लालू प्रसाद यादव vs कन्हैया कुमार, बिहारमध्ये काँग्रेस - आरजेडी युती तुटली...
X
बिहार मध्ये दोन विधानसभेच्या जागेवर होणाऱ्या पोटनिवडणूकी अगोदरच महायुती तुटल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांवर पाहायला मिळत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाने या दोनही जागांवर आपला दावा केला आहे. यासंदर्भात महायुतीची सद्यस्थिती नेमकी काय आहे यावर आरजेडी सुप्रिमो लालू प्रसाद यादव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेसवर शाब्दिक हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाले लालू प्रसाद यादव?
बऱ्याच वर्षांनी मी पटनाला चाललो आहे. बिहारमधल्या कुशेश्वलरस्थारन आणि तारापुर या दोन विधानसभेच्या जागेवर पोटनिवडणूक आहे. तिथेही जाण्याचा प्रयत्न मी करणार आहे. डॉक्टरांनी १ महिन्याची औषध देऊन सुट्टी दिली आहे. १ महिन्यांनंतर पुन्हा यायचं आहे.
यावेळी पत्रकारांनी आरजेडी आणि काँग्रेसच्या युतीसंदर्भात प्रश्न केला असता, लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं की, युती काय असते. क्या आहे काँग्रेसची युती? हारण्यासाठी काँग्रेसला पोटनिवडणुका होत असलेल्या जागा द्यायच्या का? डिपोझिट जप्त झालं असतं.
दरम्यान लालू यादव यांचं वक्तव्य गेल्या वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात होतं. या निवडणुकीत महागठबंधनने काँग्रेसला 70 जागा दिल्या होत्या. मात्र, यापैकी केवळ 17 जागा काँग्रेसला जिंकता आल्या. तेव्हापासून राजदच्या वतीने अनेकदा बिहारमध्ये कॉंग्रेसच्या खराब कामगिरीमुळे सरकार स्थापन करण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात येतो.
दरम्यान, काँग्रेससोबत युती तोडून आरजेडी भाजपासोबत युती करणार असल्याचं काँग्रेस प्रवक्ते भक्त चरण दास यांनी म्हटलं आहे. यावर तुम्ही काय म्हणता? असा सवाल पत्रकारांनी केला असता. लालू प्रसाद यादव यांनी बिहार स्टाईलमध्ये भक्त चरण दासवर टीका करत भक्तचरण भकचोंहर असं म्हणत भोजपूरी शिवी चा वापर करत उत्तर दिलं आहे.
दरम्यान लालू यांचं हे उत्तर दोन दिवसांपूर्वी कन्हैया कुमार यांनी केलेल्या वक्तव्या संदर्भात होते. कन्हैया कुमारनेभक्तचरण दास कोण आहेत, हे लालू यादव यांना विचारा. असा सवाल केला होता. यावर लालू यादव यांनी पत्रकारांना उत्तर दिलं आहे.
लालू प्रसाद यादव यांनी कुटूंब कलहावर भाष्य करताना सांगितले आहे की, आमच्या कुटुंबात काही वाद नाही. सगळं व्यवस्थित आहे. तेजप्रताप आणि तेजस्वी यादव दोन्ही माझे मुलं आहेत. असं लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेस- आरजेडी युती तुटल्याच्या बातम्या असताना लालू प्रसाद यादव यांनी थेट काँग्रेसचा यावर अधिकार नसल्याचं स्पष्ट करत आपण या जागा जिंकणारचं असं म्हटलं आहे. जर आरजेडीने या दोन्ही जागा जिंकल्या तर काँग्रेसला अडचण निर्माण होऊ शकते.
पोटनिवडणुक कधी होणार?
बिहारमधील कुशेश्वेरस्था न आणि तारापुर विधानसभा जागेवर 30 ऑक्टोबरला मतदान केलं जाणार आहे. याचा निकाल २ नोव्हेंबरला जाहीर करण्यात येणार आहे.