कोरोना संकटात स्ट्रॉबेरी फुलली
कोरोना लॉकडाऊनमधे धंदा बंद झाला. हार मानली नाही. गावी येऊन अभ्यासातून महाबळेश्वरच्या थंड हवामानातील स्ट्रॉबेरीची अकलूजच्या माळीनगर भागात यशस्वी लागवड केली. सोशल मिडीयाच्या माध्यमातून स्ट्रॉबेरी प्रतिकिलो 500 रुपये प्रमाणे विकली जातेय प्रतिनिधी अशोक कांबळेंचा रिपोर्ट...
X
स्ट्रॉबेरी म्हटले की, महाबळेश्वरचे नाव लागलीच ओठावर येते.येथील थंड वातावरण स्ट्रॉबेरीच्या वाढीसाठी पोषक असल्याचे सांगितले जाते.ही स्ट्रॉबेरी थंड हवामान सोडून दुसऱ्या कोणत्याच हवामानात तग धरू शकत नाही,अशी शेतकऱ्यांची धारणा आहे.परंतु सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील माळीनगर भागात स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड करण्यात आली आहे.माळीनगर अकलूज पासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर आहे.या भागात उष्ण हवामान असताना स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड करण्यात आली असल्याने स्ट्रॉबेरीची शेती शेतकऱ्यांच्या कुतूहलाचा विषय बनली आहे.या शेतीला जिल्ह्याच्या विविध भागातील शेतकरी व पर्यटक भेट देऊ लागले आहेत.स्ट्रॉबेरी पिकाचा पेरूच्या बागेत आंतरपीक म्हणून प्रयोग करण्यात आला असून स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव सोमनाथ ऐकतपुरे असे आहे.सध्या त्यांच्या शेतातील स्ट्रॉबेरी प्रतिकिलो 500 रुपये प्रमाणे विकली जात आहे.स्ट्रॉबेरीच्या लागवडीसाठी आलेल्या खर्चाच्या 75 टक्के खर्च वसूल झाला आहे.आणखीन दीड ते दोन महिने स्ट्रॉबेरीचे उत्पादन सुरू राहील व त्यातून थोड्याफार प्रमाणात आर्थिक नफा होईल असे शेतकरी सोमनाथ ऐकतपुरे यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितले.
लॉकडाऊनमुळे चहा,कॉपीची गाडी बंद झाल्याने स्ट्रॉबेरीची केली शेती
यावेळी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना शेतकरी सोमनाथ ऐकतपुरे यांनी सांगितले की,महाबळेश्वरमध्ये माझी चहा,कॉफीची गाडी होती.लॉकडाऊन झाल्याने गाडी बंद करावी लागली.त्यामुळे शेतीकडे वळलो.महाबळेश्वर,वाई,सातारा येथे स्ट्रॉबेरीची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते.तेथे चहा,कॉपी विकत असताना तेथील काही शेतकरी माझे मित्र झाले.त्या मित्रांच्या शेतात फिरताना मला वाटले की,आपल्या शेतात स्ट्रॉबेरीची लागवड करावी.त्यावेळी त्यांना विचारले की,आमच्या उष्ण भागात स्ट्रॉबेरी येऊ शकेल का ? त्यावेळी त्यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या वातावरणात येणाऱ्या एक ते दोन प्रकारच्या स्ट्रॉबेरीच्या व्हरायटी आहेत. त्या महाबळेश्वर सोडून इतर वातावरण यशस्वी झाल्या आहेत. त्यांनी मला विंटर डाऊन नावाच्या प्रकारची स्ट्रॉबेरी लावण्याचा सल्ला दिला.त्यानुसार त्यांच्याकडून रोपे विकत घेतली.त्याची लागवड माळीनगर भागातील शेतात 11 सप्टेंबर 2021 रोजी केली.लागवड केल्यानंतर काही दिवसानंतर त्याला ब्लिचिंग करायला सुरुवात केली.त्याच्यावर पेस्टीसाइड,बुरशीनाशकाची फवारणी केली.हे पीक म्हणजे खूपच सेन्सेटीव्ह आहे. त्यामुळे त्याची काळजी घेणे गरजेचे आहे.या पिकाला काळजीपूर्वक हाताळले तर 100 टक्के यशस्वी होते.ते आता आमच्या येथे यशस्वी झाले आहे.
महाबळेश्वर आणि माळीनगरच्या तापमानामध्ये फार मोठा फरक आहे. स्ट्रॉबेरीचे उत्पादन थंड हवामान असणाऱ्या प्रदेशात सर्वाधिक प्रमाणात घेतले जाते. परंतु एकतपुरे यांनी माळीनगरसारख्या अतिशय उम्म हवामान असणाऱ्या भागात हा प्रयोग यशस्वी केला आहे. जवळपास अर्धा एकर शेतामध्ये त्यांनी बेड पद्धतीचा अवलंब करून विटर डाऊन जातीच्या स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे.
