अमेरिकेच्या डॉलरच्या दादागिरी मागे ताकद आहे अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याची... भाग - १
X
(१) अमेरिकेचा “डॉलर” जागतिक चलन असणे (२) अमेरिकेचा आर्थिक महासत्ता म्हणून विकास होणे व (३) अमेरिका लष्करी महासत्ता होणे या तिन्ही गोष्टी परस्पर पूरक आहेत; एव्हढ्या की एक कमकुवत झाली तर त्याचा परिणाम दुसऱ्या दोन गोष्टींवर होणार...
जगात १८५ चलने अस्तित्वात आहेत. युनो व जगातिक बँक व डब्ल्यूटीओ यांचा कोणताच नियम नाही कि अमुक राष्ट्रांमधील व्यापार डॉलर वा विशिष्ट चालनातच व्हावा. पण जगातील ७० टक्के व्यापार व गुंतवणूक अमेरिकन डॉलर मध्ये होते. यामुळे अमेरिकेकडे जो विशेषाधिकार येतो त्याचा संबंध अमेरिका महासत्ता होण्याशी आहे.
कसे ते बघू या.
समजा भारताला खनिज तेल आयात करायचे असेल तर आधी निर्यात करून डॉलर कमवावे लागतात. किंवा डॉलर्स मध्ये कर्ज काढावे लागते. त्यावरचे व्याज व मुद्दल डॉलर्समध्येच द्यावे लागते. डॉलर्स कमावण्यापासून सुटका नाही. डॉलर्स कमवायचे प्रेशर असेल तर रुपया डॉलर्सच्या तुलनेत स्वस्त करावा / ठेवावा लागतो.
डॉलर्स कमावण्यासाठी अमेरिकेला काहीही वेगळे करावे लागत नाही. काहीही निर्यात करावे लागत नाही. कारण अमेरिका आपले डॉलर्स स्वतःच छापू शकते. ते बाहेरच्या देशातील विक्रेत्यांना देऊन हवा तो माल खरेदी करू शकते. गुंतवणूक करू शकते.
कमावलेलं परकीय चलन साठवावे लागते.. बहुतांश राष्ट्रे परकीय चलनाची गंगाजळी (रिझर्व्हज) अमेरिकन डॉलर मध्ये साठवतात. जगातील परकीय चलनाच्या साठ्यातील ७० टक्के साठा डॉलर्स मध्ये आहे. ते डॉलर काही राष्ट्राच्या राजधानीत लोकर मध्ये ठेवत नाहीत. ते अमेरिकन सरकारच्या रोख्यांमध्ये गुंतवतात.
म्हटले तर इतर देश देखील आपल्या चलनाच्या हव्या तेव्हढ्या नोटा छापू शकतात. पण देशाने जास्त नोटा छापल्या तर त्या राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत चलन फुगवटा वाढून भाव पातळी वाढते. अमेरिकेने डॉलर्स छापले तर होऊ शकणारा “चलन फुगवटा” अमेरिका निर्यात करू शकते ! एका अंदाजानुसार अमेरिकेने डॉलर्सच्या जेव्हढ्या नोटा छापल्या त्यातील अर्ध्याहून जास्त नोटा अमेरिकेच्या बाहेरच्या राष्ट्रात वापरात आहेत.
अमेरिकेचा डॉलर जागतिक चलन बनले नसते तर अमेरिकेने जे आर्थिक सामर्थ्य कमावले आहे त्यात खोट आली असती हे निश्चित.
मग अमेरिकाच यात कशी यशस्वी झाली ? अमेरिकेच्या डॉलरच्या दादागिरी मागे ताकद आहे अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याची. (पाहू या पुढच्या पोस्टमध्ये)
संजीव चांदोरकर (७ सप्टेंबर २०१८)