Home > मॅक्स किसान > पावसाची दडी, दुबार आणि तिबार पेरणीच्या संकटाने बळीराजा हवालदिल

पावसाची दडी, दुबार आणि तिबार पेरणीच्या संकटाने बळीराजा हवालदिल

पावसाची दडी, दुबार आणि तिबार पेरणीच्या संकटाने बळीराजा हवालदिल
X

राज्यात यावर्षी पावसाने वेळेवर आणि दमदार आगमन केले. यामुळे गेल्या दोन वर्षांपासून संकटात असलेल्या शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला. पावसाचे वेळेवर आगमन आणि दमदार पाऊस यामुळे मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागात शेतकऱ्यांनी उत्साहात पेरण्या केल्या. मात्र वेळेत एंट्री घेणाऱ्या मान्सूनने आता राज्यातील काही भागात जबरदस्त हुलकावणी दिलीय...त्यामुळे पिकं माना टाकू लागली आहेत, ...जर पावसाने आणखी काही दिवस ओढ दिली तर महाराष्ट्रातील जवळपास २७ टक्के कोरडवाहू क्षेत्रामध्ये दुबार पेरणीचे संकट ओढवणार आहे. याआधी अवकाळी पाऊस, चक्रीवादळ यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटाने लॉकडाऊन लावण्यात आले. त्यामुळे शेतात पीक तयार होऊनही शेतकऱ्यांना पिकाच्या विक्रीवर मर्यादा आल्या. लांबच्या बाजारपेठांमध्ये जाता आले नाही, त्यामुळे जवळच मिळेल त्या भावात शेतमाल विकावा लागला. एकूण शेतकरी सर्वच संकटांनी घेरला गेला आहे.

पावसाने अशी दडी मारल्याने शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. त्याचे परिणामही आता दिसू लागले आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू होते की काय अशी स्थिती राज्यात पुन्हा निर्माण झाली आहे. आर्थिक अडचण आणि दुबार पेरणी करूनही पावसाअभावी पीक उगवले नाही, एका शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केली आहे. आर्थिक संकट ओढवलेल्या शेतकरी दाम्पत्याने विषारी औषध घेऊन आपले जीवन संपविल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यातील कारखेड या गावात घडली आहे. या दाम्पत्याने 7 जुलै रोजी रात्री आपल्या राहत्या घरी विष घेतले होते. त्यानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. उपचारा दरम्यान शेतकऱ्याच्या पत्नीाचा 8 जुलै रोजी रात्री तर शेतकऱ्याच्या 9 जुलैला सकाळी मृत्यूच झाला.




60 वर्षीय शेषराव मंजुळकार आणि 51 वर्षीय जनाबाई मंजुळकार अशी आत्मरहत्या केलेल्या दाम्प्त्याची नावे आहेत. त्यांच्याकडे दोन एकर शेती होती. यावर्षी पाऊस पडल्यावर त्यांनी पेरणी केली. मात्र बियाणे उगवलेच नाही, त्यामुळे त्यांनी शेतात दुसऱ्यांदा पेरणी केली, ते उगवलेले असताना ही पावसाअभावी पीक करपून गेले. आता तिसऱ्यांदा पेरणी करायची तर त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले. दोनवेळा पेरणी केली तेव्हा जवळचे पैसे खर्च झाले आणि तिसऱ्यांदा पेरणी कशी करायची या विवंचनेतच खचल्याने दोघांनी विष घेतले होते. त्यां च्याावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला आहे.

या कुटुंबाची दोन एकर शेती असून, त्यांना दोन मुले तसेच चार मुली आहेत. या सर्वांची लग्न झालेली आहेत.. मंजुळकार दाम्पत्य हे त्यांच्या शेतीसोबतच परिसरात दगड फोडणे आणि मजुरी करण्याचा व्यवसाय होता. यावरच त्यांचा प्रपंच चालायचा. शिवाय पत्नी जनाबाई याना अर्धांगवायूचा त्रास झाला होता. या सर्व प्रकारामुळे दोघेही चिंताग्रस्त होते.




