हे गाव 'आत्मनिर्भर' झालेय...
भविष्यातील ऊर्जा संकटाची चाहूल घेत लोकसहभागातून आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याच्या वृत्तीला एकीची जोड देत सौर, पवन आणि बायोगॅस (जैवइंधन) अशा प्रकल्पाची उभारणी टिकेकरवाडी ता. जुन्नर (जि. पुणे) यांनी आहे. ३३ किलोवॉट इतकी अपारंपरिक ऊर्जा ध्येय काढताना राज्यासाठीच नव्हे, तर देशासाठी टिकेकरवाडी ‘रोल मॉडेल’ ठरले आहे, MaxKisan चे संपादक विजय गायकवाड यांचा ग्राउंड रिपोर्ट..
X
मराठीत एक म्हण आहे गाव करी ते राव काय करी?केंद्र शासनाने धूरमुक्त गाव योजनेत टिकेकरवाडीनेही हुरुपाने भाग घेतला. मात्र, योजना काही कारणांनी बारगळली. मात्र, धूरमुक्त गावाचा ध्यास कायम ठेवत टिकेकरवाडीने बायोगॅस प्रकल्पासोबतच सोलर वॉटर हीटर बसविण्याचे नियोजन केले. सध्या गावातील १८४ कुटुंबांपैकी १२९ कुटुंबांनी सोलर वॉटर हीटर बसविले आहेत. प्रतिहीटरसाठी सरासरी २० हजार रुपये खर्च झाला असला, तरी १२० कुटुंबांचा सरपणाचा पाच वर्षांतील लक्षावधी रुपयांचा खर्च वाचला. शिवाय वृक्षतोड, धुराचे प्रदूषण, त्यामुळे महिलांना होणारे आजार व त्वचारोग अशा समस्यांवर मात करता आली.
२०० घनमीटर क्षमतेच्या बायोगॅस प्रकल्पाची उभारणी
धूरमुक्त ग्राम योजना रद्द झाली, तरी त्यातील विविध संकल्पनांचा आधार स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचऱ्यावर आधारित वीजनिर्मितीचा बायोगॅस उभारणीसाठी घेतला. बायोगॅसपासून वीजनिर्मिती व उर्वरित गॅस घरगुती वापरासाठी पाइपलाइनद्वारे वितरणाचे उद्दिष्ट टिकेकरवाडीने ठेवले. साडेतीन वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर २०१३ मध्ये जिल्हा परिषदेकडून १०० घनमीटर क्षमतेच्या वायुनिर्मितीची तांत्रिक मान्यता मिळाली. या प्रकल्पासाठी अपेक्षित २५ लाख रुपये खर्चातील १५ लाख शासनातर्फे, तर १० लाख ग्रामपंचायतीद्वारे स्वनिधी वापरला. पुढे १५ किलोवॉट वीजनिर्मितीसाठी सुमारे ६० लाख रुपयांची गरज होती. यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी जिल्हा नियोजन समितीअंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून प्रकल्पाला २३ लाख ८१ हजार रुपये मंजूर केले. संसद आदर्श ग्राम योजनेतून खासदार ॲड. मजिद मेमन यांनीही १० लाखांचा निधी दिला. ग्रामविकास विभागाचे तत्कालीन उपसचिव मल्लिनाथ कलशेट्टी यांनी प्रोत्साहन दिल्याने सुमारे ८० लाख रुपये खर्चून प्रकल्प पूर्ण झाला. त्यातून पूर्वीच्या तुलनेत दुपटीने म्हणजे २०० घनमीटर गॅसनिर्मिती केली जाते. बायोगॅस प्रकल्पांतर्गत २४ लाखांची गुंतवणूक करत स्लरी सेपरेटर यंत्रणा घेतली असून, संपूर्ण गावाला सेंद्रिय खत व द्रवरूप स्लरी शेतीसाठी दिली जाते. आज ८०० ते १२०० रुपये प्रति ३५ लिटर दराने मिळणारे खत ग्रामस्थ व बाहेरील शेतकऱ्यांना ४०० रुपयांत दिले जाते.
१०५ घरांचे उद्दिष्ट, त्यातील 35 घरांना गॅसपुरवठा
गॅसपुरवठ्यासाठी संपूर्ण गावात पाइपलाइन टाकली असून, सध्या गावठाणातील १०५ घरांपैकी 35 घरांना सकाळी सहा ते आठ आणि रात्री सात ते नऊ या वेळेत गॅसपुरवठा केला जातो, असे प्रकल्प समन्वयक संतोष सहाणे म्हणाले.
