राज्यातला आणखी एक मंत्री अडचणीत येणार?; तीस कोटींचा सरकारी भूखंड लाटल्याचा आरोप
X
महाविकास सरकारच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण ठाकरे सरकार मधील आणखी एका मंत्र्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहे. राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे ( Sandipan Bhumare ) यांनी आपल्या पैठण येथील मतदारसंघात ३० कोटी रुपयाचा सरकारी भूखंड लाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आरोप आघाडी सरकारमध्ये सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यानेच केले आहे. राज्यातला आणखी एक मंत्री अडचणीत येणार?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दत्तात्रय गोर्डे यांनी मंगळवारी औरंगाबाद येथे घेतलेल्या पत्रकार परिषेदत संदीपान भुमरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहे. या आरोपानुसार पैठण शहरांमध्ये मोक्याच्या ठिकाणी असलेला सरकारी भूखंड मंत्री संदिपान भुमरे आणि त्यांचा मुलगा विलास भुमरे यांनी नोटरी करून आपल्या नावे करून घेतला असल्याचा आरोप गोर्डे यांनी केला आहे.
तसेच भुमरे यांचे पुत्र जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती आहेत. त्यामुळे दोघांनीही आपल्या पदाचा गैरवापर करून पैठण शहरातील सिटी सर्वे १ हजार २६ मधील जमीन आपल्या जवळच्या व्यक्तीच्या नावे करून विकसित करण्याचा प्रयत्न सुरु केला असल्याचा आरोपही दत्तात्रय गोर्डे यांनी केला. तर याप्रकरणी औरंगाबाद येथील लाच लुचपत विभागाकडे तक्रार सुद्धा करण्यात आली असल्याचं गोर्डे म्हणाले.
गोर्डे यांनी केलेल्या आरोपानंतर भुमरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी भुमरे यांच्या मतदारसंघात कोरोना बाधित रुग्ण रोजगार हमीच्या कामावर हजर असल्याचे दाखवण्यात आले होते. त्यानंतर याप्रकरणी प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले होते.