Home > मॅक्स किसान > तुर उत्पादनात घट, दरही हमीभावाच्या खालीच, शेतकऱ्यांची चिंता वाढली

तुर उत्पादनात घट, दरही हमीभावाच्या खालीच, शेतकऱ्यांची चिंता वाढली

तुर उत्पादनात घट, दरही हमीभावाच्या खालीच, शेतकऱ्यांची चिंता वाढली
X

मुंबई : महाराष्ट्र आणि कर्नाटक या प्रमुख तुर उत्पादक राज्यात होत असलेला सततचा पाऊस, मर रोग, बुरशीचा प्रादुर्भाव, ढगाळ वातावरणामुळे होणारी फुलगळ यांमुळे देशातील तुर उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे यंदा तुरीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. तर तुरीच्या उत्पादनात घट होणार असली तरी दर हमीभावाच्या खालीच राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.





आपल्या देशाची तुरीची गरज ही 43 लाख टन इतकी आहे. तर यंदा देशात तुरीचे उत्पादन 44 लाख 30 हजार टन इतके होण्याचा अंदाज कृषी मंत्रालयाने व्यक्त केला होता. मात्र देशातील प्रमुख तुर उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सतत झालेल्या पावसामुळे, ढगाळ वातावरणामुळे, रोगांच्या प्रादुर्भावामुळे तुरीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील मराठवाड्यात कापुस आणि सोयाबीन या पिकांमध्ये आंतरपीक म्हणून तुरीचे उत्पादन घेतले जाते. तर पश्चिम विदर्भातील यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यात प्रमुख पीक म्हणून तुरीची लागवड केली जाते. तर कर्नाटक राज्यातील बागलकोट, बिदर, गुलबर्गा, विजापुर, यादगीर आणि रायचूर या जिल्ह्यातही तुरीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. मात्र यंदा वातावरणातील बदल आणि अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे यंदा तुर उत्पादनाला फटका बसला आहे.





ज्या जमिनीत पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होत आहे, अशा जमिनीत तुरीचे पीक चांगल्या प्रकारे आले आहे. मात्र पाऊस व हवामानाचा फटका सरसकट पुर्ण जिल्ह्याला न बसता वेगवेगळ्या भागाला बसला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात पावसामुळे तुर पीकाला मोठा फटका बसला आहे. तर औरंगाबाद, जालना जिल्ह्यातही तुर उत्पादनात घट झाल्याचे शेतकरी सांगतात. तर नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात 60 ते 70 टक्के पीक वाया गेले आहे. यासोबतच अमरावती, अकोला, यवतमाळ जिल्ह्यातसह मराठवाडा आणि विदर्भात मर रोगामुळे पीक हातचे आहे, त्यामुळे कृषी खात्याकडे तक्रार केल्याचे शेतकरी सांगतात.

राज्यात तुरीच्या लागवडीचे 12 लाख 75 हजार हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. मात्र त्यापैकी 10 लाख हेक्टरवर तुरीची लागवड करण्यात आली होती. मात्र सततचा पाऊस, ढगाळ वातावरण, मोठ्या प्रमाणावर पडणारे धुके यांमुळे पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. तर ढगाळ वातावरणामुळे फुलोऱ्यात मोठ्या प्रमाणावर फुलगळ होत आहे. तर दाणे भरण्याच्या काळातही ढगाळ वातावरण कायम राहिल्याने दाणे योग्य पध्दतीने भरले नाहीत व शेंगांची पापडी झाली. याबरोबरच सतत होणाऱ्या पावसामुळे वांझ रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला. यामध्ये तुरीची झाडे हिरवेगार होते मात्र त्यामध्ये त्यांची फळधारणा होत नसल्याचे दिसून आले. तर अतिपावसाचा ताण तुरीच्या पिकावर निर्माण झाल्याने तुर उत्पादनावर मोठा परीणाम झाला असल्याचे कृषी सहायक अधिकारी तात्याराम गोपाळघरे यांनी सांगितले.





यंदा तुरीचे एकरी 8 ते 9 क्विंटल उत्पादन अपेक्षित होते. मात्र वातावरणातील बदलामुळे तुरीवर मारूका आणि शेंगा पोखरणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव झाला. तर सततच्या पावसामुळे पीक मर रोग आणि बुरशीजन्य रोगांना बळी पडले. तसेच धुक्यामुळे तुरीची पाने करपुन फुलगळ झाली. त्यामुळे उत्पादनात एकरी 4 ते 5 क्विंटल तुट निर्माण होण्याची शक्यता आहे, अशी माहिती तुर उत्पादक शेतकरी दिलीप मोहळकर यांनी दिली.

