Home > मॅक्स किसान > कांदा उत्पादकाला कोण ओलीस धरतयं?

कांदा उत्पादकाला कोण ओलीस धरतयं?

अस्मानी सुलतानी संकटाचा सामना देणाऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना व्यापाऱ्याच्या संपानेमुळे मोठा फटका बसला आहे. व्यापाऱ्यांची ही कृती कदाचित कांद्याची इकोसिस्टीम संपवेल असा इशारा देखील आता शेतकरी देत आहेत.

कांदा उत्पादकाला कोण ओलीस धरतयं?
X

नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव बंद असल्याने वासोळच्या (देवळा) शेतकऱ्याचा १०० क्विंटल कांदा चाळीत सडला, अशी बातमी वाचली.

...न जाणे अशा कित्येक अभागी शेतकऱ्यांचा कांदा मागच्या पंधरा दिवसात सडला असेल.

यंदाच्या 'अस्मानी - सुलतानी' संकटांच्या मालिकेत व्यापारी असोसिएशनच्या संपाची भर पडली आहे. कारण त्यांचे आंदोलन हे शेतकऱ्यांना 'ओलिस' धरून सरकार बरोबर लढण्यासारखे आहे.

व्यापारी असोसिएशनची लढाई सरकार बरोबर —पण त्याची किंमत मोजतोय कांदा उत्पादक शेतकरी, आयजीच्या जीवावर बायजी उदार. अखेर किती दिवस आणि अॅट व्हॉट कॉस्ट?

४० टक्के ड्युटीमुळे खरे नुकसान शेतकऱ्याचे आहे, तरीही ते गप्प राहिलेत, कारण चाळीत ठेवलेल्या मालाची मुदत दिवसेंदिवस संपतेय, मार्केट बंद ठेवणे हा उपाय नाही.

देशाच्या एकूण उत्पादनाशी नाफेड-एनसीसीएफच्या खरेदीचे प्रमाण केवळ एक ते दीड टक्का आहे...तेव्हा कोणत्या गोष्टीला किती वेटेज द्यायचे?

व्यापाऱ्यांच्या ज्या काही समस्या असतील, त्यांनी त्यासाठी स्वत:च्या बळावर लढा द्यावा. उपोषण करावे, धरणे धरावेत - शेतकरी तुमच्या बरोबर असतील. पण अशी शेतकऱ्यांची कोंडी करू नका. असहायतेचा इतका फायदा घेवू नका.

...तुमच्या बेमुदत संपाने सरकारचे काही बिघडत नाही, कारण नाशिक जिल्हा वगळता देशभरातील मार्केट्स सुरू आहेत...इतकेच नाही तर आपल्या (व्यापारी) खळ्यावरचा माल देखिल आपण व्यवस्थित मार्गी लावला आहे.

...नव्या पिढीतील खूप लोक व्यापार करण्यास इच्छूक आहेत...तेव्हा नम्रपणे सांगावेसे वाटते, की आपण परवाने जमा केले तरी नवे परवाने मागणाऱ्यांची वेटिंग लिस्ट खूप मोठी आहे.

तुमचा व्यावसायिक सहभागीदार असलेला शेतकरी जीवाशी जातोय...व्यापाऱ्याच्या कुठल्या तत्त्वात हे बसते? अशाने एक दिवस नाशिक जिल्ह्यातील कांदा शेतीची इकोसिस्टम संपुष्टात येईल, हे लक्षात असू द्यावे.

व्यापारी असोसिएशनमधील शेतकऱ्यांप्रती संवेदना असणाऱ्या सर्व व्यापारी मित्रांना आवाहन व विनंती आहे की आता मार्केट्स सुरू करावेत. विंचूर उपबाजारातील व्यापारी, आणि लोकप्रतिनिधींचे आभार आहे, ज्यांनी शेतकऱ्यांचे दुखणे समजून घेत वेळेवर मार्केट सुरू केलेत.

- दीपक चव्हाण, ता. २ ऑक्टोबर २०२३.

Updated : 2 Oct 2023 3:53 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top