Home > मॅक्स किसान > पावसाचे असमान वितरण : पेरणीसाठी शेतकरी संकटात ?

पावसाचे असमान वितरण : पेरणीसाठी शेतकरी संकटात ?

शेतकऱ्यांना योग्य आणि खात्रीशीर मार्गदर्शन का मिळत नाही? शासन आपण कुठे कमी पडतो याचे आत्मचिंतन का करत नाही? शेतकऱ्यांचा हवामान विभागापेक्षा खासगी तज्ञांवर जास्त विश्वास का? हवामान विभागाचा अंदाज ग्रामीण भागात बहुतांश शेतकऱ्यांपर्यंत का पोहचत नाही? खासगी तज्ञांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल होत नाही ना? ह्याची तपासणी का केली जात नाही? - सोमिनाथ घोळवे

पावसाचे असमान वितरण : पेरणीसाठी शेतकरी संकटात ?
X

आज सकाळी मामांना गावाकडे (निवडंगवाडी ता. जि. बीड) फोन केला होता, त्यांना फोनवर बोलताना चालू हंगामातील पिकांचे फारसे चांगले आहे असे दिसून येत नाही.

हॅलो मामा, "काय कामे चालू आहेत? बि-बियाणे, रासायनिक खते घेतली का? झाली पेरणी का? असं विचारले.

त्यावर मामा म्हणाले, “पेरणीचीच कामे चालू आहेत, अर्धी पेरणी झालीय, राहिलेली पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये होईल".

मी विचारले, “पेरणीला ओलावा चांगला झाला आहे का? पाऊस किती झालायं?”.

त्यावर मामा म्हणाले “दोन-चार सटकारे (१० ते १५ मिनिटांचा एक पाऊस म्हणजे एक सटकारा) झालेत, शेतात केवळ टुचभर ओल झालीय. त्याखाली कोरड हाय, पण चुंबळी देऊन पेरत आहे. त्यामुळे बियाणे ओलीला पडत हाय”.

मी म्हणालो, “असं असेल तर पेरू नका. कारण बियाणं जरी चार इंचावर पडले, ते चार दिवसांनी बियाणे उगवलं तर मुळी लगेच कोरडीला जाईल आणि सर्व करपून जाईल. वारं सुटलेले असेल तर उन्ह आणि वाऱ्यामुळे आहे ती ओल पण संपून जाईल. थोडा पाऊस होवू द्या”.

त्यावर मामा म्हणाले, “पाऊस पडणार आहे, असे “.....” तज्ज्ञाने सांगितले आहे. तसेच हवामान खाते देखील म्हणत आहे, मान्सून वाढणार आहे.

मी म्हणालो, " असे आपण कुठे ऐकले, तुम्हाला कोणी माहिती दिली?"

त्यावर मामा म्हणाले, "आमच्या गावातील पोरांकडे मोबाईल माहिती आली आहे, मोबाईलमध्ये आम्ही व्हिडीओ बघितला हाय" असेच बरेच मला ऐकवलं. शेवटी म्हणाले “आता मी पेरायला चाललो आहे, ठेऊ का फोन? संध्याकाळी बोलू”

फोन ठेवल्यावर मी सुन्न झालो, विचार करू लागलो. शेतकऱ्यांच्या बाबतीत असेच किती असेच दिवस चालणार आहे? योग्य आणि खात्रीशीर मार्गदर्शन का मिळत नाही? नेमके शासन कुठे कमी पडते याचे आत्मचिंतन का नाही? शेतकऱ्यांनी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे? कमी ओलाव्यात पेरणी करत असण्यास नेमके कोण जबाबदार? अशा अनेक प्रश्नांचा विचार मनात आले.

गेल्या आठवड्यातील वर्तमानपत्रे काढली आणि हवामानाच्या बातम्या काय आहेत हे तपासल्या. तसेच सोशल मिडिया वरील खाजगी हवामान तज्ज्ञ काय सांगत होते हे देखील पहिले. यातून हवामान विभागापेक्षा खासगी हवामान सांगणाऱ्या व्यक्तीचे शेतकरी जास्त ऐकत आहेत, विश्वास ठेवत आहेत हे लक्षात आले.

दुसरे, खरीप पेरण्याचा आढावा घेतला असता, अंदाजे 60 ते 65 टक्के क्षेत्रफळावर पेरण्या झाल्या असतील असे दिसून आले. मात्र पाऊस पुरेसा पडला नसल्याने, झालेल्या पेरण्यावर हळूहळू दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. जर दुबार पेरणी करावी लागली तर होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीस जबाबदार कोण? झालेले बि-बियाणे, रासायनिक खते आणि कष्ट-वेळ याची नुकसान भरपाई कोण देणार आहे?.

जून महिन्यात हवामान विभागनिहाय पाऊसाच्या नोंदीची पद्धत पाहता, त्यातील किती नोंदी खऱ्या आहेत या विषयी शंका आहेच. कारण प्रत्येक गाव शिवारात पाऊस पडण्यामध्ये वेगळेपण आहे. (एक ते दोन किमी अंतरात पाऊस वेगवेगळा पडलेला दिसून येतो) त्यामुळे प्रत्येक गावांमधील पाऊसाची नोंद घेतली जात नाही. त्यामुळे जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असावा.

शेतकऱ्यांचा हवामान विभागापेक्षा शेतकरी खासगी तज्ञांवर जास्त विश्वास का? हवामान विभागाचा अंदाज ग्रामीण भागात बहुतांश शेतकऱ्यांपर्यंत का पोहचत नाही? या सर्वात शासनाची काय जबाबदारी असू शकते? खासगी तज्ञांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल होत नाही ना? ह्याची तपासणी का केली जात नाही? असे अनेक प्रश्न आहेत.

Updated : 4 July 2024 1:03 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top