Home > Max Political > सतिश उकेंच्या आडून मला व काँग्रेसला बदनाम करण्याचे षडयंत्र!: नाना पटोले

सतिश उकेंच्या आडून मला व काँग्रेसला बदनाम करण्याचे षडयंत्र!: नाना पटोले

सतिश उकेंच्या आडून मला व काँग्रेसला बदनाम करण्याचे षडयंत्र!: नाना पटोले
X

नागपूरचे वकील सतिश उके यांना ईडीने अटक केल्यानंतर नाना पटोले यांच्या वकीलाला अटक असा अपप्रचार केला जात आहे. राज्यात काँग्रेस पक्षाला समर्थन वाढत असल्याने जाणीवपूर्वक माझी व काँग्रेस पक्षाची बदनामी केली जात आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणाच्या माध्यमातून दबावतंत्र वापरले जात आहे. राजकीय विरोधकांना टार्गेट करत असतानाच आता त्यांच्याशी संबंधित लोकांवरही कारवाई केली जात आहे. नागपूरचे विधिज्ञ सतीश उके यांनी भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांच्या तक्रारी केल्या असून त्यातील काही प्रकरणात भाजपाचे नेते कायद्याच्या कचाट्यात अडकू शकतात. म्हणूनच ईडीच्या मार्फत त्यांच्यावर षडयंत्र रचून कारवाई केली त्यासाठी मुंबईचे ईडी पथक नागपुरात आणून तसेच केंद्रीय पोलीस दल आणून ही कारवाई केली. या कारवाईवेळी नागपूर ईडी व पोलिसांनाही अंधारात ठेवण्यात आले. सतीश उके यांनी अनेक महत्वाच्या प्रकरणात न्यायालयात बाजू मांडली आहे. ईडीने त्यांच्यावर कारवाई केल्यानंतर मात्र सतिश उके हे फक्त नाना पटोले यांचेच वकील आहेत असे चित्र निर्माण करुन माझी बदनामी केली जात आहे पण त्यात ते यशस्वी होणार नाहीत.

शेअर मार्केट घोटाळा करणारा हर्षद मेहताचे वकीलपत्र भाजपाचे नेते व माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी घेतले होते. वाजपेयी सरकारमध्ये मंत्री राहिलेले राम जेठमलानी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांचे वकीलपत्र घेतले होते तसेच संसद हल्ल्यातील दोषी दहशतवादी अफजल गुरुचेही वकीलपत्र जेठमलानी यांनी घेतले होते. माझा आणि सतिश उके यांचा संबंध लावला जात असेल तर मग त्याच न्यायाने राम जेठमलानी व अरुण जेटली यांचाही संबंध लावायचा का? असा प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला.

राज्यात काँग्रेस पक्षाला सर्वच स्तरातून पाठिंबा वाढत आहे. एससी, एसटी, ओबीसी समाजासह सर्वच घटकांचे काँग्रेसला समर्थन वाढत आहे. काँग्रेसला मिळणारे हे वाढते समर्थन भारतीय जनता पक्षाला अडचणीचे ठरत असल्याने सतीश उकेंच्या कारवाईच्या आडून मला व काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे पण आम्ही अशा बदनामीला घाबरत नाही, असेही पटोले म्हणाले.

Updated : 1 April 2022 7:23 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top