मराठवाड्यात अवकाळी पावसाची हजेरी, परभणी, हिंगोलीतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
X
हिंगोली/प्रतिनिधी (राजु गवळी) : मागील तीन-चार दिवसांपासून वातावरणात बदल होऊन मराठवाड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. अशात बुधवारी पुन्हा मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडला आहे.जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात बुधवारी झालेल्या पावसाने पिकांचे नुकसान केले आहे.
बुधवारी हिंगोली जिल्ह्यांमध्ये सायंकाळी पाच ते सात वाजताच्या सुमारास जोरदार स्वरूपाच्या अवकाळी पावसाने हजेरी लावली या पावसामुळे शेतातील गहू, हरभरा, ज्वारी यासह फळबागांचे नुकसान झाले. तसेच, संत्रा, मोसंबी, आंबे आणि भाजीपाला पिकांना सुद्धा पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. गहू आणि हरभरा हे पीक सध्या काढणीला आलेले आहेत, अशा अवस्थेत बुधवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत.
यापूर्वी कोरड्या दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मागील तीन ते चार वर्षांपासून अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाचा सामना करावा लागत आहे. खरीप हंगामात अवकाळी पावसाचा फटका बसतो, तर रब्बी हंगामात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होते. या नैसर्गिक संकटामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न देखील घटत चालले आहेत. यामुळे शेतकरी आत्महत्या सारख्या घटना वाढल्या आहेत. असे असतानाच पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने चारही बाजूने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यातल्या त्यात आता मागील तीन-चार दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसाचा देखील मोठा फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसतांना पाहायला मिळत आहे.
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात रब्बी हंगामात गव्हाची लागवड केली जाते. अशात हेच गव्हाचे पीक आता काढणीला आले आहेत. पुढील 10-12 दिवसांत गव्हाची काढणीला सुरवात होईल. काही ठिकाणी गव्हाच्या काढणीला सुरवात देखील झाली होती मात्र, अचानक येणाऱ्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका गव्हाच्या पिकांना बसत आहे. काढणीला आलेलं गहू मातीमोल होत आहे. त्यामुळे शेतकरी बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे