लोकसभेच्या वेळी आपली सुपारी घेतली होती आता तिकडची, अजित पवार यांचं राज ठाकरेंबाबत मोठं वक्तव्य
राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत घेतलेल्या भुमिकेमुळे सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहेत. त्यातच राज ठाकरे यांनी तीनही सभांमधून राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. (Raj Thackeray Speech)
X
राज ठाकरे यांच्या सभेची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे. तर राज ठाकरे यांनी 4 मेनंतर राज्यातील मशिदींवरील भोंगे काढले नाही तर मशिदींसमोर मोठे भोंगे लावून हनुमान चालीसा पठन करण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. तर दुसऱ्याबाजूला राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेतही राष्ट्रवादी काँग्रेसला निशाणा बनवले आहे. त्याला राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले. ते नाशिक येथे बोलत होते.
अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले की, राज ठाकरे यांच्या सभेला जास्त महत्व द्यायचं कारण नाही. कारण पुर्वीचीच कॅसेट होती. शरद पवार जातीयवादी होते वैगेरे. पण नाशिककरांना माहिती आहे की, शरद पवार जातीयवादी आहेत का ते? तसंच केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे की, शरद पवार हे जातीयवादी नाहीत. त्यांची 50-60 वर्षांची कारकीर्द तुमच्यासमोर आहे. त्यामुळे जर कोणी धादांत खोटं बोलत असेल तर अशा सभेला महत्व का द्यायचं असा टोला अजित पवार यांनी लगावला.
तसेच पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, लोकसभेच्या वेळी आपली सुपारी घेतली होती. आता त्यांची सुपारी घेतली. पण अजित पवार हे वाक्य बोलताच सभागृहात हशा पिकला आणि या बातमीमुळे राज्यात खळबळ उडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते असं लक्षात आल्याने अजित पवार यांनी हे वाक्य सावरून नेण्याचा प्रयत्न केला. पुढे ते म्हणाले की, आपली म्हणजे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठींब्यासाठी बोलत होते. सुपारी घेतली असं नाही. नाहीतर लगेच ब्रेकिंग न्यूज होईल. त्यामुळे अजित पवार म्हणाले की, मी माझे शब्द मागे घेतो.
राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना ते छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नसल्याची टीका केली. त्यावरून अजित पवार म्हणाले की, शरद पवार यांनी कोणाचं नाव घ्यावं आणि कोणाचं नाव घेऊ नये हा त्यांचा प्रश्न. पण हेच शरद पवार यांची मुलाखत घेताना त्यांचे काय कौतूक करायचे? याची आठवण अजित पवार यांनी करून दिली.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, काही लोक खूप सरड्यासारखे रंग बदलतात. कारण एखाद्याचे कौतूक केल्यानंतर त्याच्यावर टीका करताना जीभ वळत नाही. पण त्यांना काही देणं घेणं नाही, असं अजित पवार म्हणाले.