मराठवाडा: परतीच्या पावसाने सोयाबीन, कापूस मातीमोल
अतिवृष्टीने वेचणीला आलेला कापूस गळून पडला, सोंगूण ठेवलेले सोयाबीन भिजले, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका...पाहा काय ग्राउंड झिरोवर शेतकऱ्यांची स्थिती? पाहा मॅक्समहाराष्ट्रचे प्रतिनिधी प्रतिनिधी मोसीन शेख यांचे विशेष विश्लेषण...!
X
दुष्काळाचे चटके गेल्या अनेक दशकांपासून सोसणाऱ्या मराठवाड्यावर यंदा परतीच्या पावसामुळे ओल्या दुष्काळाचे संकट कोसळले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतात तर पाणी भरले गेल्याने एवडा चिखल झाला होता की वाचलेलं पीत काढून बाजारापर्यंत नेणंही त्यांनी शक्य झाले नाही. खरीप पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. तर वेचणीला आलेला कापूस गळून पडला असून सोंगूण ठेवलेले सोयाबीन भिजले असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला आहे.
खरीप हंगामातील 25 लाख हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. 35 लाख 69 हजार 400 शेतकऱ्यांना भरपाईसाठी 2 हजार 546 कोटी रुपये लागणार आहे. विभागीय प्रशासनाने हा अंतिम अहवाल शासनाकडे पाठविला आहे.
पाठवलेल्या अहवालात 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान क्षेत्र मदतीसाठी पात्र ठरवले असल्याचं नमूद करण्यात आले आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातील 2 लाख 65 हजार हेक्टर, जालना 4 लाख 93 हजार, परभणी 1 लाख 79 हजार, हिंगोली 2 लाख 27 हजार, नांदेड 5 लाख 64 हजार,बीड 2 लाख 55 हजार, लातूर 2 लाख 50 हजार तर उस्मानाबाद जिल्ह्यातील 2 लाख 59 हजार असे 25 लाख हेक्टरचे नुकसान झाले असून यात जिरायत,बागायत,फळपिकांच्या पंचनाम्यांचा समावेश आहे.
प्रशासनाने शासनाला पाठवलेल्या आकडेवारीनुसार औरंगाबाद जिल्ह्यातील 3 लाख 73 हजार 698 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला असून,त्यासाठी 278 कोटी 12 रुपयांची मदत मिळणे अपेक्षित आहे. याचप्रमाणे जालना जिल्ह्यात 5 लाख 79 हजार 196 शेतकरी बाधित असून, 524 कोटी 53 लाख रुपये मदत मिळणे अपेक्षित आहे.परभणी 2 लाख 52 हजार 185 शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. तर त्यासाठी 180 कोटी 37 लाख मदत मिळणे अपेक्षित आहे.
हिंगोलीत 3 लाख 7 हजार 626 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला असून त्यासाठी 227 कोटी 28 लाख रुपयांची मदत लागणार आहे. तर नांदेडमध्ये 7 लाख 4 हजार 409 शेतकऱ्यांना 565 कोटी 13 मदत मिळणे अपेक्षित असल्याचं विभागीय प्रशासनाने शासनाला कळवले आहे.
तर बीड जिल्ह्यातील 4 लाख 32 हजार 706 शेतकरी बाधित असून, त्यासाठी 255 कोटी 95 लाख रुपये लागणार आहे. लातूर ची परिस्थिती सुद्धा काही वेगळी नसून,येथील 4 लाख 33 हजार 42 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला असून यासाठी 250 कोटी 30 लाख रुपये मदतीची अपेक्षा आहे. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यात सुद्धा 3 लाख 98 हजार 805 शेतकऱ्यांच नुकसान झाले असून,त्यांच्या नुकसानभरपाईसाठी 264 कोटी 30 लाख रुपये अपेक्षित असल्याचं अहवालात उल्लेख केला गेला आहे.
तर मागच्या वर्षी म्हणजेच ऑक्टोंबर-नोव्हेंबर 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातील सुमारे 44 लाख 33 हजार 549 शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यावेळी बाधित शेतकऱ्यांना 3 हजार 350 कोटींची मदत देण्याबाबत शासकीय स्तरावर निर्णय झाला होता.
