Home > Max Political > अब्दुल सत्तार मंत्री आहे की गुंड? मुख्यमंत्री कारवाई करण्याची हिम्मत दाखवतील का? : अतुल लोंढे

अब्दुल सत्तार मंत्री आहे की गुंड? मुख्यमंत्री कारवाई करण्याची हिम्मत दाखवतील का? : अतुल लोंढे

अब्दुल सत्तार मंत्री आहे की गुंड? मुख्यमंत्री कारवाई करण्याची हिम्मत दाखवतील का? : अतुल लोंढे
X

पणन, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री अब्दुल सत्तार यांचा आणखी एक मस्तवालपणा महाराष्ट्राच्या जनतेला पहायला मिळाला. वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमात काही तरुणांनी हुल्लडबाजी केली, त्यांना आवरण्यासाठी या मंत्री महाशयांनी पोलिसांना थेट लाठीचार्ज करण्याचेच आदेश दिले. धक्कादायक म्हणजे “या लोकांना कुत्र्यासारखं मारा, त्यांचं कंबरडे मोडा, एक हजार पोलिसांचा बंदोबस्त असून ५० हजार लोकांना मारायला काय हरकत आहे?” असे सत्तार म्हणतात. हा अब्दुल सत्तार मंत्री आहे की गुंड? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मुजोर सत्तारवर कारवाई करण्याची हिम्मत दाखवतील काय? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी विचारला आहे.

मंत्री अब्दुल सत्तार व शिंदे सरकारचा समाचार घेत अतुल लोंढे पुढे म्हणाले की, भाजपाप्रणित शिंदे सरकार आल्यापासून सत्ताधारी मंत्री, आमदार, खासदार यांचा मस्तवालपणा वाढला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा पणन, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री अब्दुल सत्तारांनी सिल्लोड या ठिकाणी गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमात काही तरुणांनी हुल्लडबाजी केली. आपण आयोजित केलेल्या कार्यक्रमात गोंधळ होत आहे हे पाहून मंत्री महाशय संतापले व थेट लाठीहल्ला करण्याचा आदेश दिला व पोलिसांनीही लाठीहल्ला केला. महाराष्ट्राचे पोलीस मंत्र्याच्या वाढदिवसाच्या बंदोबस्तासाठी आहेत का? अब्दुल सत्तारांची भाषा पाहता ते मंत्रीपदावर राहण्याच्या लायकीचे नाहीत पण अशा मुजोर मंत्र्यांवर कारवाई करण्याचे धाडस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यात नाही. मंत्री अब्दुल सत्तार हे वादग्रस्त आहेत, टीईटी घोटाळ्यात त्यांचे नाव आले होते, ३७ एकर गायरान जमीन घोटाळा, कृषी मंत्री असताना बोगस धाडी टाकून वसुली करण्यात सत्तारांच्या पीएचे नाव समोर आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबतही सत्तार यांनी गलिच्छ भाषा वापरली होती. अब्दुल सत्तार हे नेहमीच त्यांची सत्तेची मस्ती दाखवून देतात पण आता अशा मुजोर, मस्तवाल सत्तारांना घरी बसवून जनताच त्यांची सत्तेची मस्ती उतरवेल, असे अतुल लोंढे म्हणाले आहेत .

Updated : 4 Jan 2024 6:24 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top