'राहुल गांधींशी संपर्क साधणं खुपच कठीण', भाजप प्रवेश केलेल्या गोविंददास कोंथऊजम यांची राहुल गांधींवर टीका
X
भाजपमध्ये प्रवेश केलेले मणिपूर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गोविंददास कोंथऊजम यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या नेत्यांवर टीका केली आहे. मणिपूर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष असलेले गोविंददास कोंथऊजम यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच गोविंददास कोंथौजम यांनी काँग्रेसच्या त्यांच्या नेतृत्वाला त्यांच्या अकार्यक्षमतेसाठी जबाबदार धरले. त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या नेत्यांवर टीका केली.
भाजप मुख्यालयात पत्रकारांना संबोधित करताना गोविंददास कोंथऊजम म्हणाले,
"मला काँग्रेसचं उज्ज्वल भविष्य दिसत नाही. काँग्रेस नेते राहुल गांधींसह एआयसीसीच्या प्रमुख नेत्यांशी संपर्क साधणं खुपच कठीण आहे. आम्ही राहुल गांधी यांना भेटण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहिली. मला वाटलं की मी इथे काम करू शकणार नाही."
यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचं त्यांनी भरभरून स्तुती केली. पंतप्रधानांची प्रशंसा करताना ते पुढे म्हणाले,
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही देशात बरेच बदल पाहत आहोत, सर्वांनाच ते माहित आहे... आम्हाला देशात प्रगती आणि विकासाची गरज आहे. म्हणूनच, मी आता इथे आहे."
गोविंददास कोंथऊजम यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह आणि वरिष्ठ नेते संबित पात्रा यांच्या उपस्थितीत भाजपवासी झाले.
२८ जुलै ला विष्णुपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार आणि मणिपूर कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गोविंददास कोंथऊजम यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यांचा राजीनामा बुधवारी विधानसभेच्या सचिवांच्या कार्यालयात सादर करण्यात आला होता.
कॉंग्रेस अडचणीत
गोविंददास हे पूर्वेकडील राज्यांमधले आणि विशेषत: मणिपूरमधले महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्या विष्णुपूर मतदारसंघातून ते ६ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. मणिपूर विधानसभेची एकूण सदस्यसंख्या ५६ आहे. यापैकी भाजपाकडे २५ जागा असून काँग्रेसकडे १७ जागा होत्या. मात्र, आता गोविंददास यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचं संख्याबळ १६ वर आलं आहे.