मराठवाड्यात पावसाचे प्रमाण पाहता शेतकरी कापूस-सोयाबीन सारख्या पिकांवर अधिक भर देतात. तसेच नगदी पीक असल्याने अनेक जण या दोन्ही पिकांना पसंती देतात. मात्र यावेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे या दोन्ही पिकांना मोठ्याप्रमाणात फटका बसला आहे. सोयाबीन काढणीला आले होते तर कापसाची वेचणी सुरू असतानाच अधिकचा पाऊस झाला. त्यामुळे हातात आलेलं पीक शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर होत्याच नव्हतं झालं.
याचप्रमाणे औरंगाबाद जिल्ह्यातील देविदास घोडके यांनी आपल्या अडीच एकर शेतात कापूस लावला होता. फवारणी खत खुरपणी हे सगळे मिळून त्यांना जवळपास 35 ते 40 हजार रुपये खर्च लागला. तर एवढं सगळं करुन हातात हातात करुन हातात हातात हातात तीस कुंटल पेक्षा जास्त कापूस येईल अशी अपेक्षा त्यांना होती होती.
मात्र अतिवृष्टी आणि त्यात आता परतीच्या पावसाने त्यांचे स्वप्न उद्ध्वस्त केले आहे.तसेच अशीच पावसाची परिस्थिती राहिली तर हातात सात ते आठ क्विंटल ही कापूस येणार नसल्याचं घोडके म्हणाले. त्यामुळे लावलेला खर्चही त्यांच्या हातात पडणार नाही आणि नेहमीप्रमाणे तोट्यातील शेती त्यांना यावेळीही करावी लागल्याची खंत घोडके बोलून दाखवतात.
बीड जिल्ह्यातील माजलगाव पासून 7 किलोमीटर असलेल्या पवारवाडी येथील श्रीमंत पवार या शेतकऱ्याने आपल्या आठ एकर मध्ये सोयाबीनचे पीक लावलं होतं. सुरुवातीपासूनच पाऊस चांगला असल्याने पीकही दमदार असल्याचे पाहून पवार सुखावले होते. सप्टेंबर महिन्यात सोयाबीन काढणीला येतो.त्यामुळे त्यांनी तशी तयारी सुद्धा केली. मात्र याचवेळी अतिवृष्टी झाली आणि होत्याचं नव्हतं झालं.
पवार यांनी आपल्या 8 एकर शेतात 8 ब्यागा सोयाबीन लावलं होतं.यासाठी त्यांना एक ते सव्वालाख रुपये खर्च आले. सुरवातीला चांगल्या पाऊस असल्याने त्यांनी प्रचंड मेहनत करत पिकाची काळजी घेत काढणीपर्यंत वाचवलं. मात्र शेवटच्या टप्प्यात अपेक्षा पेक्षा जास्त पाऊस झाल्याने सर्वच सोयाबीन पीक उध्वस्त झालं. नेहमीच संकटात असणाऱ्या मराठवाड्यातील शेतकरी आता पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. सरकारने केलेली मदत प्रत्यक्षात अपुरी आहे.
सरकारने केलेल्या मदतीतून केलेला खर्च निघेल, मात्र कुटुंब कसा चालवायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सरकारी मदत शेतकऱ्यांपर्यंत कधी पोहोचेल हासुद्धा एक प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांचे, विरोक्षी पक्षनेत्यांचे दौरे झाले आहेत. बांधावर जाऊन पाहणी करण्यात आली आहे. त्यानंतर सरकारने १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. पण प्रत्यक्षात शेतीसाठी जेमतेम साडे ५ हजार कोटीच येणार आहेत.
केवळ मराठवाडाच नाही तर राज्यातील इतर भागातही अतिवृष्टीने शेतीचे नुकसान केले आहे. त्यामुळे साडे ५ हजार कोटींमधून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वाट्याला किती रुपये येतील हा प्रश्न आहे. झालेले नुकसान भरुन निघणे, पुढच्या हंगामासाठी पेरणीचा खर्च आणि मग जगण्यासाठीचा खर्च याची सोय होणार का हा प्रश्न डोळ्यात घेऊन शेतकरी सरकारच्या मदतीकडे आस लावून बसला आहे.