Home > मॅक्स किसान > दूध उत्पादकांची लूट थांबवा:दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती

दूध उत्पादकांची लूट थांबवा:दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती

दूध उत्पादकांची लूट थांबवा:दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती
X

फॅट व एस.एन.एफ. मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मिल्कोमिटर यंत्रामध्ये व दूध प्रमाण मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वजन काटे यंत्रामध्ये फेरफार करून शेतकऱ्यांची राज्यभर लूटमार सुरू आहे. मिल्कोमिटर यंत्रांच्या प्रमाणीकरणाची कोणतीही शासकीय यंत्रणा राज्यात कार्यरत नाही. दूध संकलन केंद्रावरील वजन काट्यांची नियमित तपासणी होत नसल्याने चुकीची मापे दाखवूनही शेतकऱ्यांना लुटले जात आहे. मिल्कोमिटर व वजन काटे नियमित तपासून त्यांचे प्रमाणीकरण करण्यासाठी दुग्ध विकास विभागामार्फत स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे.

दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने याबाबत दुग्ध विकास विभागाला वारंवार निवेदने दिली आहेत. दुग्ध विकास मंत्री व दुध आयुक्त यांनाही निवेदने देऊन या प्रश्नाबाबत हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. मात्र राज्याचा दुग्ध विकास विभाग संपूर्णपणे निष्क्रीय असल्याने याबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही.

दुधाचे दर, फॅट व एस.एन.एफ.नुसार ठरत असतात. फॅट व एस.एन.एफ. मध्ये थोडा जरी बदल झाला तरी दूध उत्पादकाला मोठा तोटा होतो. वजन मापनातील फरकामुळेही शेतकऱ्याचे मोठे नुकसान होते. सुस्त दुग्ध विकास विभाग या लुटमारी विरोधात काहीच करणार नसेल तर शेतकऱ्यांना पुन्हा आंदोलनाच्या मार्गाने जावे लागेल.

दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रश्नात लक्ष घालावे व राज्यात तातडीने दुग्ध विकास विभागाची स्वतंत्र मिल्कोमिटर व वजन काटे प्रमाणीकरण यंत्रणा उभारून दूध उत्पादकांची लुट थांबवावी अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात येत आहे.

निवेदन देताना डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, सतीश देशमुख, जोतिराम जाधव, श्रीकांत कारे, प्रा.अशोक ढगे, दादा गाढवे, दीपक पानसरे, दीपक वाळे, रामनाथ वदक, मंगेश कान्होरे, राजकुमार जोरी, नंदू रोकडे, सीताराम पानसरे, अमोल गोर्डे, सूर्यकांत कानगुडे, सुदेश इंगळे, सुहास रंधे, दादा कुंजीर, इंद्रजित जाधव, अविनाश जाधव होते.

Updated : 23 Jan 2023 8:07 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top