लागवडीसाठी एक लाख रुपयांच्या आसपास आला खर्च
महाराष्ट्रात स्ट्रॉबेरीची लागवड प्रामुख्याने सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी, वाई परिसरात केली जाते. या परिसराचा देशातील उत्पादनात ८५ टक्के इतका वाटा आहे. महाबळेश्वरातील स्ट्रॉबेरीचे पीक आता थेट माळशिरस तालुक्यातील मायेनगरमध्ये प्रवेश केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
ऐकतपुरे यांनी अर्धा एकरात स्ट्रॉबेरीची 7 हजार झाडे लावली असून ते त्यांना 8 रुपयांना एक असे मिळाले आहे.रोपे आणण्याच्या खर्चासह एकूण 1 लाख रुपयाच्या आसपास खर्च झाला आहे.सुरुवातीला याचे उत्पन्न निघेल की नाही अशी शंका शेतकरी ऐकतपुरे यांना होती.मध्यंतरी 10 ते 15 दिवसापूर्वी पावसाचे वातावरण झाल्याने चिंता निर्माण झाली होती.त्यानंतर या पिकाच्या झाडावर करपा रोग पडला होता.त्यामुळे झाडांचे खूपच नुकसान झाले होते.मेहनत वाया जातो की,काय असे ऐकतपुरे यांना वाटले होते.त्यानंतर थंडी वाढू लागल्याने बरे वाटले.पिकावर स्प्रे व बुरशीनाशकांची फवारणी केली.त्यामुळे झाडे पूर्वपदावर येण्यास मदत होऊन त्यांना फुले आली.आता पीक जवळ-जवळ 75 टक्के यशस्वी झाले आहे.असे सोमनाथ ऐकतपुरे यांनी सांगितले.
सुरुवातीला दीड किलो निघाली स्ट्रॉबेरी
11 सप्टेंबर रोजी लागवड केल्यानंतर साधारण दीड महिन्यानंतर या पिकाला फ्लोरिंग दिसायला लागले.त्यावेळी आमच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता.कारण हे पीक यशस्वी झाले होते.त्यानंतर 8 दिवसानी फुलांचे छोट्या फळात रूपांतर झाले.फळ हळूहळू वाढत जाऊन त्याचा रंग पांढरा झाला असल्याचे पाहायला मिळाले होते. 8 दिवसाच्या कालावधीनंतर ते फळ परिपक्कव होऊन पांढऱ्या स्ट्रॉबेरीचा रंग लाल झाला होता.साधारणपणे 25 ऑक्टोबर रोजी फळांची तोडणी करण्यात आली.त्यावेळी 7 हजार झाडांना केवळ दीड किलो स्ट्रॉबेरी निघाली होती.
स्ट्रॉबेरीची मार्केटिंग केली सोशल मीडियावर
स्ट्रॉबेरी फळ विकायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला होता.त्यावेळी स्ट्रॉबेरीचे फोटो काढून फेसबुकवर व्हायरल केले.गावात स्ट्रॉबेरी विकणे परवडणारे नव्हते.तिला तितकेसे ग्राहक मिळणे अवघड होते.फेसबुकवर फोटो व्हायरल करत असताना कुटूंबासह येऊन आपल्या हाताने गार्डन फ्रेश स्ट्रॉबेरी तोडण्याचा आनंद घ्यावा असे आवाहन केले.त्यानंतर ग्राहकांची शेतात रीघ लागली व स्ट्रॉबेरी हातोहात विकली गेली.अशा प्रकारे मार्केटींगसाठी ऐकतपुरे यांनी सोशल मीडियाचा चांगला उपयोग केला.
ग्राहकांना केमिकल मुक्त स्ट्रॉबेरी देण्याचा प्रयत्न
या झाडावर कीटकनाशक,बुरशीनाशक यांच्या फवारण्या या जैविक फवारण्या केल्या होत्या.पण काही प्रमाणात केमिकल्सच्या ही फवारण्या केल्या होत्या.पूर्ण जैविक फवारण्या केल्यास हे पीक आपल्या भागात टिकणार नाही.त्यात निसर्गाने त्रास देण्यास सुरुवात केली आहे.पण ग्राहकांना केमिकल मुक्त स्ट्रॉबेरी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासंदर्भाने तज्ञ लोकांशी चर्चा करण्यात येत आहे.आतापर्यंत 70 हजार रुपयांची स्ट्रॉबेरी विकली आहे. ती विकण्यासाठी कोणत्याही मार्केटमध्ये जावे लागले नाही.ग्राहक सहकुटूंब शेतात येऊन हाताने तोडून स्ट्रॉबेरी खातात.त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद असतो.थंडी कमी झाल्यास याला फोगर्स किंवा स्प्रिंकलर लावले तर या पिकाच्या फळाचा हंगाम एक ते दीड महिन्याने वाढवता येतो.त्यामुळे आणखीन आर्थिक उत्पन्नात भर पडेल असे शेतकरी सोमनाथ ऐकतपुरे यांनी सांगितले.
कृषी पर्यटन क्षेत्र करण्याचा शेतकरी ऐकतपुरे यांचा मानस
माळीनगर हे अकलूज पासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असल्याने या ठिकाणी लोकांनी सहकुटूंब यावे व कृषी पर्यटनाचा आनंद घ्यावा. यासाठी कृषी पर्यटन निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ऐकतपुरे यांनी सांगितले.स्ट्रॉबेरी पिकामुळे अनेक लोकांनी सह-परिवार येथे भेटी दिल्या आहेत.भविष्यात घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या तळ्यात बोटिंग सुरू करणार आहे.त्यासाठी बोट तयार करण्यास टाकली आहे.या ठिकाणी आलेल्या लोकांना मकेचे कणीस,हुरडा पार्टी यांच्या सुविधा देणार आहोत.आमच्या शेतात भविष्यात चांगल्या प्रकारचे कृषी पर्यटन पहायला मिळेल.असे शेवटी ऐकतपुरे यांनी सांगितले.