उद्धव ठाकरे यांचे टेंन्शन वाढलं, पक्ष प्रमुखपदाचा कार्यकाळ २३ जानेवारीला संपणार...
X
एकीकडे शिवसेना पक्ष नेमका कुणाचा? यावरुन वाद सुरु असताना आता ठाकरे गटाचे टेंन्शन वाढवणारी नविन बातमी समोर आली आहे. कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पदाचा कार्यकाळ येत्या २३ जानेवारीला संपणार आहे. त्यामुळे आता पक्षप्रमुखांचे काय होणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. २३ तारखेला उद्धव ठाकरे यांची संघटनात्मक प्रमुख पदाची मुदत संपत आहे. तर संघटनात्मक निवडणुकीसाठी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे विनंती केली आहे.
निवडणुक आयोगासमोर उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची कायदेशीर लढाई सुरु आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ संपत आहे. २३ जानेवारी २०१८ मध्ये कार्यकारणीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुखपदी निवड करण्यात आली होती. ही निवड ५ वर्षासाठी असते. ही मुदत २३ जानेवारी २०२३ रोजी संपत आहे. निवडणुक आयोग यावर आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागून राहिले आहे.
खरी शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाला मिळणार? याबाबत शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी निवडणुक आयोगासमोर शिवसेनेवर दावा सांगताना म्हत्त्वपूर्ण युक्तीवाद केला आहे. त्यामध्ये शिंदे गटाच्या वकिलांनी थेट उद्धव ठाकरे यांचे शिवसेना पक्षप्रमुख पदच बेकायदेशीर असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे यावरुन आता नविन वादाला तोंड फुटले आहे. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी निवडणुक आयोगासमोर युक्तीवाद करताना काही मुद्दे मांडले आहे. त्यामध्ये जेठमलानी यांनी सांगितले आहे की, शिवसेना पक्षाची घटना ही बाळासाहेब ठाकरेंनी तयार केली होती. ते हयात असताना उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे कार्यध्यक्षपद देण्यात आले होते. मात्र बाळासाहेबांच्या निधनानंतर घटनाबाह्य पद्धतीने शिवसेना पक्षप्रमुखपदाची निर्मिती करण्यात आली. तसेच २०१९ साली पक्षातील कोणत्याही नेत्याला विश्वासात न घेता उद्धव ठाकरेंनी पक्षसंघटनेत अनेक बदल केले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे पक्षप्रमुख हे पदच बेकायदेशीर असल्याचा दावा शिंदे गटांकडून करण्यात आला आहे.
उद्धव ठाकरे गटासाठी पक्ष प्रमुख पदाची निवडणुक ही महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे सर्वाधिक आमदार आणि खासदार आपल्या सोबत असल्याचे सांगितले आहे. जर एकनाथ शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काही खेळ केला आणि बहुमत उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गेले तर ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणुक आयोगाने याबाबत काहीही बोलण्यास सध्या नकार दिला आहे. या निवडणुकीबाबत निवडणुक आयोग एक आठवड्यानंतर निर्णय घेणार आहे.