आजही माझा सल्ला घेतला जातोय - शरद पवार
X
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नुकतीच पुणे इथं गुप्त बैठक झाली. या बैठकीनंतर पहिल्यांदाच शरद पवारांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
औरंगाबाद इथं आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. अजित पवारांसोबतच्या बैठकीत केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर दिल्याचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवार म्हणाले, “ त्या गुप्त बैठकीत केंद्रीय मंत्रीपदाची ऑफर वगैरे अशा काही गोष्टींची चर्चाच झाली नाही. ते मी जाहीरपणेही सांगितल्याचं पवार यांनी सांगितलं. त्यांची (अजित पवार) आणि माझी भेट झाली नाही, असं नाही. ते मला भेटायला आले. मी आमच्या पवार कुटुंबाचा प्रमुख आहे. त्यामुळं कौटुंबिक प्रश्न किंवा मुद्दा असेल तर आमच्या कुटुंबात एक पद्धत आहे. एकदा कुटुंबातील सदस्य माझा सल्ला घेतात. त्यासाठी कुणी आलं असेल तर त्याबाबत अधिक काही समजायचं कारण नाही, असं सांगत पवारांनी त्या गुप्त बैठकीबद्दल सुरू असलेल्या राजकीय वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीतील वादावर प्रतिक्रिया देत शरद पवारांच्या भोवतीचं संशय निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यावर शरद पवार म्हणाले, राज ठाकरे यांनी काही दावा केला असेल तर त्यासंदर्भात त्यांनाच विचारा. मी त्यांचा प्रवक्ता नाही, असं म्हणत त्या विषयालाही पूर्णविराम दिला.
राष्ट्रवादीतल्या काही नेत्यांनी महायुती सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, त्याबाबतही शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पवार म्हणाले, “ आमचे काही सहकारी गेले. त्यांच्यापैकी काही जण मला भेटले. त्यांनी एक नवीनच माहिती मला दिली. देशात राजकीय निर्णय हे राजकीय पक्ष, त्यांचे नेते घेतात असं मला वाटतं होतं. मात्र, माझ्या काही सहकाऱ्यांनी राजकीयदृष्ट्या वेगळा निर्णय घेण्याआधी माझी भेट घेतले होते. तेव्हा मला एक नवीनच माहिती मिळाली. आता राजकीय पक्ष असो किंवा राजकीय नेते त्याहीपेक्षा एक पवनशक्ती, जिच्यामध्ये ED आहे. ती ईडीच हे निर्णय घेते असं आता दिसायला लागलंय. याच ED ने कुणाच्या बाबतीत कधी निर्णय घेतले याविषयी माहिती नसल्याचं पवारांनी सांगत ED आणि राष्ट्रवादीतल्या बंडखोरीचा अप्रत्यक्ष संबंध असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला.