रेशीम शेती शेतकऱ्याला देतेय जगण्याचे बळ
X
शेती क्षेत्रावर दिवसेंदिवस अनेक संकटे येत असताना,त्या संकटांचा बाऊ न करता त्यांना धैर्याने सामोरे जात सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी शेतात नवनवीन पिकांच्या लागवडीचे प्रयोग करताना दिसत आहेत. रेशीम उत्पादनातून शेतकरी शिवाजी साळुंखे दोन महिन्यांला 80 ते 90 हजार रुपये कमवत आहेत, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा रिपोर्ट.....
शेती करत असताना पाण्याची आवश्यकता असते. शेताला पाणी देण्यासाठी विद्युत मोटारी ही लागते.पण सोलापूर जिल्ह्यात लाईटच्या कपातीमुळे व भरमसाट आलेल्या बिलांमुळे शेतकऱ्यांची विजतोडणी केली जात आहे.त्यामुळे महावितरणच्या विरुद्ध दररोज मोर्चे निघू लागले आहेत.दिवसेंदिवस शेती व्यवसाय अडचणीत येत असताना कमी कालावधीत जास्त पैसे मिळवून देणाऱ्या पिकांकडे शेतकरी वळू लागला आहे.असाच प्रयोग पंढरपूर तालुक्यातील उपरी येथील शेतकरी शिवाजी साळुंखे यांनी आपल्या शेतात केला आहे.त्यांनी आपल्या शेतात रेशीम शेती विकसित केली आहे.
त्यासाठी तुती या रोपांच्या झाडांची लागवड केली आहे.या रोपांची पाने रेशीम किड्याना खायला घालून त्यापासून रेशीम कोष तयार करून कर्नाटक राज्यातील बाजारपेठेत विकले जात आहेत.त्याला चांगल्या प्रकारे भाव येत आहे.शिवाजी साळुंखे गेल्या 21 वर्षांपासून रेशीम शेती करत आहेत.तसे पाहिले तर सोलापूर जिल्ह्यात रेशीम शेतीचे क्षेत्र अत्यंत अल्प असे आहे.शेतकऱ्यांनी रेशीम शेती करावी यासाठी शासन शेतकऱ्यांना रेशीम शेतीच्या लागवडीचे मार्गदर्शन करून त्यांना अनुदान देत आहे.त्यांच्या या शेतीची पंढरपूर तालुक्यात चर्चा असून त्यांच्या शेतीला शेतकरी भेट देऊ लागले आहेत.या रेशीम उत्पादनातून शेतकरी शिवाजी साळुंखे दोन महिन्यांला 80 ते 90 हजार रुपये कमवत आहेत.शेती क्षेत्र अडचणीत येत असताना त्यांच्या या रेशीम शेतीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
गेल्या 21 वर्षांपासून करतात रेशीम शेती
रेशीम शेती करत असताना सुरुवातीच्या काळात शेतकरी शिवाजी साळुंखे यांना अडचणी आल्या.पण त्यांनी रेशीम शेती करण्याचे सोडले नाही.वर्ष 2000 सालापासून रेशीम शेती करत आहेत.म्हणजे गेल्या 21 वर्षांपासून या शेतीवर काम करत आहेत.रेशीम उत्पादित करण्याच्या अगोदर शिवाजी साळुंखे शेतात तरकारीचे उत्पादन घेत होते.त्यात भाज्या व फळभाज्यांचा समावेश होतो.त्याचबरोबर ऊस ,गहू,ज्वारी,मका याचे उत्पादन घेतले जात होते.पण यातून आर्थिक फायदा होत नसल्याने शेतकरी शिवाजी साळुंखे नगदी पिकाच्या शोधार्थ होते.त्यातच त्यांचा मावस भाऊ माळशिरस तालुक्यातील मळखांबी येथे रेशीम शेती करत असल्याचे समजले.त्यांनीच शिवाजी साळुंखे यांना रेशीम शेती करण्याचा सल्ला दिला.शेतकरी शिवाजी साळुंखे यांनी त्यांच्या रेशीम शेतीला भेट देऊन सविस्तर माहिती घेतली.त्यानंतर बऱ्याच रेशीम शेतीला साळुंखे यांनी भेट देऊन माहिती गोळा करून त्यांच्या मित्राने व त्यांनी 2000 साली रेशीम उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या तुतीच्या रोपांची लागवड केली.
एका महिन्यात उत्पादन निघत असल्याने रेशीम शेतीकडे वळलो
यावेळी शेतकरी शिवाजी साळुंखे यांनी बोलताना सांगितले की,पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील रेशीम शेतीची माहिती घेऊन,त्यासाठी आवश्यक असणाऱ्या शेड नेटची उभारणी केली.उत्पादन एका महिन्यात निघत असल्याने मजा यायची.त्यावेळी रेशीम कोष 80 रुपये किलो प्रमाणे विकला जात होता.रेशीम लागवड केल्यानंतर सुरुवातीच्या काळात पंढरपूर येथील कृषी अधिकारी यांनी रेशमी उत्पादन निघेपर्यंत मार्गदर्शन केले.अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून भरपूर शिकलो.रेशीम शेती बरी वाटू लागल्याने तेव्हापासून रेशीम उत्पादन करत आहे.असे साळुंखे यांनी सांगितले.