अशीच काहीशी परिस्थती औरंगाबाद जिल्ह्यातील शिवनाई गावातील गोरख काळे यांची आहे... गेल्यावर्षी 2 एकरमध्ये 30 हजार रुपये खर्च करून कापूस आणि कांद्याची लागवड केली...पण अतिवृष्टीळे होत्याचे नव्हते झाले. कापूस विकून लावलेला खर्चही निघाला नाही. तर कांदे पाण्यात वाहून गेले... त्यातही स्वताला सावरून पुन्हा उभा राहत असल्याने आता दुबार पेरणीच संकट छाताडावर येऊन उभा आहे...गोरख काळे यांच्या खांद्याला खांदा देऊन त्यांच्या पत्नी सुद्धा शेतात राब-राबतात... पण आता पावसाने पाठ फिरवल्याने कसं जगावं असा प्रश्न त्यांना पडला आहे... काळे यांची सारखीच परिस्थती गावातील प्रकाश काळे यांची आहे... दोन एकरमध्ये त्यांनी 3 डब्बे कापूस लावला आहे...नागर,बी-बियाणे मिळून आतापर्यंत 10 हजरांचा खर्च झाला आहे...पण पावसाने पाठ फिरवल्याने लावलेल्या पिकांना जगवणे अवघड झालं आहे.... हवामान खात्यानं यंदा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला होता, मात्र पेरणीच्या काळातच राज्यातल्या अनेक भागात पावसाने दडी मारलीय. त्यामुळे खरीप हंगामच शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची भिती आहे. शिवाय राज्यातील काही जिल्हे दुष्काळाच्या सावटाखाली असल्यानं शेतकरी हवालदिल झालाय.

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यातील काही भाग आणि नाशिक, धुळे, अकोला, बुलडाणा याभागात शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढलीय. त्यामुळे हे जिल्हे दुष्काळाच्या सावटाखाली जातील की काय?, अशी भिती व्यक्त केलीय जातेय.

पावसाळ्याला सुरूवात झाल्यानंतर आणि पेरणीला सुरूवात झाल्यानंतर पावसाने ओढ देणे काही नवीन नाही. पण 2 वर्ष सलग चांगला पाऊस झाल्यानंतर यंदा पावसाने ओढ दिली. आठवड्याच्या शेवटी पावसाची शक्यता आहे. पण पावसाने ओढ दिल्यानंतर काही गोष्टी शेतकऱ्यांनी करणे गरजेचे असते. या आकस्मिक उपाययोजनांनी पीक वाचवता येऊ शकते. हलकी डवरणी किंवा कोळपणी शेतकऱ्यांनी केली तर जमिनीतील ओलावा टिकून राहतो. जिथे पिकाला 3 आठवडे झाले आहेत तिथे अर्धा टक्का पोटॅशिएम नायट्रेटची फवारणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती कृषी-हवामान तज्ज्ञ डॉ. उदय देवळाणकर यांनी दिली आहे. शेतकऱ्यांनी या सूचनांचे पालन केले तर पिकांना काही दिवस आणखी संरक्षण देता येऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. पण आठवडाभरानंतरही पाऊस आला नाही तर काय, असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे.




मराठवाड्यातील काही जिल्ह्यात अद्याप पेरणीयोग्य पाऊस झालाच नाही. तीच गत धुळे, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यात आहे. विदर्भातील अकोल्यासह काही भागात पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने हा भाग सध्या तरी दुष्काळाच्या छायेत आहे, त्यामुळे पुन्हा एकदा राज्यावर दुबार पेरणीसह खरीप हातून जाण्याची भिती वर्तवली जात आहे. गेल्या काही वर्षात पावसाच्या बदलत्या ट्रेन्ड्सचा विचार केला तर त्यादृष्टीने सरकारच्या उपाययोजना होताना दिसत नाहीयेत. हवामान विभागाचे अंदाज अचूक ठरतील का अशी भीती कायम शेतकऱ्यांना असते. त्यामुळे काय करावे या संभ्रमात शेतकरी असतो. काही दिवसांपूर्वी कृषी विभागाने शेतकऱ्यांना पाऊस दडी मारण्याची शक्यता असल्याने पेरण्या करुन नका असे आवाहन केले होते. ज्यांनी ते आवाहन मानले त्या शेतकऱ्यांना फायदा झाला, पण पेरणी टाळणे हा काही कायमस्वरुपी उपाय नाही. त्यावर उपाययोजना होणे गरजेचे आहे.

Updated : 10 July 2021 8:00 PM IST
Next Story
Share it
Top