हाताला काम नसल्याने एसटी कामगाराने फुलवली दुधी भोपळ्याची शेती
X
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे,यासाठी गेल्या चार महिन्यापासून एसटी कामगारांचा संप सुरु आहे.राज्य शासनाच्या म्हणण्यानुसार,कामगारांचा संप सुरू आहे,तर कामगारांच्या म्हणण्यानुसार संप नसून एसटी कामगारांनी केलेल्या आत्महत्याच्या निषेधार्थ दुखवटा पाळण्यात येत आहे. एसटी कामगार एसटी महामंडळाच्या विलिनीकरणावर ठाम आहेत. त्यासाठी वाटेल ते कष्ट सोसायला कामगार तयार आहेत. आपल्या कुटूंबाची ससेहोलपट होऊ नये,यासाठी अनेक एसटी चालक व वाहक हाताला मिळेल ते काम करू लागले आहेत. त्यांच्यावर बेकारीची वेळ आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एका एसटी चालकाने तर चक्क म्हशी भादरण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. त्याचबरोबर हाताला मिळेल ते काम करू लागले आहेत. पंढरपूर तालुक्यातील एका कंडक्टरने हाताला काम नसल्याने चक्क दुधी भोपळ्याची शेती फुलवून कुटूंबाचा उदरनिर्वाह सुरू केला आहे. पण ज्या एसटी कामगारांच्या कुटूंबाकडे उदरनिर्वाहाची साधने नाहीत त्यांच्या प्रति त्यांनी संवेदना व्यक्त करून शासनाने एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाचा निर्णय जाहीर करावा अशी मागणी केली आहे.
एसटी कामगारांवर बेकारीची वेळ
गेल्या चार महिन्यापासून एसटी कामगारांचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे त्यांच्यावर बेकारीची वेळ आली आहे. काही कामगार हाताला मिळेल ते काम करून कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. तर काही एसटी कामगारांना कुटूंबाचा आर्थिक भार सोसेना गेल्याने आत्महत्या केल्या असल्याचे सांगितले जात आहे.सोलापूर जिल्ह्यातील काही एसटी चालक,वाहक दुसऱ्याच्या शेतात शेतमजूर म्हणून कामाला जात आहेत. तर काहीजण बदली ड्रायव्हर म्हणून जात आहेत. त्यातून मिळणाऱ्या पैशातून कुटूंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. गेल्या 4 महिन्यापासून एसटी कामगारांना आर्थिक समस्याना तोंड द्यावे लागत आहे.ते अत्यंत कठीण अशा परिस्थितीतून जात आहेत.जशी कोर्टाची तारीख लांबणीवर जात आहे.तसा एसटी कामगारांचा मानसिक ताण वाढू लागला आहे.त्यांच्यात नैराश्य वाढू लागले आहे.त्यामुळे सरकारने लवकरात-लवकर विलीनीकरणाचा निर्णय जाहीर करावा,अशी मागणी आता कामगार करू लागले आहेत.
कंडक्टरने फुलवली दुधी भोपळ्याची शेती
पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथील जाकीर शेख सांगोला एसटी डेपोत एसटी वाहक म्हणून कार्यरत आहेत. ते सांगोला ते हैद्राबाद एसटीत वाहक म्हणून आहेत. जाकीर शेख गेल्या चार महिन्यापासून कामगारांच्या दुखवट्यात सहभागी आहेत. त्यांच्या हाताला काम नसल्याने वडिलोपार्जित शेतीत राबून शेती कसत आहेत. त्यांनी शेतात विविध प्रकारची नगदी पिके घेण्यास सुरुवात केली आहे. जाकीर शेख यांनी एक एकर शेतात दुधी भोपळ्याची शेती फुलवली आहे. एसटी महामंडळात कामाला असताना त्यांनी शेतीकडे फारसे लक्ष दिले नव्हते,पण आता घरीच असल्याने शेती चांगल्या प्रकारे करू लागले आहेत. त्यांच्या शेतातील दुधी भोपळा आंध्र प्रदेशातील हैद्राबाद येथे विकला जात आहे. एसटी कामगारांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सरकारने आपला निर्णय लवकर जाहीर करावा. एसटी कामगारांच्या कुटूंबाची होणारी होरपळ थांबवावी असे जाकीर शेख यांचे म्हणणे आहे.
