नोकरी सोडून स्ट्रॉबेरीची लागवड...प्रयोगशील शेतकऱ्याची कथा...
X
नामांकित कंपनीतील नोकरी सोडून, शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणारे हे आहेत हिंगणघाट तालुक्यातील कात्री येथील प्रयोगशील शेतकरी महेश पाटील. यावर्षी त्यांनी पाऊण एकर शेतामध्ये स्ट्रॉबेरी फळ पिकाची लागवड केली. विशेष म्हणजे वर्धेच्या उष्णकटिबंधीय वातावरणात सेंद्रिय पद्धतीने स्ट्रॉबेरी फळ पिकाची लागवड करून यशस्वी उत्पादन घेतले आहे.
हिंगणघाट तालुक्यातील कात्री येथील प्रयोगशील शेतकरी महेश पाटील यांनी नामांकित कंपनीतील नोकरी सोडून आपल्या पाऊण एकर शेतामध्ये स्ट्रॉबेरी फळाची लागवड केली आहे. वर्धा येथील उष्ण कटीबंधीय वातावरणात स्ट्रॉबेरीची लागवड करुन पाटील यांनी एक नवा प्रयोग सुरु करुन यशस्वी उत्पादन घेतले आहे. पाटील यांनी सुरुवातीला आपल्या शेतीची मशागत करून कंपोस्ट खत शेतामध्ये फेकले आणि रोटावेटर करून तीन-तीन फुटावर बेड तयार केले. त्यानंतर बेसल डोस दिले ज्यामध्ये निंबोळी पेंट,कंपोस्ट खत आणि 5 किलो गुळाच्या पाण्याचे द्रावण बेडवर शिंपडले. स्ट्रॉबेरी रोपांची लागवड केल्यानंतर 35 दिवसांनी फुले यायला सुरुवात झाली. 50 ते 55 दिवसात फळ यायला सुरुवात झाली. 70 व्या दिवशी फळ परिपक्व झाले . या स्ट्रॉबेरीचे वैशिष्ट्य म्हणजे रंग हा गडद लाल असून, एका स्ट्रॉबेरीच्या फळाचे वजन 30 ते 40 ग्रॅम इतके आहे आणि झाडालाच स्ट्रॉबेरी पिकत असल्यामुळे या स्ट्रॉबेरी मध्ये गोडवा खूप जास्त आहे.
आतापर्यंत वर्धा बाजारपेठेमध्ये सर्वाधिक जास्त प्रमाणात पाटील यांच्या शेतातील स्ट्रॉबेरीची विक्री झालेली आहे. 100 रुपये प्रमाणे एक डबा या दराने पाटील विक्री करत आहेत. पाटील यांच्या स्ट्रॉबेरी फळाची विक्री नागपूर, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा होत आहे. आसपासच्या विविध जिल्ह्यांतील शेतकरी पाटील यांच्या स्ट्रॉबेरी प्लांटला आवर्जून भेट देत आहेत आणि स्ट्रॉबेरीचे भरघोस उत्पादन आपल्या शेतात कशाप्रकारे घेता येईल याची माहिती पाटील यांच्याकडून जाणून घेत आहे. तसेच वर्धामध्ये स्ट्रॉबेरीचे पिक घेता येवू शकते हे पाहून समाधान व्यक्त करत आहेत.