एप्रिल फुल आपल्याकडे "अच्छे दिन" म्हणून साजरा होतो, आदित्य ठाकरेंची मोदींवर टीका
X
जगात इतर ठिकाणी एप्रिल फुल वेगळ्या अर्थाने साजरा करतात, तर आपल्याकडे एप्रिल फुल "अच्छे दिन" म्हणून साजरा केला जातो. २०१४ पासून देशात काय कामे झाली हे सर्वांना माहित आहे, अशी खोचक टिका शिवसेना नेते आदित्या ठाकरे यांनी केली.
यवतमाळ-वाशिम मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख यांचा नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी आदित्य ठाकरे यवतमाळमध्ये आले असता माध्यम प्रतिनिधींनी बोलत होते. महायुतीकडून अद्याप यवतमाळ-वाशिम मतदारसंघात उमेदवार जाहीर केला नाही. इथे भ्रष्ट उमेदवार देणार आहेत?, की नविन चेहरा? हा प्रश्न आहे...! असं म्हणत त्यांनी महायुतीच्या पक्षनेत्यांवर जोरदार टीका केली.
दरम्यान ठाकरे म्हणाले की, गद्दारी आणि बंडखोरी यामध्ये फरक असतो. रामटेकमधून कृपाल तुमाने यांची उमेदवारी नाकारल्यानंतर शिंदे गटांच्या ४० गद्दारांनी सुध्दा आता समोरचा विचार केला पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी गद्दारांना तिकीटे मिळाली त्या जागी वेगळा निकाल येईल, असं ठाकरे म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांचा लोकशाही रक्षणासाठी महत्वाचा सहभाग
देशामध्ये लोकशाही संपुष्टात येत चाललेली आहे. संविधानाला मोठा धोका निर्माण झाला आहे. अशा कठीण काळात आम्ही सगळे एकत्र येऊन लोकशाहीच्या रक्षणासाठी लढत आहोत. त्यामध्ये प्रकाश आंबेडकरांचाही सहभाग अतिशय महत्वाचा आहे. आमचा पक्ष सर्वांना सोबत घेऊन चालतो आहे. महाराष्ट्रात सगळेच लोक आमच्या सोबत आहेत. त्यावर कोण काय बोलतंय, हे सध्या फारसे फारसे महत्वाचे नाही, असंही यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.