OBC Reservation : उग्र आंदोलनाची भाजपची तयारी? भाजप आमदाराचा व्हिडिओ व्हायरल
X
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपने आक्रमक भूमिका घेतलेली आहे. 6 जून रोजी म्हणजेच शनिवारी भाजपने राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. राज्यभरातील भाजप नेते आणि कार्यकर्ते ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर रस्त्यावर उतरणार आहेत. पण आता हे आंदोलन पेटवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे कारण कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरताना टायर घेऊन यावे, चक्काजाम करावा असे आदेश भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
कल्याण डोंबिवलीसह जवळपासच्या इतर भागात हे आंदोलन कशाप्रकारे केले जाईल याचे नियोजन करण्यासाठी भाजपकडून एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. पण कार्यकर्त्यांनी आंदेलन कसे करायचे हे सांगताना सरकारचे या आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी उग्र आंदोलन करण्याच्या सूचना ते देत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते आहे.
लपून छपून टायर घेऊन या. चक्काजाम करा, टायर कशासाठी आणला जातो हे सांगण्याची गरज नाही. चक्का जाम करण्यासाठी त्याचा वापर करा असे ते सांगताना दिसत आहेत. त्यामुळे भाजपने खरंच उग्र आंदोलनाची तयारी केली आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता सरकार हे आंदोलन कशाप्रकारे हाताळते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.