तुतीच्या झाडांवर रासायनिक फवारण्या केल्या जातात पण कीटकनाशकाच्या फवारण्या केल्या जात नाहीत
तुतीच्या रोपांची लागवड केल्यानंतर त्या रोपांवर रासायनिक फवारण्या केल्या जातात पण कीटकनाशकांच्या फवारण्या केल्या जात नाहीत.या झाडांची छाटणी शेडमध्ये रेशीम किडे आल्यानंतर सुरू होते.या झाडांचा उपयोग रेशीम किडे यांचे अन्न म्हणून केला जातो.या झाडांवर बायोझम, पोषण औषध व काही घरगुती टॉनिकच्या फवारण्या करत असल्याचे शेतकरी शिवाजी साळुंखे यांनी सांगितले. तुतीच्या रोपांची लागवड कांड्या किंवा रोपाव्दारे केली जाते.साळुंखे यांच्या शेतातील रोपांची लागवड सात बाय अडीजवर केली आहे.लागवडीनंतर सहा ते सात महिन्यात तुतीचे उत्पादन सुरू होते.
कर्नाटकातील रामनगर येथून आणले जातात रेशीम किडे
शेतकरी शिवाजी साळुंखे रेशीम उत्पादित करण्यासाठी लागणारे किडे कर्नाटकातील रामनगर येथून मागवतात.रेशीम किडे रामनगर येथून येत असताना त्यांचा जन्म झालेला नसतो. ते अंड्यातच असतात.त्यांच्या जन्माच्या तारखा दिलेल्या असतात.त्याच तारखेला रेशीम किड्यांचा जन्म झाल्यास पुढील महिन्यातील त्याच तारखेपर्यंत रेशीम कोष तयार होऊन त्याची विक्री केली जाते.या रेशीम कोषाची विक्री रामनगर येथेच केली जात होती पण कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे व्यापारी जागेवर येऊन रेशीम कोषाची खरेदी करत असत.आम्हाला जाग्यावर दर योग्य वाटल्यास व्यापाऱ्यांना विकतो नाहीतर रामनगर किंवा पंढरपूरपासून 150 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कर्नाटकातील अथणी शहरात जाऊन रेशीम कोषाची विक्री करतो असे साळुंखे यांनी सांगितले.
दोन महिन्यात निघते 80 ते 90 हजार रुपयांचे उत्पादन
दोन महिन्यात कमीत-कमी 80 ते 90 हजार रुपयांचे उत्पादन निघते.तुतीच्या लागवडीसाठी मजुरासह 10 ते 20 हजार रुपये खर्च येतो.पण रेशीम कोष तयार करणाऱ्या किड्यासाठी शेड नेट उभारण्यासाठी साडेतीन लाख रुपयांचा खर्च येतो.शेड उभारत असताना रॅक,ट्रे, जाळी,शेड नेट पत्रा यासाठी जास्त खर्च येतो.शासनाकडून रेशीम शेती वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान देण्यात येत होते.पण लॉकडाऊनपासून गेल्या दोन वर्षांपासून अनुदान बंद आहे.एक एकर तुतीची लागवड केल्यास शासनाकडून 40 हजार अनुदान मिळते.रेशीम शेतीच्या लागवडीसाठी दोन ते पावणे दोन एकर शेती क्षेत्र गेले असल्याचे शेतकरी शिवाजी साळुंखे सांगतात.
वाढत्या तापमानापासून रेशीम किड्याचे संरक्षण व्हावे यासाठी आधुनिक शेड नेटची केली उभारणी
शेतकरी शिवाजी साळुंखे यांनी कर्नाटकातील रामनगर येथून रेशीम किडे मागवले आहेत.सध्या वाढत्या उन्हात त्यांचा निभाव लागणे शक्य नसल्याने त्यांनी शेड वर कागद आच्छादन केले आहे.शेडच्या बाजूने नेट मारली आहे.आतील वातावरण थंड राहावे यासाठी ते शेडच्या बाजूने पाण्याचा मारा करतात.शेडच्या आतील बाजूस लाइटची सोय करण्यात आली आहे.साळुंखे यांनी 1लाख 60 हजार रेशीम किडे शेड मधील रॅक मध्ये पसरून टाकले आहे.त्यांना खाण्यासाठी तुतीचा पाला टाकण्यात येत आहे.त्यांची व्यवस्थित देखभाल करण्यात येत आहे.सध्या रेशीम किडे लहान असून त्यांची वाढ सुरू आहे.हळूहळू वाढ होऊन त्याचे कोषात रूपांतर होणार आहे.हा तयार झालेला कोष बाजारात विक्रीसाठी पाठवण्यात येणार आहे.सध्या या रेशीम कोषाला 950 रुपये किलो भाव असल्याचे शेतकरी शिवाजी साळुंखे यांनी सांगितले.रेशीम शेतीबरोबरच शेतात इतर पिकेही घेत आहेत.त्यांच्याकडे बागेत चालवण्याचा ट्रॅक्टर असून त्याचा रेशीम शेतीला जोडधंदा म्हणून उपयोग करतात.
रेशीम शेतीचे प्रशिक्षण घेण्यासाठी जळगाववरून आला विद्यार्थी
शिवाजी साळुंखे यांची फायद्यातील रेशीम शेती पाहून जळगाव येथील विद्यार्थी जयेश पाटील तेथे मुक्कामी राहून रेशीम शेतीची माहिती घेत आहेत.जयेश यांचे शिक्षण इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग झाले आहे.घरी मुबलक शेती असल्याने त्यांनी शेती करण्याचे ठरवून ते शेती क्षेत्रात आले आहेत.त्यांनी जळगाव येथील शेतात विविध पिकांचे प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे.