मोदींवर टीका करण्याआधी स्वतःची कारकीर्द पाहा, चंद्रशेखर बावनकुळे यांचे शरद पवार यांना प्रत्युत्तर
X
शरद पवार यांनी पत्रकार परिषदेतून पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्याला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
देवेंद्र फडणवीस यांची जी अवस्था झाली आहे तिच अवस्था पंतप्रधान मोदी यांची होणार असल्याचे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. त्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे.
यावेळी बावनकुळे म्हणाले, ज्या शरद पवार यांना आपल्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा टिकवता आला नाही ते शरद पवार आज पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल बोलत आहेत. त्यांच्यावर टीका करत आहेत. मात्र तुम्ही राजकारण करताना कायम साडेतीन जिल्ह्यांचाच विचार केला. आज भाजप देशातल्या कुठल्या राज्यात आहे आणि कुठे नाही हे गणित तुम्ही सांगत आहात. एवढंच नाही तर मोदी पुन्हा येणार नसल्याचं वक्तव्य तुम्ही केलं. पण तुमचं भाकीत खरं होणार नाही.
देशातील जनता ही मोदींच्या पाठीशी आहे. त्यामुळे दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापुर्वी आपली कारकीर्द तपासून पाहा, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले.