादी पक्षाबरोबर सत्तेत सहभागी करत पवित्र करून घेतला. बिहारचे पल्टीकुमार मुख्यमंत्री नितीशबाबू यांनी उद्धव ठाकरे प्रकरणापासून धडा घेत वेळीच शक्तिमान सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या मुख्यमंत्री पदासह पक्षालाही जीवदान (तात्पुरते) मिळाले.
झारखंडचे लोकप्रिय मुखमंत्री हेमंत सोरेन यांना सर्व मार्गांनी वाकवून सर्वशक्तिमान पक्षासोबत घेण्याचे शेवटपर्यंत प्रयत्न झाले. पण "पुष्पा"फेम सोरेन यांनी "झूकेगा नही साला" म्हणत जेलमध्ये जाणे पसंत केले. मुखमंत्री सोरेन यांच्यावर साडे आठ एकरचा जमीन घोटाळा केल्याचे आणि त्यांच्या निवासस्थानी 40 लाख रुपये सापडल्याचा आरोप आहे. एक कोळसा खाणही आपल्याकडे घेतल्याचा आरोप आहे. झारखंडमध्ये आता सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा कोळसा करणे सुरु राहणार आहे.
सोरेन यांची जेलवारी सुरु असतानाच तिकडे दिल्लीचे लोकप्रिय मुखमंत्री अरविंद केजरीवालही सुपात आहेत. कुठल्याही क्षणी ईडी आपला फास आवळून केजरीवालांना जेलमध्ये धाडतील अशी परिस्थिती आहे. आधीच केजरीवालांचे अनेक मंत्री, आमदार, खासदार जेलमध्ये आहेत. मद्य योजनेत घोटाळा केल्याचा या सर्वांवर आरोप आहे. देशाचे नाक असलेली दिल्ली आपण जिंकू शकत नाही याची भयानक सल सर्वशक्तिमान पक्षाला असणार आहे. त्यामुळे काहीही करून दिल्ली जिंकायचीच अशी सत्ताधाऱ्यांची मानसिकता आहे.
तिकडे पश्चिम बंगालमध्येही ममता बॅनर्जी सरकारला सुरुंग लावायची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळेच ममता "इंडिया"च्या राहुल गांधींप्रणित रथयात्रेला विरोध दर्शवून आपण वेगळे असल्याचा संदेश देत आहेत. बिहारी बाबू अखिलेशही ईडीच्या रडारवर असून त्यांनाही प्रेमाने बोलावणे सुरु आहे. अशा प्रकारे इंडियाची घडी बसत असतानाच "इंडियाचा खेल" खतम करण्याचे डावपेज यशस्वी होताना दिसत आहेत. भारतीय लोकशाहीसाठी विरोध संपवण्यापेक्षा विरोधक संपवण्याची कामगिरी घातक ठरू शकते.
असो, आदरणीय मोदी साहेबांनी आपल्या पक्षातच कोणी विरोधक शिल्लक ठेवले नाहीत, तेथे विरोधकांची काय तऱ्हा..!!!
असेच होत राहिले तर लोकशाहीत लढण्याची ऊर्जा आणि जिंकण्याची मजाच शिल्लक राहणार नाही. लोकांच्या बोटावरच्या शाहीपर्यंतच लोकशाही मर्यादित राहणार..!!!!
- विवेक ठाकरे, मुंबई
८८८८८७८२०२