शरद पवारांच्या भेटीवर बच्चू कडू म्हणाले... बऱ्यात गोष्टी उघड करायच्या नसतात
X
राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी आमदार बच्चू कडू यांच्या घरी भेट दिली. यावेळी शरद पवार यांना संत गुलाबराव महाराज यांचं ग्रंथ आणि संत तुकाराम महाराजांची प्रतिमा भेट देऊन बच्चू कडू आणि नयना कडू यांनी शरद पवार यांचं स्वागत केलं. शरद पवार आणि बच्चू कडू यांच्या भेटीवर राजकीय चर्चा रंगली आहे. दरम्यान या भेटीवर आता बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आमदार बच्चू कडू म्हणाले की " शरद पवार यांच्यासोबत थोडी राजकीय आणि सामाजिक चर्चा झाली. पण जास्त चर्चा ही शेती या विषयावर झाली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दरम्यानं यावेळी ते म्हणाले की बऱ्याच गोष्टी उघड करायच्या नसतात, तेवढ तारतम्य ठेवावं लागतं. पेरणी ते कापणीपर्यंत सगळी काम हे रोजगार हमी योजनेत व्हावे. हे तुमच्या अजेंड्यामध्ये असावे अशी चर्चा झाल्याचं बच्चू कडू यांनी सांगितले.
महाविकास आघाडीत जाण्यावर कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नसल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे. ती एक भेट होती, दुसऱ्या कोणत्याही विषयावर चर्चा झाली नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत महायुतीमधून कुठेही जाणार नाही असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
आमच्या भेटीचे काहीही संकेत नाहीत. त्यांनी आमंत्रण स्वीकारलं ते महत्त्वाचं आहे. ते देशाचे नेते आहे. काही राजकीय चर्चा झाली तरी ते सांगण्याचे काही कारण नाही. बऱ्यात गोष्टी उघड करायच्या नसतात, तेवढं तार्तम्य ठेवलं पाहिजे, असंही ते पुढे म्हणाले आहेत.