दलितांची मतं हवीत पण नेतृत्व नको; उध्दव ठाकरेंवर शिंदेसेना खा. मिलिंद देवरांचा आरोप
X
लोकसभा निवडणूकीसाठी राज्यात शिवसेना (ठाकरे गट) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांची महाविकास आघाडी निवडून येऊन सत्तेत जाण्यासाठी कटीबध्द आहे परंतु अशातच दक्षिण मध्य मुंबई हा खुल्या प्रवर्गातील मतदारसंघ आहे. त्यामुळे इथुन काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाडांच्या रुपाने दलित चेहरा दिल्यास नुकसान होऊ शकते, असं उध्दव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांना सांगितल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी केला. यासंदर्भात त्यांनी आपल्या एक्स हँन्डलवरून पोस्ट शेअर करत उध्दव ठाकरेंसह काँग्रेसच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला.
सदरील पोस्टमध्ये देवरा म्हणाले की, दक्षिण मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना तिकीट न देणे यातून काँग्रेस आणि उबाठा गटाची दलितांविरोधी मानसिकता काय आहे हे दिसुन येते. उबाठा गट महाराष्ट्रातून २१ जागांवर निवडणूक लढवत आहे. परंतू त्यात केवळ एका जागेवर उबाठा दलित उमेदवराला संधी दिली आहे.
दरम्यान, मिलिंद देवरा म्हणाले की, निवडणूकीत दलित समाजाची मत मिळविण्यासाठी यांची धडपड असते पण दलित समाजाला नेतृत्व देण्यासाठी यांची मानसिकता नाही. अशी दुटप्पी भूमिका उबाठा गटाची दिसून येते. माझ्याकडे माहिती आहे की, उध्दव ठाकरे यांनी काँग्रेसला असे कळवले की, वर्षा गायकवाड यांना खुल्या जागेवर खुल्यावर तिकीट दिले तर दलित असल्यामुळे त्यांचा पराभव होईल. एक सुशिक्षित, सक्षम राजकारणात आपल्या कामगिरीने ठसा उमटवणाऱ्या वर्षा गायकवाड यांच्याबाबत जे राजकारण होत आहे, ते अत्यंत दुर्दैवी आहे. अशा मानसिकतेचा मी विरोध करतो, असं मिलिंद देवरा यांनी आपल्या ट्विटरमध्ये म्हटले आहे.