Home > मॅक्स किसान > राजकीय साठमारीत 'जनता' गंडली : तुषार गायकवाड

राजकीय साठमारीत 'जनता' गंडली : तुषार गायकवाड

"महाराष्ट्रात आजमितीस कोरड्या दुष्काळाची (Drought in Maharshra) स्थिती आहे. पंजाबराव डख (Pqnjabrao Dakh) आणि शासकीय हवामान खाते (IMD) यांच्या भरवश्यावर शेती केल्यास शेतकऱ्यांना माती खावी लागेल"

राजकीय साठमारीत जनता गंडली : तुषार गायकवाड
X

"महाराष्ट्रात आजमितीस कोरड्या दुष्काळाची (Drought in Maharshra) स्थिती आहे. पंजाबराव डख (Pqnjabrao Dakh) आणि शासकीय हवामान खाते (IMD) यांच्या भरवश्यावर शेती केल्यास शेतकऱ्यांना माती खावी लागेल", असं राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक तुषार गायकवाड यांनी म्हटलं आहे.



महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या अशिक्षित वाड-वडीलांकडून निसर्गातील बदल पाहून हवामान अंदाज बांधण्याचा पिढीजात अनमोल वारसा लाभलेला आहे. पंजाबराव डख त्याच वारशावर पावसाचे अंदाज जाहीर करणारा व्यक्ती आहे. एबीपी माझा या चॅनेलवरील त्यांची मुलाखत बघून हेच स्पष्ट होते.

मात्र अशा प्रकारच्या अंदाज बांधण्याच्या प्रकाराला विज्ञानाच्या कसोटीवर १०० टक्के सत्य म्हणून मान्यता देता येत नाही. हे सुध्दा खरंय! पण त्याचप्रमाणे पंजाबराव किंवा अन्य कोणी शेतकरी जर नैसर्गिक बदलांवर हवामानाचे अंदाज बांधत असेल. तर तेसुध्दा पूर्णपणे अवैज्ञानिक आहे. असेही म्हणता येणार नाही!

याबद्दलची काही उदाहरणे स्वानुभवातून देता येतील. बहावा, पळस, आंबा या तीन वृक्षांना उन्हाळ्यात ज्याप्रकारे बहर येतो, फुले व पालवी येण्याचे प्रमाण असते. यावरुन त्यावर्षीच्या पावसाळ्यातील खंड लक्षात येतात. यावर्षी बहावा व पळस वेळेआधी फुलले. शिवाय त्यांच्या बहराचे ३-४ टप्पे पडले. आंब्याच्या मोहराने तर बहुतांशी दांडी मारली. याचा अर्थ पाऊस उशिरा, अनियमित वा कोरड्या दुष्काळाची स्थिती निर्माण होते. वृक्षांच्या बदलावरुन अंदाज अवैज्ञानिक नाही!

वादळी किंवा वळीव स्वरुपाचा पाऊस होण्याआधी ३-४ दिवस चिमण्या थव्याने मातीच्या सर्वात वरच्या हलक्या कणांच्या थरात ज्याला फुफाटा म्हणतात. त्या फुफाट्यात गडाबडा लोळताना आढळतात. आकाशाचा रंग बदलतो, त्यानुसार नदीच्या वाहत्या पाण्यात, डोहांच्या पाण्याचा रंग बदलतो. त्यावरुनही अंदाज बांधले जातात. हे नैसर्गिक बदल आहेत. त्याला पूर्णतः अवैज्ञानिक म्हणता येत नाही.

पारंपारिक रुढींवर हवामान अंदाज सांगणाऱ्या व हवामान तज्ञ नसलेल्या पंजाबराव डख ची कारकीर्द पाहिली, तर यावर्षी त्यांचे अंदाज पूर्णतः गंडलेले आहेत. बहुधा केवळ सॅटेलाईट चित्रे पाहून बिपरजाॅय, एल निनो प्रभावाचा परिणाम याचे मुल्यमापन करता आले नसावे. पण दुसरीकडे शिक्षित व संपूर्ण वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या हवामान तज्ञांचाही पावसाचा अंदाज दक्षिण भारत तथा महाराष्ट्राबाबत पूर्णतः चुकला आहे.

महाराष्ट्रात तर आजमितीस कोरड्या दुष्काळाची स्थिती आहे. जगभरात मानवाने केलेल्या निसर्गावरील आक्रमणाचा मान्सून वर गंभीर परिणाम झाला आहे. हे आता मान्य करावेच लागेल. भारतात वाढीव सिमेंटच्या जंगलांचे, रस्त्यांचे परिणाम भोगावेच लागणार आहेत.

पण त्याचबरोबर पंजाबराव डख आणि शासकीय हवामान खाते यांच्या भरवश्यावर शेती केल्यास माती खावी लागेल हे वास्तव नाकारता येणार नाही. तसेच त्यांना अवाजवी महत्त्व देवूनही उपयोग नाही.

त्यापेक्षा प्लास्टिक आणि कार्बन उत्सर्जनाचा भस्मासुर आपण कसा रोखणार आहोत? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. बांबू नंतर सर्वाधिक कार्बन शोषणारे ऊस हे पीक आहे. पण शहरी सुशिक्षित अडाणचोट वर्ग अज्ञात आणि राजकीय दृष्टीने ऊस आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या नावाने आगपाखड करतो.

ऊसाच्या सिंचनासाठी जितके पाणी वापरले जात नाही. त्यापेक्षा कैक पटीने जास्त पाणी शहरातील इमारतींच्या वापरातून दररोज सांडपाणी म्हणून बाहेर पडते. आणि हे पाणी भूगर्भाची चाळण करुन उपसले जाते. ३ टक्के इमारतींकडे रेन वॉटर हार्वेस्टिंग सुविधा टेंभा मिरवण्यासाठी असते. प्रत्यक्षात १ टक्के तरी कार्यरत असेल की नाही? याची शाश्वतीही देता येत नाही.

राजकीय साठमारीत जनता म्हणून आपण फार गंडलेलो आहोत. त्याचे परिणाम आपण भोगत असलो, तरी यापेक्षा गंभीर व भयानक परिणाम येत्या काळात भोगावे लागणार आहेत. ते रोखायचे असेल? तर यापुढे राजकीय पक्षांच्या जाहिरनाम्यात जल, जमीन, जंगल (वनसंपदा रक्षण) रक्षण व वृध्दी, रेन वॉटर हार्वेस्टिंग, प्लास्टिक वापर कमी करुन इतस्ततः पडलेले प्लास्टिक जमा करुन रस्ते बांधकाम, इंधन निर्मितीसाठी वापर व अन्य पर्यावरणीय तरतुदींचा समावेश करायला लावायला हवा.

पण याबाबतीत किती नागरिक जागरुक आहेत? हा संशोधनाचा विषय आहे.

- तुषार गायकवाड.

#नोंद११जुलै२०२३

"महाराष्ट्रात तर आजमितीस कोरड्या दुष्काळाची स्थिती आहे. जगभरात मानवाने केलेल्या निसर्गावरील आक्रमणाचा मान्सून वर गंभीर परिणाम झाला आहे. पंजाबराव डख आणि शासकीय हवामान खाते यांच्या भरवश्यावर शेती केल्यास शेतकऱ्यांना माती खावी लागेल".

- तुषार गायकवाड, राजकीय विश्लेषक


Updated : 11 July 2023 11:05 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top