गावातील प्रत्येक कुटुंबाला शेगड्या पुरवल्या असून, त्यांच्याकडून प्रतिमहिना २५० रुपये शुल्क आकारले जाते. प्रतिवर्ष गॅसनिर्मिती ८ ते १० सिलिंडरवरील खर्च वाचला आहे. ही वितरण योजना संपूर्ण १०५ घरांपर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
११ किलोवॉट क्षमतेची वीजनिर्मिती
गावात एकूण १० किलोवॉटचे ऊर्जानिर्मिती संच उभारले गेले. त्यात दोन पवनऊर्जा ६ किलोवॉट व सौर ४ किलोवॉट यांचा समावेश असून, संसद आदर्श ग्राम योजनेतून २५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या प्रकल्पाद्वारे १० किलोवॉट विजेची निर्मिती होईल. पूर्वीचा एक किलोवॉटचा प्रकल्प कार्यान्वित असून, त्यातून ग्रामसचिवालय, गावातील सुमारे ५०० पथदिवे (अंडरग्राउंड जोडणी) आणि रात्री खेळ खेळण्यासाठी संपूर्ण क्रीडांगणाला विजेची व्यवस्था उभारण्यात येणार आहे.
भविष्यात सिलिंडर भरणा प्रकल्प
गॅसनिर्मिती प्रकल्पातील गॅस साठवणूक करून वितरणासाठी सिलिंडर भरण्याचा प्रकल्प प्रस्तावित असून, त्यासाठी प्राथमिक सव्वा कोटीच्या प्रकल्पाला नाबार्डने मंजुरी दिली आहे. प्रकल्प कर्जाच्या परतफेडीसाठी नाबार्डने आर्थिक व शासकीय हमी मागितली आहे. त्यासाठी प्रयत्न सध्या सुरू आहेत. गावातील प्रत्येक वाहन गावातच तयार झालेल्या बायोसीएनजीवर चालविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
जलविद्युत प्रकल्प उभारणीसाठी प्रयत्न
गावातून वाहणाऱ्या पुष्पावती नदीला पिंपळगाव जोगा आणि चिल्हेवाडी धरणांमधून १० महिने पाणी असते. गावालगत वाहणाऱ्या या नदीपात्रात मोठा धबधबा, रांजण खळगे आहे. त्यावर ग्रामपंचायतीच्या मालकीचा १०० किलोवॉट क्षमतेचा जलविद्युतनिर्मितीचा प्रकल्प उभारणीसाठी प्रयत्न सुरू आहेत.
घराच्या छतावर सौरऊर्जानिर्मितीला प्रोत्साहन
प्रत्येक घरावर सौर पॅनेल बसवून गावासाठी लागणारी वीज गावातच तयार करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेला ग्रामसभेने नुकतीच मान्यता दिली आहे. या पॅनेलचा खर्च किमान राखण्यासाठी शासनाचे ३० टक्के अनुदान आणि ग्रामपंचायतीतर्फे प्रत्येक लाभार्थ्याला १० टक्के रक्कम देण्याचे नियोजन आहे. म्हणजे, लाभार्थ्याला केवळ ६० टक्के रकमेत घरावर सौरऊर्जा प्रकल्प सुरू करता येईल. या खर्चातही बचत साधण्यासाठी पुरवठादार कंपनीकडून ५ ते १० टक्के सवलतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रकल्पातून तयार होणारी वीज नेट मीटरिंगद्वारे महावितरणला दिली जाते. यामुळे विजेचा खर्च कमी होईल आणि ग्रीडला दिलेल्या अतिरिक्त विजेसाठी महावितरणकडून पैसे मिळतात.
नुकताच टिकेकरवाडी ग्रामपंचायतला ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कार राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते देण्यात आला. एक कोटी रुपये इतक्या रकमेचा पुरस्कार मिळवणारे देशातील एकमेव गाव ठरले आहे.
अशा पद्धतीने गावाला आत्मनिर्भर करणारे प्रकल्प राज्याच्या नवे तर देशाच्या प्रत्येक गावात व्हायला हवे जेणेकरून शाश्वत विकासाच्या दृष्टीने देशाची वाटचाल होईल, असे प्रकल्प समन्वयक संतोष सहाणे यांनी MaxKisan शी बोलताना सांगितले.
टिकेकरवाडीने मिळवलेली ऊर्जानिर्मिती क्षमता
लोकसंख्या - सुमारे १११९
पवन आणि सौर या हायब्रीड युनिटद्वारे सध्या मिळणारी वीज - ११ किलोवॉट
केवळ छतांवरील सोलर पॅनेलद्वारे निर्माण होणारी वीज - ७ किलोवॉट
बायोगॅसद्वारे सध्या निर्माण होणारी वीज - १५ किलोवॉट - (गावातील पथदिवे, मंदिरे, शाळा आदींसाठी)
बिबट्याप्रवण क्षेत्र असल्याने विजेची गरज अत्यंत महत्त्वाची
एकूण वीजनिर्मिती क्षमता - ३३ किलोवॉट
शाळा आणि नवीन ग्राम सचिवालयावर छतावरील सोलर पॅनल बसवून १० किलोवॉट क्षमता वाढविणार
- संतोष टिकेकर,(सरपंच, टिकेकवाडी),९८६००५५००१
संतोष सहाणे: प्रकल्प संचालक- 099705 50000