अजित पवारांच्या CBI चौकशीचा भाजपचा ठराव, गृहमंत्र्यांचे उत्तर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या CBI चौकशीचा ठराव भाजपने केल्यानंतर राज्य सरकारने आता भाजपला इशारा दिला आहे.
X
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची CBI चौकशी मागणी भाजपने केली आहे. तसा ठरावच भाजपच्या गुरूवारी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. परमवीर सिंह यांनी लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर देशमुख यांनी राजीनामा दिला. पण याच प्रकरणात अजित पवार आणि अनिल परब यांचे नाव येऊनही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही, असा आरोप भाजपने केला आहे. त्याचमुळे अजित पवार आणि अनिल परब यांची सीबीआय चौकशी कऱण्याची मागणी भाजपने केली आहे.
गृहमंत्र्यांचे भाजपला उत्तर
यासंदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. संपूर्ण प्रकरणाचा तपास संबंधित यंत्रणा करत आहे. पण विरोधकांतर्फे चुकीच्या वेळेला चुकीच्या गोष्टी केल्या जात आहेत. कोरोनाचे संकट गंभीर आहे, त्याच्याशी लढण्याचे सोडून विरोधक राजकारण करत असल्याची टीका त्यांनी केली आहे. तसेच कुणी काहीही मागणी केली म्हणून चौकशी होत नाही, CBIचौकशीसाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते, हे लक्षात ठेवावे असेही वळसे पाटील यांनी भाजपला सुनावले आहे. दरम्यान अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने टाकलेल्या छाप्यांबाबत आपण जास्त बोलणार नाही, हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे असेही त्यांनी सांगितेल.
विरोधकांना त्रास देण्यासाठी केंद्रीय यंत्रणांच्या वापराची SOP – सुप्रिया सुळे
तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही अनिल देशमुखांवरील कारवाई आणि अजित पवारांच्या चौकशीच्या मागणीचा समाचार घेतला आहे. राजकारण हे विचारांचे असते आणि लोकांच्या सेवेसाठी असते. पण
आजपर्यंत या देशात केंद्रीय यंत्रणांचा वापर आपल्या विरोधकाच्या विरोधात झालेला पाहिला नाही आणि ऐकलेला देखील नाही. पण यंत्रणांचा गैरवापर ही स्टाईल ऑफ ऑपरेशन दिसत आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. महाराष्ट्रात असे राजकारण तर कधी होत नाही. महाराष्ट्रात सत्तेचा गैरवापर कधीही विरोधकांना त्रास देण्याकरीता झालेला नाही, पण ही नवीन एसओपी भाजपने केल्याची टीका त्यांनी केली आहे.