केंद्र सरकारने 44 लाख 30 हजार टन इतके तुरीचे उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र देशात आलेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे तुरीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. तर यामध्ये काही कृषी अभ्यासकांच्या मतानुसार 30 ते 35 लाख टनांपर्यंत तुरीचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

दरवर्षीपेक्षा यंदा तुरीच्या उत्पादन घट होण्याच्या अंदाजावरून सरकारने तुरीच्या आयातीला परवानगी दिली आहे. तर टांझानिया, सुदान, मोंझाबिक, मालावी, म्यानमार आणि युगांडा या देशांमधून भारताने 4 लाख 30 हजार टन तुरीची आयात केली आहे. मात्र देशांतर्गत उत्पादन आणि आयात केलेल्या तुर मिळूनही देशाची गरज अपुर्ण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुरीच्या दरात वाढ होऊन त्याचा शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र व्यापारी आणि प्रक्रिया उद्योगातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार आयात केलेली तुर सध्या बाजारात शिल्लक आहे. तर येत्या महिनाभरात नवी तुर बाजारात येण्यास सुरूवात होणार आहे. त्यामुळे यंदा उत्पादनात घट होऊनही तुरीचे दर मात्र हमीभावाच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारातील दराचा आढावा घेऊनच तुरीची विक्री करावी, असे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले आहे.

2015-16 मध्ये तुरीचा भाव 10 ते 11 हजार रूपये प्रति क्विंटलपर्यंत पोहचला होता. त्यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डाळीच्या बाबतीत देशाने स्वयंपुर्ण होण्यासाठी तुरीचे उत्पादन घेण्याचे आवाहन केले. तर शेतकऱ्यांनी पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तुरीचे विक्रमी उत्पादन घेतले. मात्र त्यावर्षी सरकारने तुर आयातीचे धोरण स्वीकारले. तर 2019-20 मध्ये केंद्र सरकारने तुरीच्या आयातीला परवानगी दिल्यानतंर 4 लाख 50 हजार टन तुरीची आयात करण्यात आली होती. तर 2020-21 मध्ये 4 लाख 48 हजार टन तुरीची आयात करण्यात आली होती. त्यातुलनेत यंदा चार महिन्यात 4 लाख 27 हजार टन तुर आयात झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीची शिल्लक तुर आणि यंदाची आयात तुर यामुळे बाजारात दबाव निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदा हंगाम सुरू होण्यापुर्वीच दर हमीभावाच्या खाली आहेत. मात्र यंदा 35 लाख टनापर्यंत देशांतर्गत तुरीचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. तर आतापर्यंत 4 लाख 27 हजार टन तुरीची आयात करण्यात आली आहे. त्यातुलनेत देशाची तुरीची गरज ही 43 लाख टन एवढी आहे. त्यामुळे दरावर दबाव निर्माण झाला असला तरी तुरीच्या ऐन हंगामापर्यंत तुर हमीभावाचा दर गाठू शकते, असा अंदाज कृषी क्षेत्रातील बाजार भावाचा अभ्यास असलेले जाणकार व्यक्त करत आहेत





तुर उत्पादनाकडे शेतकऱ्यांनी पाठ का फिरवली

भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार 2020-21 साठी तुर या पीकासाठी हमीभाव 6000 रूपये प्रति क्विंटल एवढा होता. तर यंदा त्यात 300 रूपये प्रति क्विंटल वाढ करून 6300 करण्यात आला आहे. त्यातुलनेत ऊस, कापुस, द्राक्षे यासारख्या नगदी पिकांना मिळणारा दर यामुळे शेतकरी तुरीच्या उत्पादनाकडे पाठ फिरवत आहेत. तसेच देशात तुरीचे मुबलक उत्पादन झाल्यानंतरही केंद्र सरकार आयातीचे धोरण स्वीकारते. त्यामुळे स्थानिक बाजारातील तुरीचे दर पडतात. त्याचा फटका तुर उत्पादक शेतकऱ्यांना बसतो. म्हणून या शेतकऱ्यांनी तुर उत्पादनाकडे पाठ फिरवली आहे.

२७ डिसेंबर 2021 रोजी राज्यातील प्रमुख बाजारपेठांमधील लाल तुरीचे दर 4400 ते 6050 रूपयांच्या दरम्यान आहेत. तर पांढऱ्या तुरीचे दर 4700 ते 6213 रूपयांच्या दरम्यान आहेत. मात्र सध्या आयात तुर आणि देशांतर्गत उत्पादन झालेल्या तुरीच्या दराचा बाजारावर ताण निर्माण झाल्याने उत्पादनात घट होऊनही तुरीचे दर मात्र हमीभावाच्या खालीच राहणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Updated : 28 Dec 2021 5:40 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top