युट्यूबने शेतकऱ्याला बनवलं मालामाल, पालेभाज्यांच्या लागवडीतून मिळवतोय लाखाचा नफा
राज्यातील शेतकरी पारंपरिक शेतीतून बाहेर पडत विदेशी पालेभाज्यांच्या शेतीकडे वळत आहे. त्यापार्श्वभुमीवर बुलढाणा जिल्ह्यातील येळगाव येथील शेतकऱ्याने अनोखा प्रयोग करीत पालेभाज्यांच्या लागवडीतून लाखोंचा नफा कमवला आहे. नेमकं काय आहे यामागचं गिमीक जाणून घेण्यासाठी वाचा...
X
राज्यातील शेतकरी आता आधुनिक शेतीसह विदेशी पालेभाज्यांच्या शेतीकडे सुद्धा वळू लागला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील येळगाव येथील विष्णू गडाख यांनी आपल्या वीस गुंठे शेतामध्ये विदेशी पालेभाज्याची लागवड करुन लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील येळगाव येथील विष्णू गडाख यांनी आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या मागे न धावता त्यांनी आधुनिक शेती करण्याचा निर्णय घेतला. युट्युबच्या माध्यमातून माहिती घेऊन आपल्याकडे असलेल्या दोन एकर शेतीपैकी दीड एकरामध्ये पारंपारिक पिकासोबत अर्धा एकर शेतामध्ये विदेशी पालेभाज्यांची लागवड केली. त्यानंतर पालेभाज्या व्यापाऱ्यांना न विकता स्वतः बाजारपेठात जाऊन विक्री करण्याचा निर्णय घेतला . या माध्यमातून त्यांना चार महिन्यांमध्ये अर्धा एकरात जवळपास सव्वा लाखाचे निव्वळ उत्पन्न मिळाले आहे.
दीड एकर शेतीमध्ये गडाख पारंपारिक शेती करतात. त्यामध्ये गहु, हरभरा यांसारखे इतर पिकांचा समावेश आहे. मात्र उरलेल्या अर्धा एकर शेतीत गडाख हे विदेशी भाज्यांची लागवड करतात. त्यामध्ये ब्रोकली, रेड कॅबेज, लेटुस, सॅलेरी, झुकिनी, लोलोरुसा, टरनिप, शलगम अशा २२ ते २५ प्रकारच्या भाज्यांची लागवड गडाख करतात. एकीकडे नापिकेमुळे शेतकरी आत्महत्या करत असताना दुसरीकडे केवळ अर्धा एकरात गडाख यांच्यासारखे तरुण शेतकरी लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीला जोड म्हणून आधुनिक पद्धतीने पालेभाज्याची शेती केल्यास शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही, असे गडाख हे सांगतात. तर राज्यातील शेतकऱ्यांनी विष्णू गडाख यांच्याकडून हे कसब आणि कौशल्य शिकून शेती करणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना कुणासमोर हात पसरण्याची वेळ येणार नाही. याबरोबरच राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुद्धा या विदेशी पालेभाज्यांच्या लागवडीमुळे रोखण्यास मदत होईल, अशी आशा विष्णू गडाख यांनी यावेळी व्यक्त केली.