द्राक्षेची बाग मोडून फुलवली फुलांची शेती
जाकीर शेख यांना वडिलोपार्जित साडेतीन एकर शेती आहे. सुरुवातीला एकाच प्लॉट मध्ये ड्रीपवर शेती केली जात होती. त्यामध्ये द्राक्षेची बाग होती. द्राक्षेची बाग तोट्यात जाऊ लागल्याने ती मोडून त्या ठिकाणी गुलछडी आणि गुलाबाची शेती फुलवली आहे. गुलछडी आणि गुलाबाच्या फुलांची विक्री जागेवर होत आहे. त्यामुळे जाकीर शेख यांचा वेळ वाचून त्यांना शेतीतील इतर कामांना वेळ देता येत आहे. शेख यांनी एका प्लॉट मध्ये कारल्याची शेती केली आहे. त्यातूनही त्यांना आर्थिक फायदा होत आहे. त्यामुळे त्यांना कुटूंबाचा खर्च उचलण्यास हातभार लागला आहे. गुलछडी मध्ये आंतरपिक असून त्यामध्ये टोमॅटोची लागवड केली आहे. यातूनही आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत चालू आहे. गुलाबफुलांची एक पेंडी 25 रुपयाला विकली जात आहे. अशा प्रकारे विविध प्रकारची शेती करून जाकीर शेख यांनी आर्थिक उत्पन्न वाढवण्यास सुरुवात केली आहे. हाताला काम नसल्याने निराश झाले नाहीत. त्यांनी नवनवीन कल्पना शोधून आर्थिक फायदा मिळवून देणारी शेती विकसित केली आहे.
संपात नसून दुखवट्यात सहभागी आहे
जाकीर शेख यांनी सांगितले की,107 एसटी कामगारांनी आत्महत्या केल्या आहेत. एसटी कामगार नैराश्यात असून आणखीन आत्महत्या वाढू नये,यासाठी शासनाने आपल्या निर्णय लवकर जाहीर करावा. गेल्या 4 महिन्यापासून एसटी कामगारांचा दुखवटा सुरू आहे.मला शेती असल्याने माझा कसातरी उदरनिर्वाह सुरू आहे. पण जी कुटूंबे एसटी महामंडळाच्या पगारावर अवलंबून होती.त्यांची परिस्थिती दैनिय झाली आहे. एसटी कामगारांना कुटूंबाचा खर्च उचलता येईना गेला आहे. त्यामुळे कामगारांत नैराश्य वाढू लागले आहे. त्यामुळे त्यांना आत्महत्या सारखे गंभीर पाऊल उचलावे लागले आहे. 107 कुटूंबाच्या प्रमुखांनी आत्महत्या केल्या आहेत,म्हणजे 107 कुटूंबे उध्वस्त झाली आहेत. ज्या कामगारांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्यांच्या कुटूंबाची अवस्था अत्यंत दैनिय झाली आहे. गेल्या 4 महिन्यापासून एसटी कामगारांचा दुखवटा चालू आहे. त्यामुळे बाहेर कुठेही कामाला न जाता वडिलोपार्जित असलेल्या साडेतीन एकर शेतीत काम करत आहे. शेतीमध्ये दुधी भोपळ्याची लागवड केली असून 5 रुपये किलो प्रमाणे विकला जात आहे. सध्या भोपळ्याला भाव जरी कमी असला तरी सरासरी अँव्हरेज चांगला आहे. त्यामुळे चांगले उत्पन्न निघू लागले आहे. यावरच कुटूंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे.
आत्महत्या रोकायच्या असतील तर शासनाने आपला निर्णय लवकर जाहीर करावा
एसटी महामंडळाचा दुखवटा सुरू असून आणखीन किती दिवस चालेल हे सरकारच्या हातात आहे. एसटी कर्मचारी एसटी महामंडळाच्या मागण्यांवर ठाम आहेत. गेल्या आठवड्यापासून एक बातमी सुरू आहे की,सातवा वेतन आयोग द्यायला सरकार तयार आहे. पण शासनाचा वेतन आयोगाचा निर्णय ही ठोस नाही. त्यासाठी आणखीन वाढीव वेळ मागितला आहे. सरकार जसा वेळ मागत आहे तशा आत्महत्या वाढू लागल्या आहेत. त्यामुळे सरकारने आपला निर्णय लवकरात-लवकर जाहीर करावा. त्यामुळे लालपरी रस्त्यावर पूर्ववत येण्यास वेळ लागणार नाही. शासनाने लवकर निर्णय जाहीर करावा अशी अपेक्षा शेवटी बोलताना जाकीर शेख यांनी व्यक्त केली.
एसटी कामगारांचे शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
गेल्या 4 महिन्यापासून सुरू असलेला संप संपवा अशी इच्छा कामगारांची आहे. त्यासाठी शासनाने पुढाकार घेऊन विलीनीकरणाचा निर्णय लवकर जाहीर करावा असे एसटी कामगारांना वाटत आहे. तर दुसरीकडे कामगार एसटी महामंडळाच्या विलीनीकरनावर ठाम आहेत. त्यासाठी त्यांचा न्यायालयीन लढा ही सुरू आहे. त्यांच्या मागणीला यश येईल अशी आशा एसटी कामगारांना आहे.