Home > Max Political > सभापती धनखड आणि TMC खासदार ओब्रायन यांच्यात खडाजंगी

सभापती धनखड आणि TMC खासदार ओब्रायन यांच्यात खडाजंगी

दिवसभरासाठी राज्यसभेचं कामकाज केलं स्थगित मणिपूरच्या घटनेवर पंतप्रधानांनी संसदेत निवेदन करावं – डेरेक ओब्रायन ओब्रायन ‘ड्रामा’ करणं ही तुमची सवय झालीय – जगदीश धनखड

सभापती धनखड आणि TMC खासदार ओब्रायन यांच्यात खडाजंगी
X

तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार डेरेक ओब्रायन आणि सभापती जगदीश धनखड यांच्यात सातत्यानं खडाजंगी उडत असते. यावर्षी संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही मणिपूरच्या मुद्द्यावरून या दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. शुक्रवारी (दि. २८ जुलै) राज्यसभेतलं कामकाज सुरू झाल्यानंतर सभापती धनखड हे मणिपूरच्या अनुषंगानं बोलत असतांना तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन हे त्यांच्या बोलण्यात अडथळा निर्माण करत होते. दरम्यान गोंधळ सुरू झाल्यानंतर धनखड यांनी दिवसभरासाठी कामकाज स्थगित केल्याची घोषणा केली.

मणिपूर हिंसाचाराच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशनाच्या आधी माध्यमांसमोर भूमिका मांडली. मात्र, मोदींनी संसदेत भूमिका मांडावी, अशी मागणी विरोधकांनी अधिवेशनाच्या सुरूवातीपासूनच दोन्ही सभागृहात लावून धरली. याच मुद्द्यावर आज राज्यसभेत कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर सभापती धनखड यांनी मणिपूरच्या मुद्द्यावर बोलायला सुरूवात केली. ते म्हणाले, “मला आज ४७ नोटीसा मिळाल्या आहेत. या नोटीसा म्हणजे सर्व सदस्यांच्या मणिपूरसंदर्भातील भावना आहेत. याविषयावर अल्पकालीन चर्चा होईल, असं मी आधीच सांगितल्याचं धनखड यांनी सभागृहाला सांगितलं. केंद्र सरकार देखील याविषयी चर्चेला तयार आहे. त्यामुळं सर्व सदस्यांना विनंती आहे की, आपल्या सभागृहातील कृतींमुळं नागरिकांना प्रेरणा मिळायला हवी, असं धनखड यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, सभापती जे सांगत आहेत, ते आम्हांला माहिती आहे, मी नियमाला धरूनच बोलतोय, असं सांगत खासदार ओब्रायन यांनी जोरात टेबल वाजवला. ओब्रायन यांच्या या कृतीला सभापतींनी आक्षेप घेतला. ओब्रायन, तुम्ही जर नीट ऐकलं तर तुम्हांला मी काय सांगत आहे ते कळेल. असा ड्रामा करणं ही तुमची सवयच झालीय. प्रत्येक वेळी तुम्ही तेच करत आहात. तुम्हांला वाटतं की हा तुमचा विशेषाधिकार आहे. तुम्ही एक करा, सभापतीपदाचा थोडा आदर ठेवा. दरवेळी उठून तुम्ही ड्रामा करता, हे आपण सहन करू शकत नाही, असं सांगत दिवसभरासाठी राज्यसभेचं कामकाज स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

Updated : 29 July 2023 10:24 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top